Wednesday, 21 Apr, 5.43 pm BBC मराठी

होम
कोरोना लस किंमत: सिरम इन्स्टिट्यूटने केले खासगी हॉस्पिटलसाठी लशीचे दर जाहीर

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लशीचे दर जाहीर केले आहेत. 1 मेपासून देशामध्ये 18 वर्षांवरील सगळ्यांना कोव्हिड-19साठीची लस घेता येणार आहे. त्यासाठी 1 मे पूर्वी लशीचे दर जाहीर करावेत, असं सरकारने लस उत्पादक कंपन्यांना सांगितलं होतं. त्यानुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांच्या 'कोव्हिशील्ड' लशीचे दर जाहीर केले आहेत.

लस उत्पादक कंपन्या आता त्यांच्या उत्पादनाच्या 50 टक्के साठा केंद्र सरकारला देतील, तर उर्वरित 50 टक्के साठ्याची विक्री राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना करण्यात येईल.

सरकारी दवाखाने आणि लसीकरण केंद्रांसाठी कोव्हिशील्डचा प्रत्येक डोस 400 रुपयांना मिळेल, तर खासगी दवाखान्यांना कोव्हिशील्डचा प्रत्येक डोस 600 रुपयांना विकत घेता येईल.

यानंतर खासगी दवाखाने यावर स्वतःची लसीकरणासाठीची फी आकारून, लसीकरणासाठीचे त्यांचे प्रत्येक डोसचे दर जाहीर करतील. त्यामुळे विविध खासगी दवाखान्यांचे लसीकरणासाठीचे दर वेगवेगळे असण्याची शक्यता आहे.

राज्य सरकार त्यांनी विकत घेतलेल्या डोसेसची विक्री कोणत्या दराने करणार, हे अजून स्पष्ट नाही.

जगभरामध्ये लसीच्या प्रत्येक डोससाठी मोजाव्या लागणाऱ्या किंमतीपेक्षा आपले दर कमी ठेवल्याचं सिरम इन्स्टिट्यूटने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

केंद्र सरकारकडे ज्या 50 टक्के लशी जातील त्यांचं वितरण केंद्राद्वारे विविध राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं जाईल. त्या त्या भागातल्या संसर्गाची परिस्थिती आणि राज्य प्रशासनाचं लसीकरणाचं काम पाहून हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं होतं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top