होम
कोरोना लस: राजेश टोपे म्हणतात 'केवळ 9 लाखच लशी शिल्लक'

"महाराष्ट्रात पारदर्शकता जास्त आहे. इथं सर्वच बाबतीत पारदर्शकता पाळली जाते. राज्याची कामगिरी नीट नाही म्हणून कोरोनाची अशी स्थिती आहे निरीक्षण चूक आहे," असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.
बुधवारी (7 एप्रिल) केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राच्या कोरोना साथीच्या हाताळणीबाबत टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी वरील स्पष्टीकरण दिलं आहे.
आजच्या पत्रकार परिषदेत टोपे यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
केंद्राकडून महाराष्ट्राला होत असणारा लसपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याबाबत टोपे यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. राज्यात फक्त दीड दिवसांना पुरेल इतकी लस उपलब्ध आहे, असं टोपे म्हणाले.
तसंच महाराष्ट्र सरकार कोरोना स्थितीची हाताळणी उत्तमरित्या करत असल्याचंही टोपे यांनी सांगितलं.
"महाराष्ट्राच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचं कौतुक WHO, वॉशिंग्टन पोस्टसकट अनेक आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी केलं आहे," असं राजेश टोपे म्हणाले.
"काल 14 लाख लशी उपलब्ध होत्या, आज 9 लाख लशी शिल्लक आहेत. 15 एप्रिल नंतर 17 लाख लशी मिळणार आहेत. ते प्रमाणही कमी आहे असं म्हणावं लागेल. आमचा केंद्रबिंदू रुग्ण आहे. त्यासाठी ज्य़ा गोष्टी होत्या त्या आम्ही केल्या. आरटीपीसीआरचे दर कमी केले, आरटीपीसीआर, प्लाझ्माचे, रेमडेसिवियरचे दर कमी केले आहेत. रेमडेसिवियरसाठी उत्पादकांशी बोलणं आज करणार आहे. रेमडेसिवियर 1200 रुपये झालं पाहिजे अशी मी मागणी करणार आहे," टोपे म्हणाले.
ते पुढं म्हणाले, "खासगी रुग्णालये गरज नसताना रेमडिसिवियर वापरतात, तसं करू नये. पंतप्रधानांशी होत असलेल्या बोलण्यात आम्ही ऑक्सिजन आजूबाजूच्या राज्यातून मिळवून द्यावा, रेमडिसिवियरच्या काळ्या बाजाराला थांबवलं पाहिजे, लसी आणि व्हेंटिलेटर्स मागणार आहोत. सर्व व्हेंटिलेटर्स कार्यरत, दुरुस्त करुन दिले पाहिजेत अशी मागणी आम्ही पंतप्रधानांसमोर मांडणार आहोत."
लशींअभावी मुंबईतील 26 कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र बंद करावे लागल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
'महाराष्ट्राला प्रतिआठवडा 40 लाख लशींची आवश्यकता'
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळला लशी पाठवून दिल्या आहेत. पण ते पुरेसे नाहीत. महाराष्ट्राला आणखी लशींची आवश्यकता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र सरकारने प्रतिआठवडा 40 लाख, प्रति महिना 1 कोटी 60 लाख लशींचा पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी टोपे यांनी केली.
केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले होते?
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमितपणे समुपदेशन केले. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करून दिली. तसंच मदतीसाठी केंद्रीय पथके पाठवली. पण आता महाराष्ट्र सरकारच्याच प्रयत्नांमध्ये अभाव असल्याचे स्पष्ट दिसते, असं हर्षवर्धन यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून म्हटलं होतं.

महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढीला आणि मृत्यूदर वाढण्यामागेही सरकारचा ढिसाळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
https://www.facebook.com/RajeshTopeOfficial
ते म्हणाले, "आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यू आहेत. एवढेच नव्हे तर जगात सर्वाधिक चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही महाराष्ट्रातच आहे. याठिकाणी चाचणी योग्य पद्धतीने होत नसून कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याचे कामही होत नाही."
'वसुलीसाठी कोरोनाकडे दुर्लक्ष'
बुधवारी केंद्र सरकारने एक प्रसिद्धीपत्रक लिहित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता.

"आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठीही सरकारची कामगिरी चांगली नाही. सरकार वैयक्तिक वसुली करण्यासाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमधून सवलत देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा धोका वाढत आहे, हे पाहणं धक्कादायक आहे. एकंदरीतच, राज्य एका संकाटातून दुसऱ्या संकटात अडकले आहे. राज्याचं नेतृत्व आनंदाने आराम करत असल्याचं दिसतं." अशी टीका त्यांनी केली.
'...तर लसीकरण थांबवावं लागेल'
महाराष्ट्राला लशीचा पुरवठा कमी पडत असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर लशीचा साठा पाठवावा अशी मागणी राज्यातील नेत्यांकडून करण्यात येत आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोव्हिड-19 विरोधी लशींची तुटवडा असल्याचं मान्य केलंय. "राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लशींचा साठा आहे. तीन दिवसात लस मिळाली नाही तर लसीकरण बंद पडेल," असं टोपे बुधवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा स्फोट झालाय. राज्यात सद्यस्थितीत 4 लाख 70 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
राज्यातील काही जिल्ह्यात लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आलंय.
कोरोनाचा संसर्ग राज्यभरात मोठ्या झपाट्याने पसरतोय. शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेल्या कोरोना संसर्गामुळे मिनी-लॉकडाऊन करण्यात आलंय. देशातील 10 कोव्हिड-19 हॉटस्पॉट जिल्ह्यांपैकी 7 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र देशातील कोरोना संसर्गाचा हॉटस्पॉट बनलाय.
बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)
source: bbc.com/marathi