Saturday, 31 Jul, 9.31 pm BBC News मराठी

होम
कोरोना : लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर काय?

16 जानेवारी 2021 पासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. कोव्हिशील्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' लस वापरून देशात लसीकरण सुरू आहे. स्पुटनिक - व्ही लसही भारतात आता उपलब्ध आहे.

शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होऊन लस परिणामकारक ठरण्यासाठी तिचे दोन डोस घ्यावे लागतील. तसंच लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यांनी दुसरा डोस घेणं अपेक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय.

मात्र, लशीचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींना लशीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर काय करायचे? याचा आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का?

दुसरा डोस मिळाला नाही तर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार होणार नाहीत का? दुसरा डोस वेळेत मिळाला नाही तर याची सूचना कुठे द्यायची? आणि पहिला डोस एका लशीचा घेतला, आणि ती लस उपलब्ध नसेल, पण दुसरी उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लशीचा घ्यायचा का? या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

1. पहिली लस घेतली पण दुसरी लस (लशीचा दुसरा डोस) ठराविक आठवड्यांच्या कालावधीत उपलब्ध झाली नाही किंवा घेता आला नाही तर याचा आरोग्यावर काही परिणाम होऊ शकतो का?

देशात लसीकरण आता सर्वांसाठी खुलं आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी लस घेतलेली आहे.

पण तरीही अनेकदा लशींचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतात.

पहिली लस घेतल्यानंतर साधारण सहा ते आठ आठवड्यांनी कोव्हॅक्सिनचा तर 12 ते 16 आठवड्यांनी कोव्हिशील्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे. पण हा कालावधी उलटून गेला आणि तरी लस मिळाली नाही असे झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही, असं राज्याच्या आरोग्य विभागाचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी त्याचा प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पण अशी परिस्थिती महाराष्ट्रात नसल्याचा दावा महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे (DMER) संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. पहिली लस मिळाली आणि दुसरी लस मिळत नाही असं होत नाहीय असंही ते म्हणाले.

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ.तात्याराव लहाने यांनी सांगितलं, "लशीचा दुसरा डोस मिळाला नाही तरी आरोग्यावर याचा परिणाम होणार नाही. पण महाराष्ट्रात दुसरा डोस मिळत नाहीय असं झालेलं नाही."

"सध्या काही प्रमाणात लशीचा साठा असून आगामी दिवसांत लशींचा पुरवठा होणार आहे. तेव्हा काळजी करण्याचे काहीही कारण नाही," असंही ते म्हणाले.

तर पहिली लस घेतलेल्या व्यक्तीसाठी दुसऱ्या लशीची तरतूद आपोआप करण्यात येते असं राज्य कृती दलाचे (कोरोना टास्क फोर्स) सदस्य, 'कॉलेज ऑफ फिजिशियन'चे अधिष्ठाता आणि ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, "दुसरा डोस मिळणार नाही एवढा तुटवडा नाही. पहिला डोस दिलेल्या व्यक्तीसाठी शासनाने दुसरा डोस राखून ठेवला आहे. त्यामुळे ही भीती कृत्रिम आहे असं मला वाटतं. ग्रामीण भागातही दुसऱ्या डोससाठी अशी परिस्थिती उद्भवणार नाही."

"तसंही जगभरात आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार लशीचा दुसरा डोस दोन किंवा तीन महिन्यांनी द्या असं सांगितलं आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

2. लशीचा दुसरा डोस न मिळाल्यास किंवा न घेतल्यास काय होईल?

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा अँटीबॉडी शरीरात तयार होणं गरजेचं आहे.

डॉ.प्रदीप आवटे सांगतात, "दुसरी लस घेतली नाही तर शरीरात पुरेशा अँटीबॉडी तयार होणार नाहीत. त्यामुळे विषाणूशी लढण्यासाठी शरीरात लशीचा जेवढा प्रभाव हवा तेवढा प्रभाव राहणार नाही. थोडक्यात सांगायचे तर केवळ एक लस प्रभावी ठरणार नाही."

ते पुढे सांगतात, "आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कोव्हिशील्ड लस कोरोनापासून 71 टक्के सुरक्षा देते. पण ही सुरक्षा लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर मिळते."

3. लशीचा दुसरा डोस मिळत नसल्यास कुठे तक्रार करायची?

आगामी काळात लशीचा दुसरा डोस मिळवण्यात अडचण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक जिल्ह्यांमध्ये लशीचा साठा संपला किंवा तो अपुरा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

"लशीचा दुसरा डोस मिळत नसल्यास संबंधित लसीकरण केंद्राला तुम्ही कळवले पाहिजे. पहिली लस ज्याठिकाणी घेतली त्याच ठिकाणी तुम्हाला दुसरी लस मिळणे अपेक्षित आहे. तेव्हा त्याच केंद्रात जाऊन तुम्ही लशीची चौकशी करावी." असं डॉ.प्रदीप आवटे सांगतात.

तसंच लशीसाठी नोंदणी किंवा अपॉईनमेंट घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन (Co-WIN) अॅपवरही तुम्हाला तक्रार करता येईल असं डॉ.शशांक जोशी सांगतात.

"कोविन अॅपवर लशीसंदर्भातील सर्व माहिती आणि संपर्क आहेत. याचा वापर करून तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता." असंही ते म्हणाले.

4. पहिला डोस एका लशीचा घेतला, आणि ती लस उपलब्ध नसेल, पण दुसरी उपलब्ध असेल, तर दुसरा डोस वेगळ्या लशीचा घ्यायचा का?

असं करता येणार नाही आणि तशी तरतूदही नाही असं आरोग्य विभागातील तज्ज्ञांनी स्पष्ट केलं.

आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे सांगतात, "लशीचे दोन डोस वेगवेगळ्या कंपनीचे देता येणार नाहीत. पहिला डोस एका लशीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीच्या लशीचा अशी पद्धत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे करू नये."

लसीकरण करणाऱ्या केंद्रांवरही अशी सोय उपलब्ध नसल्याचं राज्य कृती समितीचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांनी स्पष्ट केलं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top