Saturday, 28 Mar, 6.37 pm BBC मराठी

होम
कोरोना: मुंबई, पुण्यात राबवला जाणार 'क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन'

महाराष्ट्र सरकारने मुंबई, पुणे महापालिकेसह जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी "क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन" राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशाच्या आर्थिक राजधानी, मुंबईत, कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढू लागलाय. हा व्हायरस, आता मुंबईच्या झोपडपट्यांमध्ये जाऊन पोहोचला आहे. दाटीवाटीने, एकमेकांना खेटून हजारोंची वस्ती असलेल्या या झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मुंबईच्या गोवंडी, चीता कॅंप, एलफिस्टन आणि कलिना यासाख्या परिसरात झोपडपट्टी, आणि चाळीत राहणाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. कलिना आणि अंधेरी भागात आरोग्यसेवा देणाऱ्या दोन डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या डॉक्टरांनी कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह येण्याआधी रुग्णांची तपासणीही केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये हा व्हायरस पसरू नये याची खबरदारी घेण्यासाठी "क्लस्टर कंटेनमेंट प्लान" वेळीच आणि योग्य पद्धतीने अंमलात आणणं गरजेचं आहे.

मुंबईतील झोपडपट्यांमध्ये मोठ्या संख्यने लोकं राहतात. या परिसरात लोकांची मोठ्या संख्येने वर्दळ सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग राबवणं कठीण जातं. त्यामुळे, मुंबईतील ज्या झोपडपट्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्याठिकाणी "क्लस्टर कंटेनमेंट प्लान" राबवण्यात येणार आहे.

 • वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
 • वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
 • वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
 • वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
 • वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
 • वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
 • वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

याबाबत बोलताना महाराष्ट्राचे आरोग्य संचालनालय आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले, "क्लस्टर कंटेनमेंट प्लॅन"ची योग्य अंमलबजावणी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्राकडून याबाबत सूचना आल्यानंतर आम्ही महापालिकांना याबाबत माहिती दिली आहे. यामुळे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या लोकवस्तीतील सर्व घरांची योग्य तपासणी करण्यात येईल. घरोघरी जाऊन ही तपासणी होईल. जेणेकरून कोरोनाचा प्रसार पुढे पसरण्यापासून थांबवता येईल."

असा असेल "क्लस्टर कंटेनमेंट प्लान"

 • ज्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला त्या घराला सॅनिटाइज करणं
 • रुग्णाच्या नातेवाईकांची तपासणी आणि क्वॉरेंन्टाईन करणं
 • त्या परिसराच्या सीमा (बाउंड्री) सील कराव्यात. ही सीमा पालिका अधिकाऱ्यांनी ठरवावी.
 • सीमा ठरवल्यानंतर आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गांवर लोकांना तैनात करावं
 • डॉक्टर आणि वॉर्ड अधिकाऱ्यांनी घराघरात तपासणी करावी
 • लक्षणं दिसून येत असलेल्या प्रत्येकाची तपासणी आणि आयसोलेशन करावं
 • काम किंवा घरासाठी वस्तू घेण्यासाठीच फक्त बाहेर जाण्याची परवानगी

"सद्य स्थितीत मुंबई महापालिकेच्या १५०० टीम्स शहरभर काम करत आहेत. घरोघरी तपासणी सुरू करण्यात आली आहे. याचा फायदा कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निश्चित होईल," असंही डॉ. अनुपकुमार यादव म्हणाले.

महाराष्ट्रात सद्य स्थितीला कोरोनाबाधितांची संख्या १६७ वर जावून पोहोचली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कलिना आणि अंधेरी परिसरातील कोरोनाबाधित डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली आहे. एका डॉक्टरने जवळच्याच रुग्णालयात जाऊनही रुग्णांची तपासणी केली आहे. त्यामुळे, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीतही "क्लस्टर कंटेनमेंट प्लान"बाबत चर्चा करण्यात आलीये. याची काटेकोर अंमलबजावणी आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या परिसरातील सीमा सील करणं संसर्ग रोखण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग समाजात पसरू नये यासाठी २१ दिवसांचं लॉकडाऊन केलं. पण, झोपडपट्यांमध्ये याचं पालन करणं अवघड आहे.

"क्लस्टर कंटेनमेंट करत असतील तर ते चांगलंच आहे. ते सोसायट्यांमध्येही केले जाते. त्याचा फायदाच होईल", असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

मुंबई महालिकेचे नगरसेवक आणि आमदार, रईस शेख म्हणाले, "झोपडपट्यांमध्ये रुग्णांची शोधमोहीम, तपासणी आणि आयसोलेशन हाच पर्याय प्रशासनासमोर आहे. प्रशासनाने याची खबरदारी घेतली आहे. ज्या घरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतोय. त्याला सॅनिटाइज केलं जात आहे. नातेवाईकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येत आहे."

आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पालिका प्रशासनाला जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. जेणेकरून, कोरोनाबाधित रुग्णांची योग्य माहिती मिळाल्यानंतर उपचार सुरू करता येतील.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top