Sunday, 29 Mar, 1.47 pm BBC मराठी

होम
कोरोना व्हायरस किट बनवणाऱ्या पुणे येथील मीनल दाखवे-भोसले यांची गोष्ट

मातृत्वाची जबाबदारी हा कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील अवघड टप्पा. पुण्याच्या मीनल दाखवे-भोसले यांनी गरोदर असतानादेखील कोरोनाची चाचणी करणाऱ्या किटच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली.

भारतात कोरोना विषाणुच्या पुरेशा चाचण्याच होत नाहीत आणि म्हणून इथली कोरोनाग्रस्तांची खरी आकडेवारी अजून समोर आलेली नाही, अशी टीका होते आहे. मात्र, आता हे चित्र पालटणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील Mylab या कंपनीने कोव्हिड 19 आजाराचं निदान करणारी चाचणी किट यशस्वीरित्या तयार केली आहे. यामागे कष्ट आहेत पुणेकर व्हायरोलॉजिस्ट ज्यांनी गरोदरपणात, बाळंतपणाच्या अगदी काही तास आधीपर्यंत ही किट तयार करण्यासाठी प्रयत्न केले.

या पहिल्या मेड इन इंडिया टेस्टिंग किट गुरुवारी मार्केटमध्ये दाखल झाल्या. पुणे, मुंबई, दिल्ली, गोवा आणि बंगळुरूमधल्या लॅबमध्ये एकूण 150 किट वितरित करण्यात आल्या आहेत. कोव्हिड-19 चाचणीची किट तयार करणे आणि त्याच्या विक्रीची परवानगी मिळवणारी Mylab Discovery Solutions पहिली भारतीय संस्था बनली आहे.

Mylab चे संचालक डॉ. गौतम वानखेडे यांनी शुक्रवारी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आमचा उत्पादन विभाग वीकएंडलाही काम करणार आहे आणि या किटची दुसरी बॅच सोमवारपर्यंत बाजारात रवाना होईल."

ही कंपनी HIV, हिपॅटायटीस A आणि B आणि इतरही आजारांच्या चाचण्यांसाठीच्या किट तयार करते. आम्ही दर आठवड्याला 1 लाख कोव्हिड 19 डायग्नोस्टिक किट्सचा पुरवठा करू शकतो आणि गरज पडली तर 2 लाख किट्स तयार करण्याचीही कंपनीची क्षमता असल्याचं वानखेडे यांनी सांगितलं.

  • वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
  • वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
  • वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
  • वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
  • वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
  • वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
  • वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?

एक किट 100 नमुने तपासू शकते. या एका किटची किंमत जवळपास 1,200 रुपये आहे. परदेशातून आयात केलेल्या एका कोव्हिड 19 चाचणी किटसाठी आपल्याला तब्बल 4,500 रुपये मोजावे लागतात. त्या तुलनेत संपूर्णपणे भारतीय बनावटीची Mylab कंपनीची ही किट जवळपास 70 ते 75 टक्क्यांनी स्वस्त आहे.

आधी किटची डिलिव्हरी, नंतर दिला बाळाला जन्म

Mylab मध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रमुख असणाऱ्या मीनल दाखवे-भोसले यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आमची किट अडीच तासात चाचणीचा रिपोर्ट देते. याउलट परदेशातून मागवलेल्या किट्सचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात तास लागतात."

मीनल यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने या किटचं डिझाईन तयार केलं आहे. त्या सांगतात की अशी किट तयार करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार महिने लागतात. मात्र, त्यांच्या कंपनीने सहा आठवड्यांमध्ये म्हणजे विक्रमी वेळेत ही किट तयार करून दाखवली आहे.

विशेष म्हणजे लवकरात लवकर किट तयार करणं जेवढं देशासाठी गरजेचं होतं तेवढंच ते स्वतः मीनल दाखवे-भोसले यांच्यासाठीही महत्त्वाचं होतं. मिनल यांनी गेल्याच आठवड्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यापूर्वी गर्भारपणात काही तक्रारी आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी लगेच या किटवर काम सुरू केलं आणि आठवडाभरापूर्वी त्यांनी काम संपवलं देखील.

याविषयी बोलताना मीनल सांगतात, "ही तातडीची गरज होती. त्यामुळे मी आव्हान म्हणून ते स्वीकारलं. मला माझ्या देशासाठी काम करायलाच हवं." हे सांगताना आपल्या दहा जणांच्या टीमनेही अहोरात्र 'अथक मेहनत' घेतल्याचंही त्या आवर्जून सांगतात.

किट तयार झाल्यानंतर त्याची चाचणी घ्यायची असते. पुण्यातील NIV (National Institute of Virology) या संस्थेत किटची पहिली चाचणी घेण्यात आली. 18 मार्च रोजी ही चाचणी झाली आणि दुसऱ्याच दिवशी मिनल यांनी मुलीला जन्म दिला.

त्याच संध्याकाळी बाळंतपणासाठी हॉस्पिटलला नेण्याच्या तासाभराआधी मीनल यांनी शासनाची परवानगी मिळवण्यासाठी अन्न आणि औषध विभाग (FDA) आणि औषध नियंत्रण संस्था असलेल्या CDSCO ला प्रस्ताव पाठवले होते.

Mylab चे संचालक डॉ. वानखेडे सांगतात, "आमच्याकडे वेळ नव्हता. आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला सर्व प्रक्रिया पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करायच्या होत्या आणि आमच्या या प्रयत्नांचं मिनल पहिल्या फळीत राहून नेतृत्त्व करत होत्या."

किटने घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष 100 टक्के योग्य आले तरच त्या किटला शासनाची मान्यता मिळते.

मिनल सांगतात, "एकाच नमुन्याच्या 10 चाचण्या घेतल्या तर त्या सर्वच्या सर्व 10 चाचण्यांचे निष्कर्ष सारखेच यायला हवेत आणि आम्ही ते करून दाखवलं. आमच्या किट निर्दोष आहेत."

भारत सरकारद्वारे संचालित Indian Council for Medical Research (ICMR) या संस्थेअंतर्गत येणाऱ्या NIV नेही यावर शिक्कामोर्तब केलं. Mylab ही एकमेव अशी भारतीय कंपनी आहे जिच्या चाचण्या 100% यशस्वी झाल्या, अशी पावती NIV ने दिली आहे.

"सध्या भारतात अनेक संशोधन केंद्रांमध्ये असे किट तयार केले जातात, ज्यात फक्त सत्तर टक्के चाचण्या यशस्वी होतात. ICMR कधीही अशा किटला परवानगी देत नाही. त्यामुळे 100 टक्के यशस्वी किट तयार करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं," असं Mylab चे शैलेंद्र कवाडे सांगतात.

'आरोग्य व्यवस्थेत गंभीर त्रुटी'

भारतात फारच कमी चाचण्या होत असल्याची ओरड होते आहे. कोव्हिड-19 आजाराच्या चाचण्यांचा भारताचा दर जगाच्या तुलनेत फारच कमी आहे. आपल्या देशात दहा लाख माणसांमागे केवळ 6.8 म्हणजेच जवळजवळ 7 माणसांचीच चाचणी होत आहे.

सुरुवातीला भारतात कोव्हिड-19चा फैलाव झालेल्या देशातून परतलेले भारतीय, अशा भारतीयांच्या जवळून संपर्कात आलेले आणि कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी, केवळ याच लोकांच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. मात्र, त्यानंतर श्वसनाचा त्रास असलेल्या गंभीर रुग्णांचीही कोरोना चाचणी घेण्याचे आदेश देण्यात आले.

मात्र, दिवसेंदिवस विषाणूचा फैलाव वाढत असल्याने ही संख्या अजून वाढण्याची भीती आहे.

गेल्या काही दिवसात चाचण्या घेण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलं आहे. सुरुवातीला केवळ सरकारी हॉस्पिटलमध्येच कोव्हिड 19 च्या चाचण्या व्हायच्या. मात्र, आता काही निवडक खाजगी लॅबनाही चाचणीची परवानगी देण्यात आली आहे.

इतकंच नाही तर अमेरिका, युरोपीय महासंघ आणि इतर काही देशांचे परवाने असलेल्या 15 खाजगी कंपन्यांनाही गुरुवारी डायग्नोस्टिक किटची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

डायग्नोस्टिक किट पुरवणाऱ्या कंपन्या आणि जिथे या चाचण्या केल्या जातील त्या लॅबची संख्या वाढवल्याने भारतात येत्या काही दिवसात फार मोठ्या प्रमाणावर कोव्हिड 19 च्या चाचण्या होणार आहेत.

कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणं गरजेचं आहे. मात्र, देशाच्या आरोग्य क्षेत्रात अनेक गंभीर त्रुटी आहेत आणि कोरोना विषाणूचा सामना करायचा असेल तर या त्रुटी लवकरात लवकर दूर करायला हव्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

"दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशातही तब्बल 650 लॅबमध्ये कोव्हिड 19च्या चाचण्या होतात. आपल्याकडे अशा किती लॅब आहेत?", असा सवाल माजी आरोग्य सचिव सुजाता राव यांनी केला.

भारतात एकूण 118 सरकारी प्रयोगशाळा आहेत तर 50 खाजगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 130 कोटी लोकसंख्या असेलल्या देशासाठी लॅबची ही संख्या अगदीच तुटपुंजी आहे.

राव म्हणतात, "भारताला यापेक्षा खूप जास्त लॅबची गरज आहे. त्यानंतर त्या लॅबमध्ये पुरेशा चाचणी किटही पोचल्या पाहिजे. लॅबच्या टेक्निशिअन्सला चाचणीचं प्रशिक्षणही द्यावं लागेल आणि या सगळ्या पायाभूत सुविधा तयार करण्यात बराच वेळ लागणार आहे."

एकदा चाचण्यांचे निकाल यायला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली तर ती परिस्थिती हाताळणं, भारतासाठी खूप अवघड असणार आहे.

राव म्हणतात, "भारतातील आरोग्य सुविधेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहेच? त्या सर्व शहरी भागात एकवटल्या आहेत. ग्रामीण भारतात आरोग्याच्या पुरेशा सोयी नाहीत आणि हे एक मोठं आव्हान असणार आहे."

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top