Thursday, 29 Oct, 12.12 pm BBC मराठी

होम
कोरोना व्हायरस: फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशात दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे.

मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना शुक्रवारपासून (30 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी माहिती दिली.

याअंतर्गत नागरिकांना अतिआवश्यक कामं आणि वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. रेस्टॉरंट्स, बार बंद राहतील, तर शाळा आणि कारखाने सुरू राहतील.

कोरोनामुळे फ्रान्समधील मृतांचा आकडा एप्रिलनंतर आता सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) देशात कोरोनाचे 33,000 नवीन रुग्ण आढळले.

मॅक्रॉन यांनी म्हटलं की, "देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पसरला आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असणार आहे, यात काही एक शंका नाही."

यापूर्वी जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी म्हटलं होतं की, "देशाला त्वरित कारवाईची गरज आहे आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या राष्ट्रव्यापी प्रयत्नांची आवश्यकता आहे."

सध्या फ्रान्समध्ये 4.6 कोटी लोक रात्रीच्या कर्फ्यूचा सामना करत आहेत.

सरकार सामाजिक संपर्क कमी करण्यात अपयशी ठरलं, अशी तक्रार एका मंत्र्यानं केली आहे.

फ्रान्समधील परिस्थिती

देशाला संबोधित करताना मॅक्रॉन यांनी म्हटलं की, "कोरोनाच्या साथीत देशाला बुडण्यापासून रोखायचं असेल तर कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे."

फ्रान्सच्या दवाखान्यांतील सगळे आयसीयू बेड कोरोनाच्या रुग्णांनी व्यापले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले, "आता लोकांना घराबाहेर पडायचं असल्यास एक फॉर्म भरावा लागेल, मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केल्यानंतर जसा फॉर्म भरावा लागत होता, तसाच हा फॉर्म असेल. सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल."

"आता कामावर जाण्यासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी, नातेवाईंच्या मदतीसाठी, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, तसंच घराशेजारी ताजी हवा घेण्यासाठीच तुम्ही घरातून बाहेर पडू शकाल," असं मॅक्रॉन यांनी म्हटलंय.

"नागरिकांना व्यायामासाठी 1 तास दिला जाईल आणि काम करण्यासाठी तेव्हाच परवानगी दिली जाईल, जेव्हा घरून काम करणं शक्य नाही, असं कंपनीकडून स्पष्ट केलं जाईल," असेही आदेश देण्यात आले आहेत.

तसंच केअर होम्समध्ये जाण्याचीही परवानगी असेल, असंही मॅक्रॉन यांनी स्पष्ट केलंय.

हे निर्बंध 1 डिसेंबरपर्यंत लागू राहतील आणि दर 2 आठवड्यांनी त्यांचं मूल्यांकन केलं जाईल.

ख्रिसमस सगळेच आपापल्या कुटुंबीयांसोबत साजरा करतील, असा आशावाद मॅक्रॉन यांनी व्यक्त केला आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top