Thursday, 22 Jul, 2.42 pm BBC News मराठी

होम
कोरोना व्हायरस : वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं

काहीही खाल्ल्यानंतर चव न लागणं किंवा कशाचाही वास न येणं ही देखील कोरोनाच्या संसर्गाची लक्षणं असू शकतात. कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरात पसरू लागल्यानंतर काही महिन्यांतच ब्रिटनमधल्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला होता.

पण कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे वास न येणं हा अनुभव सर्दी किंवा फ्लूमधल्या नाक बंद होण्यापेक्षा अगदी वेगळा असल्याचा निष्कर्ष रुग्णांच्या अनुभवांचा अभ्यास केल्यानंतर युरोपमधल्या संशोधकांनी काढलाय.

कोव्हिड -19च्या रुग्णांना अचानक वास येईनासा होतो आणि ही गंभीर बाब ठरू शकते.

नाक बंद होणं किंवा नाक गळणं वा नाक चोंदणं यासारखे त्रास संसर्गाच्या सुरुवातीच्या लाटेतल्या कोव्हिड रुग्णांना झाला नव्हता.

पण कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांमध्ये डोकेदुखी, नाक गळणं, घसा खवखवणं ही लक्षणं आढळून आली आहेत.

फ्लू वा सर्दीपेक्षा आणखी एक वेगळी गोष्ट म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला पदार्थांची चव कळत नाही.

लोकांची वास घेण्याची क्षमता गेल्याने त्यांना चवी कळणं बंद होतं अशातली गोष्ट नसल्याचं रायनॉलॉजी या जर्नलमध्ये संशोधकांनी म्हटलंय. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना चव कळणं बंद होतं, त्यांना अगदी कडू आणि गोडातला फरकही कळत नाही.

ज्या पेशी आपल्याला चव आणि वास कळण्यासाठी मदत करतात त्यांच्यांवर या व्हायरसचा परिणाम होत असल्याने असं होत असावं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

ब्रिटनच्या संशोधकांना काय आढळलं?

किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या एका टीमने एका अॅपवर 4 लाख लोकांनी दिलेल्या माहितीचा अभ्यास केला. यात अनेकांनी आपल्याला गंध येत नाही आणि चवही कळत नाही, असं म्हटलं आहे.

मात्र, साध्या सर्दी-पडशातसुद्धा ही दोन्ही लक्षणं आढळतात. शिवाय, ताप आणि कोरडा खोकला ही कोरोनाची अत्यंत महत्त्वाची लक्षणं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कुणालाही नव्याने तीव्र ताप किंवा कोरडा खोकला येत असेल तर तुम्ही घरीच थांबावं आणि कुणाच्याही संपर्कात येऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात. ही खबरदारी घेतल्यास इतर कुणाला कोरोनाचा संसर्ग होत नाही.

अभ्यासाचे निष्कर्ष

कोव्हिड-19 आजाराची लक्षणं अधिक स्पष्टपणे कळली तर कोरोनाबाधितांची ओळख पटवणं सोपं होईल. शिवाय, रुग्णावर जलद औषधोपचार करता येतील आणि संसर्गाच्या फैलावालाही आळा घालता येईल, या उद्देशाने किंग्ज कॉलेज ऑफ लंडनने हा अभ्यास केला.

कोव्हिड - 19च्या लक्षणांबद्दल अधिक वाचण्यासाठी - कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?

कोव्हिड सिम्पटम ट्रॅकर अॅपवर ज्यांनी आपली लक्षणं नोंदवली त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे.

  • 53% लोकांना थकवा जाणवत होता
  • 29% लोकांना सारखा खोकला येत होता
  • 28% लोकांना श्वास घेताना त्रास होत होता
  • 18% लोकांनी आपल्याला गंध येत नाही आणि चवही कळत नसल्याचं सांगितलं
  • तर 10.5% लोकांना ताप आला होता.

अॅपवर नोंद केलेल्या 4 लाख लोकांपैकी 1,702 लोकांनी कोव्हिड-19 ची चाचणी केली. यातले 579 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर उर्वरित 1,123 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ज्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले त्यातील 59% लोकांनी आपली गंधाची आणि चवीची संवेदना हरवल्याचं सांगितलं होतं.

गंध आणि चव गमावण्याविषयीचं संशोधन

अँग्लिया युनिर्व्हसिटीशी संलग्न असणाऱ्या प्रा. कार्ल फिल्पोट यांनी गंध आणि चव याविषयीचं संशोधन 30 स्वयंसेवकांवर केलं. या लोकांपैकी 10 जणांना कोव्हिड-19 झाला होता, 10 जणांना भरपूर सर्दी झाली होती तर 10 लोक निरोगी होते आणि त्यांनी सर्दी किंवा फ्लूची कोणतीही लक्षणं नव्हती.

वास न येण्याची तक्रार कोव्हिड-19च्या रुग्णांमध्ये जास्त होती. त्यांना वासावरून गोष्टी ओळखता आल्या नाहीत आणि कडू आणि गोड चवींमधला फरकही त्यांना कळला नाही.

वास न येणं - चव न कळणं या गोष्टींना तोंड देणाऱ्या रुग्णांना फिफ्थ सेन्स चॅरिटी ही संस्था मदत करते. या संस्थेचे प्रा. फिल्पोट सांगतात, "गंध आणि चव कळण्याची क्षमता जाण्याच्या लक्षणामुळे कोरोना व्हायरस हा श्वसनाशी संबंधित इतर विषाणूंपेक्षा वेगळा ठरतो. यावरून तुम्ही कोव्हिड-19चे रुग्ण आणि नेहमीच्या सर्दी - फ्लूच्या रुग्णांमध्ये फरक करू शकता."

कॉफी, लसूण, संत्रं किंवा लिंबू आणि साखर यासारखे पदार्थ वापरून घरच्या घरीच चव आणि वासासाठीची चाचणी करता येईल.

पण असं असलं तरी कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे का, याची खात्री पटवण्यासाठी स्वॉब टेस्ट करून घ्यावीच लागेल.

अधिक माहितीसाठी वाचा : कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?

कोव्हिड -19मधून बरं झाल्यानंतर काही दिवसांतच बहुतेक जणांना पुन्हा चव आणि वास कळायला लागतात.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top