Thursday, 29 Oct, 4.00 pm BBC मराठी

होम
कोरोनाच्या संसर्गानंतर अँटीबॉडीजमध्ये वेगाने घट होते?

कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन गेल्यानंतर त्याच्या अँटीबॉडीजच्या संख्येत वेगाने घट होते, असं संशोधकांनी म्हटलं आहे.

कोणत्याही विषाणूचा हल्ला परतवून लावण्यासाठी आपल्या शरीरात त्या विषाणूशी लढणारे अँटीबॉडी महत्त्वाच्या ठरतात.

लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या एका टीमकडून याबाबत संशोधन सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडी आढळून येण्याचं प्रमाण जून ते सप्टेंबर महिन्यात 26 टक्क्यांनी कमी झाल्याचं या टीमला आढळून आलं.

त्यामुळे कोरोना व्हायरससंदर्भात रोगप्रतिकारशक्ती कमी होत असून त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युकेमधील ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातील आकडेवारीचा एक अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये 16 ऑक्टोबरपासून युकेतील संसर्गात 60 टक्क्यांनी वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.

कोव्हिडमुळे युकेमध्ये 60 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

इंग्लंडमध्ये 3 लाख 50 हजारांपेक्षा जास्त लोकांनी अँटीबॉडी टेस्ट करून घेतली. यासाठी REACT-2 नावाची एक मोहीम राबवण्यात आली होती.

या मोहिमेच्या पहिल्या फेरीत जून आणि जुलै महिन्यात एक हजारपैकी 60 जणांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या.

पण नंतर सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या चाचणीत एक हजार व्यक्तींमागे फक्त 44 जणांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या.

म्हणजेच अँटीबॉडी असलेल्या रुग्णांचं प्रमाण या काळात 25 टक्क्यांनी कमी झालं.

रोग प्रतिकारशक्तीमध्ये झपाट्याने घट होत आहे. पहिली चाचणी करून फक्त तीन आठवडे उलटले आहेत. या काळात 26 टक्क्यांनी घट झाल्याचं आढळून येत आहे, असं संशोधक प्रा. हेलेन वार्ड म्हणाल्या.

प्रामुख्याने 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये अँटीबॉडीजमध्ये घट झाल्याचं आढळून आलं आहे.

तर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडी आढळण्याचं प्रमाण जास्त असल्याची आकडेवारी आहे.

ते कोरोना व्हायरसच्या संपर्कात जास्त प्रमाणात येत असल्यामुळे असं चित्र असू शकतं, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

कोरोना व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यानंतर अँटीबॉडीज त्याचा आवरणावर चिकटतात. त्याला शरीरातील पेशींवर हल्ला करण्यापासून रोखण्याचं काम त्यांच्यामार्फत केलं जातं.

रोगप्रतिकारशक्तीमध्ये अँटीबॉडींचं नेमकं कार्य किती आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. पण रोगप्रतिकार यंत्रणेच्या इतर घटकांसोबत मिळून हे काम केलं जातं.

पण अँटीबॉडी असल्याचं आढळून आल्यानंतर रोगाचं निदान करण्यात सोपं जात असल्याचं संशोधकांचं मत आहे.

प्रा. वेंडी बर्कले सांगतात, "आपण अँटीबॉडी पाहू शकतो. त्यांच्यात घट होत असल्याचं आपल्याला कळू शकतं. रोगप्रतिकारशक्ती यंत्रणेत अँटीबॉडी महत्त्वाच्या ठरतात. या अँटीबॉडीमध्ये घट होत असेल तर रोगप्रतिकारशक्तीमध्ये घट होत आहे, हे ओळखता येईल."

कोरोना व्हायरसचे इतर चार प्रकार आहेत. आपल्या जीवनात आपण अनेकवेळा त्यांच्या संपर्कात येतो. त्यांचमुळे साधा ताप किंवा सर्दी खोकला होता. दर सहा ते 12 महिन्यांनी आपल्याला अशी लक्षणं दिसतात.

अनेकांना कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणं दिसून येत आहेत. काहींमध्ये तर याची लक्षणंही दिसत नाहीत.

संशोधनानुसार, तीनपैकी दोन व्यक्तींना कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसून येत नाहीत.

ONSच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात युकेमध्ये मृत्यूंची संख्या वाढल्याचं दिसून आलं. यामुळे एकूण मृत्यूच्या प्रमाणात सहा टक्क्यांनी वाढ झाली.

युकेमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 60 हजारांपेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

16 ऑक्टोबरपर्यंत 59 हजार आणि त्यानंतर आतापर्यंत 1200 मृत्यू झाले आहेत. यापैकी 90 टक्के मृत्यू जून महिन्यापर्यंतच झाले आहेत.

कोरोना व्हायरसची लागण दोनवेळा झाल्याच्या घटना अत्यंत कमी आहेत. पण शास्त्रज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा दिलेला आहे. मार्च-एप्रिल महिन्यासारखाच प्रसार पुन्हा होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पण दुसऱ्यांदा झालेला संसर्ग हा तुलनेने सौम्य असतो. रोगप्रतिकारशक्ती घटली तरी आपल्या शरीरात संबंधित विषाणूच्या स्मृती असतात. त्यामुळे त्याच्याशी कसं लढायचं हे पेशींना माहिती असतं.

पण यामुळे आता लशीची गरज नाही, असं म्हणता येणार नाही. कोरोना व्हायरसवरची लसच हा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

संशोधकांच्या पथकातील प्रा. ग्रॅहम कूक यांच्या मते, "पहिल्या लाटेनंतरचं चित्र आपल्यासमोर आहे. बहुतांश देशांतील लोकांमध्ये कोरोना व्हायरसशी लढण्यासाठीची रोगप्रतिकारशक्ती नाही. त्यामुळेच सध्या लशीची गरज सर्वांनाच आहे."

REACT-2 मोहिमेचे प्रमुख प्रा. पॉल एलियट यांच्या मते, या अभ्यासातून लशीच्या प्रभावाबाबत ठोस निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल. नैसर्गिकरित्या झालेल्या संसर्गावर लशीची प्रतिक्रिया वेगळीही असू शकते."

काही लोकांना कोरोना व्हायरस लशीचे फॉलो अप बूस्टर घेण्याची गरज भासू शकते, असं त्यांना वाटतं.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top