Saturday, 31 Jul, 5.40 pm BBC News मराठी

होम
Manual scavenging : नालेसफाई करताना गेल्या 5 वर्षांत एकाही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही? - फॅक्ट चेक

गेल्या 5 वर्षांमध्ये हाताने गटारं - मैला साफ करताना म्हणजेच मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगदरम्यान (Manual Scavenging) एकाही स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलंय.

''गेल्या 5 वर्षांमध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगमुळं कुणाचाही मृत्यू झाल्याचं समोर आलेलं नाही,'' असं सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले. 28 जुलैला राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आणि एल हनुमंतय्या यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

पण विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत एका लेखी उत्तरात सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनीच गेल्या 5 वर्षांमध्ये सेप्टिक टँक और सीवर (गटार) स्वच्छ करताना 340 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. ही आकडेवारी 31 डिसेंबर 2020 पर्यंतची होती.

2010 पासून मार्च 2020 पर्यंत म्हणजे 10 वर्षांत 631 जणांचा सेप्टिक टँक आणि गटार स्वच्छ करताना मृत्यू झाल्याचं राष्ट्रीय स्वच्छता कर्मचारी आयोग या सरकारी संस्थेनं 2020 च्या अहवालात तसं म्हटलं आहे.

पण आता सरकारनं गेल्या 5 वर्षांत यामुळं एकही मृत्यू झाला नसल्याचं म्हटलं आहे.

सरकारनं 2013 मध्ये मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग (हातानं मैला उचलणं) प्रतिबंध आणि पुनर्वसन अधिनियम लागू केला आहे. त्यात सरकारनं 'मॅन्युअल स्कॅव्हेंजर'ची व्याख्या स्पष्ट केली आहे.

या व्याख्येनुसार "एखाद्या व्यक्तीला स्थानिक अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे मानवी मल-मूत्र जमा होत असेल अशा मोकळ्या नाल्या, गटारं किंवा खड्डे स्वच्छ करायला लावल्यास, त्या व्यक्तीला 'मॅन्युअल स्केव्हेंजर' म्हटलं जाईल."

या कायद्याच्या तिसऱ्या भागातील सातव्या मुद्द्यानुसार कोणताही स्थानिक अधिकारी किंवा दुसरा कोणताही व्यक्ती, इतर कोणालाही सेप्टिक टँक किंवा गटारीमध्ये धोकायदायक असणारं स्वच्छतेचं काम सांगू शकत नाही.

या कायद्यात सेप्टिक टँक आणि गटारींच्या संदर्भात 'धोकादायक स्वच्छता' म्हणजे काय, हेही स्पष्ट केलं आहे.

याचाच अर्थ म्हणजे स्थानिक प्रशासनांना हातानं मैला स्वच्छ करण्याची पद्धत बंद करण्यासाठी गटारी आणि सेप्टिक टँकच्या स्वच्छतेसाठी अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करावा लागेल. कोणताही कंत्राटदार किंवा प्रशासनाचे अधिकारी सुरक्षेची उपकरणं न देता सेप्टिक टँक आणि गटारींची स्वच्छता करायला लावू शकत नाहीत. त्यावर पूर्णपणे बंदी आहे.

पण गटारी आणि सेप्टिक टँकच्या स्वच्छतेदरम्यान बहुतांश स्वच्छता कर्मचाऱ्यांना गटारीच्या आत जावंच लागतं, ही प्रत्यक्ष परिस्थिती आहे.

'यावर्षी आतापर्यंत 26 मृत्यू'

स्वच्छता कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेजवाडा विल्सन यांनी बीबीसीबरोबर बोलताना स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. ''गेल्या पाच वर्षांमध्ये अशाप्रकारे गटारांची स्वच्छता करताना 472 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे,'' असं विल्सन म्हणाले.

''यापूर्वी सरकारनं 340 जणांचा मृत्यू झाल्याचं मान्य केलं होतं. पण त्यातही 132 जणांच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही. यावर्षी 2021 मध्ये आतापर्यंत अशाप्रकारे गटारांची स्वच्छता करताना 26 जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे आतापर्यंत एकूण 498 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारनं मात्र हा आकडा पूर्णपणे फेटाळला आहे."

''सरकार आधीही म्हणत होतं की, देशात आता हातानं मैला वाहून नेण्याचे प्रकार संपले आहेत. पण सुप्रीम कोर्टानं असे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे पुरावे असल्याचं सांगितलं. त्यानंतर सरकारनं 2013 मध्ये कायदा केला,'' असं विल्सन म्हणाले.

''आता कोर्टानं या प्रकरणी दखल देणं बंद केलं आहे. त्यामुळं सरकार पुन्हा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग सुरुच नसून त्यामुळं कोणी मरत नसल्याचं सांगत आहेत.

''पण विचार करा की, लोकांचा जीव जात आहे आणि एक मंत्री किंवा खासदार अशाप्रकारे मृत्यू झालेच नाही, असं सांगत आहेत.''

व्याख्येवर प्रश्नचिन्हं

सरकार तांत्रिक व्याख्येच्या हवाल्यानं हा दावा करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारनं संसदेत 340 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा सादर केला त्यावेळी त्यात 'मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग' शब्द न वापरता 'सीवर आणि सेप्टिक टँकेची स्वच्छता' असा शब्द वापरण्यात आला होता.

म्हणजे 2013 च्या कायद्यात तरतूद असूनही सरकार गटारी स्वच्छ करणाऱ्यांना मॅन्युअल स्कॅव्हेंजर म्हणत नसल्याचं समोर येत आहे.

''मॅन्युअल स्कॅवेंजिंग म्हणजे हातानं मैला वाहून नेणं असतं, असं म्हणत हे लोकं व्याख्या पुढं करत आहेत. पण जे लोक गटारांच्या आत प्रवेश करतात, ते मैला स्पर्श न करता काम करतात का? उलट ते तर पूर्णपणे मैला असलेल्या पाण्यात उतरतात,'' असं विल्सन म्हणाले.

''कायदा असं सांगतो की, मानवी मल-मूत्र, गटार सेप्टिक टँक कोणत्याही प्रकारे हातानं स्वच्छ केलं जात असेल तर त्यावर बंदी आहे. त्यामुळं व्याख्येचा विचार करताही दावा खोटा ठरतो. लोकांच्या जीवाशी असं खेळता येऊ शकत नाही, हे त्यांना लक्षात घ्यावं लागेल.''

''सरकार तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं लोकं मरत असल्याचंही मान्य करायला तयार नाही. मग आपण जे पाहत आहोत ते काय आहे? सगळं काही सरकारनं सांगितलं तरच खरं ठरेल का. माहिती उपलब्ध नाही हे सांगणं ही सर्वांत सोपी पद्धत आहे. कारण त्यामुळं त्रास आणि प्रश्नांपासून बचाव होतो. कारण तुम्ही माहिती सादर केली तर प्रश्न उपस्थित केले जातील.

''तसंच माहिती चूक असली तरीही लोक प्रश्न उपस्थित करतील. त्यापेक्षा असं झालं नाही आणि माहितीच उपलब्ध नाही हे सांगून मोकळं होणं चांगलं. जबाबदारीपासून दूर पळण्याचा यापेक्षा सोपा मार्ग काय असेल?'' असं बेजवाडा विल्सन म्हणाले.

सरकार मान्य करत नसलेले मृत्यू

जानेवारी 2019 मध्ये बीबीसीनं किशनलाल यांच्या पत्नी इंदुदेवींची भेट घेतली होती. त्या तीन मुलांसह तिमारपूरमधील झोपडीत बसल्या होत्या. कुटुंबातील एकमेव कमावते असलेले किशनलाल यांचा नालेसफाई करताना मृत्यू झाला होता. स्वच्छता करताना त्यांना बांबूदेखील देण्यात आला नाही, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

एका सरकारी अहवालानुसार 23 नोव्हेंबर 2019 मध्ये अशोक नावाच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा विषारी वायूमुळं श्वास गुदमरून मृत्यू झाला होती. अशोक हे दिल्लीच्या शकुरपूरमध्ये एका गटाराची स्वच्छता करत होते.

26 जून 2019 ला हरियाणाच्या रोहतकमध्ये गटार स्वच्छ करताना 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

28 ऑगस्ट 2019 ला उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गटार स्वच्छ करताना मृत्यू झाला होता.

फेब्रुवारी 2020 मध्ये 15 फूट खोल गटार स्वच्छ करताना 24 वर्षांच्या रवीचा मृत्यू झाला होता. दिल्लीच्या शहादरा परिसरात रवी आणि 35 वर्षांच्या संजय यांना गटाराच्या स्वच्छतेचं काम मिळालं होतं. पण त्यादरम्यान रवीचा विषारी वायूमुळं गुदमरून मृत्यू झाला. संजयला वेळीत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं त्याचा जीव वाचू शकला.

मार्च 2021 मध्ये दिल्लीच्या गाझीपूरमध्ये एंपरर बॅन्क्वेट हॉलच्या गटाराची स्वच्छता करण्याचं काम 1500 रुपयांच्या मोबदल्यात लोकेश आणि प्रेमचंद यांना देण्यात आलं होतं. पण त्या दोघांचा गटारात जीव गुदमरून मृत्यू झाला.

28 मे 2021 रोजी 21 वर्षांच्या एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याचं कारण म्हणजे कंत्राटदारानं सुरक्षेची काहीही काळजी न घेता त्याला गटारात उतरवलं होतं.

गटारात उतरून स्वच्छता केल्यामुळं मृत्यू झालेल्यापैकी काही जणांची ही नावं आहेत. अशा प्रकारे मृत्यू येणाऱ्यांची यादी मोठी आहे. पण सरकारी कागदपत्रांमध्ये यांना स्थान मिळालेलं नाही.

यांची नावंच काय पण सरकारकडं त्यांच्या संख्येचाही हिशेब नाही. केंद्र सरकारच्या मते, यांच्यापैकी कुणाचाही मृत्यू हातानं मैला वाहून नेल्यानं किंवा गटार स्वच्छ करताना झालेला नाही.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top