Saturday, 31 Jul, 2.28 pm BBC News मराठी

होम
मोहनजोदाडो समरीन सोलंगी : मातीला हात लावताच 'सोनं' बनवणारी महिला

समरीन सोलंगीचा जन्म झाला तेव्हा तिच्या आजीनं म्हटलं होतं, "ही सोन्याची बोटं असलेली मुलगी आहे."

विशेष म्हणजे समरीननं जेव्हा मातीला हात लावले, तेव्हा खरंच त्याचं सोनं केलं.

समरीन सोलंगी मोहनजोदाडो जवळच्या हाजी लाल बख्श शेख गावात राहते. ती चिकण मातीपासून मोहनजोदाडोच्या खोदकामातून मिळालेल्या मूर्ती आणि नाण्यांच्या शैलीसारख्या वस्तू बनवते.

20 वर्षांच्या समरीनचे काका आणि वडीलही मोहनजोदाडोमध्ये पुजारी, नर्तकी, नाणी आणि हत्तींच्या शैलीतील शिल्प (कलाकृती) बनवत होते. त्यांनी पुरातत्व विभागात काम करणाऱ्या त्यांच्या वडिलांकडून हे काम शिकलं.

समरीनला बालपणापासूनच मातीच्या वस्तू बनवण्याची आवड होती. त्यामुळं ती शाळेत गेली नाही आणि तिनं तेच काम सुरू केलं.

आता मातीपासून सर्वकाही तयार करते, असं तिनं सांगितलं.

नदीची माती

हाजी लाल बख्श शेख गाव सिंधू नदीच्या जवळ आहे. त्याठिकाणाहून ती चिकन माती आणते.

माती आधी सुकवली जाते. त्यानंतर ती पुन्हा कुटून बारीक केली जाते. या अत्यंत बारीक आणि मऊ मातीला मैदा म्हणतात.

समरीनच्या मते, मैदा काढल्यानंतर उर्वरित मातीत पाणी टाकून ती मळली जाते.

तिच्याकडे पुजारी किंवा किंग प्रीस्टचा साचा आहे. पण इतर वस्तू हातानेच तयार केल्या जातात.

त्या तयार करून वाळवण्यासाठी ठेवल्या जातात. उन्हाळ्यात एक-दीड दिवसात तर हिवाळ्यात दोन ते तीन दिवसांत त्या वाळतात.

मातीचे दागिने

मातीपासून तयार केलेले दागिने परिधान करण्याची परंपरा मोहनजोदाडो पासून हजारो वर्षं जुनी होती. पण नुकताच त्याचा पुन्हा ट्रेंड आला असून या दागिन्यांची सध्या फॅशन आहे.

भारत, पाकिस्तानसह अनेक देशांत असे दागिने तयार केले जातात.

सिंध रोल सपोर्ट ऑर्गेनायझेशन नावाच्या एका सामाजिक संस्थेनं दागिने बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याचं समरीन सांगते. तीन दिवसांच्या प्रशिक्षणात तिच्याबरोबर जवळपास 10 मुली होत्या. त्यांना ट्रेनिंगमध्ये ज्या वस्तू तयार करायला शिकवण्यात आलं, त्याची जणू समरीननं मेंदूत ब्लू प्रिंट तयार करून घेतली होती, असंही ती सांगते.

आता ती मातीपासून कानातल्या बाळ्या, झुमके आणि इतर दागिने तयार करते. ते बनवण्यासाठी तिच्याकडं विशेष उपकरणं नाहीत. केवळ एक तुटलेला चाकू, बॉलपॉइंट केस आणि एक बॉक्स आहे. त्यापासून त्या गोलआकार वगैरे तयार करतात. हे सर्व ती एखाद्या स्टुडिओ किंवा कारखान्यात तयार करत नाही तर तिच्या अगदी साध्या घराच्या आंगणात तयार करतात.

"आधी मी झुमक्याचे घुंगरू आणि वरचा गोल भाग तयार करते. त्यानंतर खाली कप्पा तयार करून पेनाने त्याचे डिझाईन तयार करते. हे दोन्ही भाग जोडून वाळण्यासाठी सोडून देते. त्यानंतर शेणाच्या गोवऱ्यांच्या मदतीनं ते भाजते आणि सकाळपर्यंत ते तयार होतात," असं ती सांगते.

मातीच्या या दागिन्यांवर सर्व प्रकारच्या रंगांचा वापर केला जातो. पण झुमक्यांना विशेषतः सोनेरी किंवा चांदीचा रंग अधिक वापरला जातो. समरीनच्या मते, त्यावर सोनेरी रंग लावल्यानंतर लाल आणि हिरवे रंग लावले जातात. त्यामुळं ते आकर्षक दिसू लागतात.

'कोरोनानं सोशल मीडियाकडं केलं आकर्षित'

समरीनच्या घराचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून होता. पण कोरोनामुळं त्याला प्रचंड फटका बसला.

पर्यटक उन्हाळ्यात कमी आणि हिवाळ्यात जास्त असायचे, पण कोरोनामुळं इथं पर्यटक येणंच बंद झालं, असं ती सांगते.

त्यामुळं आता तिनं तयार केलेल्या मूर्ती, दागिने वस्तू विक्री होत नाहीत.

सक्खरमधील एक विद्यार्थिनी अक्सा शोरो हिनं समरीन सोलंगीची मदत केली. तिला सोशल मीडियाची ओळख करून दिली.

त्यामुळं तिच्या या कलेला लोकप्रियता मिळाली आणि आता तिला मातीच्या या वस्तू आणि दागिन्यांच्या ऑर्डर मिळत आहेत.

'मी बाबाचा मुलगाच'

समरीनच्या वडिलांना मिळालेली ही कला त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेला वारसा आहे. समरीनला 6 बहिणी आहेत, पण भाऊ नाही.

''भावाची कमतरता तर भासतेच. भाऊ हा भाऊच असतो. मला वाटतं आम्ही बाबाचे मुलंच आहोत आणि आम्ही मुलांचंच काम करतो. बाबाला आम्ही कधी मुलाची कमतरता भासू दिली नाही. मुलं हे मुलं असतात. पण तसाच विचार केला तर मुलीही मुलांची भूमिका पार पाडू शकतात."

समरीनच्या वडिलांची तब्येत ठिक राहत नाही. ते काम करत नाही. पण या कामात ते मुलींची मदत करतात. समरीन आणि त्यांच्या बहिणी त्यांची काळजी घेतात.

समरीन सकाळी लवकर उठते आणि मातीपासून कधी मूर्ती, तर कधी दागिने नाणी तयार करायला लागते. एक झुमका तयार करायला एक तास लागतो. रंग देऊन पूर्ण झाल्यानंतर झुमक्यांची किंमत तीनशे रुपये आहे.

"जे पैसे मिळतात त्यातून केवळ घरखर्च चालतो. कारण घरातील किराण्याशिवाय रंग आणि इतर सामानाबरोबरच पॅकिंगचा खर्चही होतो," असं समरीन सांगते.

समरीनला मी तिचं स्वप्न काय? असं विचारलं. त्यावर तिने, ''माझी तर काहीच इच्छा नाही," असं हसतच म्हटलं.

''काही तर इच्छा असेल,'' असं मी विचारलं. त्यावर ती पुन्हा हसली आणि कुटुंबाला आणि बहिणींना आनंदी पाहायचं आहे, असं तिनं म्हटलं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top