Wednesday, 23 Sep, 11.33 am BBC मराठी

होम
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई आणि ठाणे परिसरात मंगळवारी (22 सप्टेंबर) रात्रभर पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. मुंबईत सायन-माटुंगा रोड, परळ, दादर हिंदमाता, चुनाभट्टी, कुर्ला, अंधेरी सबवे, गोरेगाव अशा अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

कुलाबा वेधशाळेकडून पुढील 24 तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

नायर रुग्णालयात पाणी

मुंबईच्या नायर रुग्णालयात पावसाचं पाणी भरलं आहे. कोव्हिडच्या ओपीडीमध्ये पाणी भरल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

याबाबत बीबीसीशी बोलताना नायर रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. शैलेश मोहिते म्हणाले "नायर रुग्णालयात गुडघाभर पाणी भरलं आहे. निवासी डॉक्टरांना रुग्णालयात नेण्यासाठी अम्ब्युलन्सचा वापर करावा लागला आहे. पाणी काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे. कोव्हिड-19 ची स्वॅब ओपीडी पाणी भरल्याने बंद करून कॅजुल्टीमध्ये घेण्यात येत आहे."

मध्य आणि हार्बल रेल्वेवर काही रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेकडून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही विशेष गाड्या सोडल्या जात आहेत. या रेल्वेमधून जाणारे अनेक प्रवासी सायन, ठाणे सारख्या रेल्वे स्थानकांवर खोळंबले आहेत.

बस आणि रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याने कामावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

रेल्वे सेवा विस्कळीत

मध्य रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी, कुर्ला, सायन स्थानकांदरम्यान रेल्वेरुळावर पाणी साचल्याने सीएसएमटी - ठाणे आणि सीएसएमटी - वाशी हे दोन रेल्वे मार्ग तुर्तास बंद करण्यात आले आहेत. तर ठाणे ते कल्याण आणि वाशी-पनवेल मार्गावरील शटल रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार सुरू आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-अंधेरी दरम्यान लांब पल्ल्याची वाहतूक सध्या बंद आहे. पण लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक नव्याने प्रसिद्ध केलं जाईल अशीही माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

बेस्ट बस मार्ग वळवले

मुंबईत धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्ग वळवले आहेत. दादर, परळ, सायन, माटुंगा, गोरेगाव, अंधेरी अशा अनेक परिसरात पाणी साचल्याने बेस्टचं वेळापत्रकही कोलमडलं आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस वाहतूक खालीलप्रमाणे वळवण्यात आली आहे:

- उड्डाणपुलामार्गे हिंदमाता आणि भोईवाडा मार्गे शिवडी

- भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट

- सायन मेन रोडमार्गे सायन रोड 24

- मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)

- लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार

- भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव

- जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

कुलाबा वेधशाळेकडून मंगळवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. कुलाबा वेधशाळेचे संचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सकाळी 5.30 वाजेपर्यंत कुलाब्यात 122.2 मिमी आणि सांताक्रूझमध्ये 273.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top