होम
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्जप्रकरणी NCB कडून अटक

राज्याचे कौशल्य विकास मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या प्रकरणी नवाब मलिक यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. त्यांच्या पत्नीशी संपर्क साधला असता, त्यांनी सध्या या विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ड्रग्जच्या प्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं.
समीर खान बुधवारी (13 जानेवारी) सकाळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहोचले होते.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रसिद्ध केलेल्या एका प्रेस रिलिजनुसार, 'समीर खान यांना ड्रग्ज प्रकरणातील चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.'
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार, 3 जानेवारीला बांद्रा पश्चिम परिसरातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता. करन सजनानी यांच्या घरातून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. करण सजनानी, राहिला फर्निचरवाला, आणि राम कुमार तिवारी यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. यांच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आलं होतं.'
source: bbc.com/marathi