Thursday, 29 Oct, 12.56 pm BBC मराठी

होम
निकिता तोमर: संशयित मारेकऱ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दिवसा-ढवळ्या 21 वर्षीय मुलीची हत्या झाल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात फरिदाबाद पोलिसांनी दोन जणांना अटक केली. निकिता तोमर असं या मुलीचं नाव होतं आणि ती कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्या मारेकऱ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली.

ही या प्रकरणातील तिसरी अटक आहे. मारेकऱ्यांना पिस्तुल पुरवणाऱ्या व्यक्तीचं नाव अझरू आहे असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे मारले. त्यानंतर अझरू सापडला असं सांगण्यात आलं आहे.

हरियाणामधल्या फरिदाबाद जिल्ह्यात 28 ऑक्टोबरला 21 वर्षांच्या मुलीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्याचं हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी म्हटल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

फरिदाबाद जिल्ह्यातल्या अगरवाल कॉलेजबाहेर दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली.

निकिता तोमर असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. ती बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. परीक्षा देऊन कॉलेजमधून बाहेर पडल्यावर दोन तरुणांनी पिस्तुलाचा धाक दाखवत तिला गाडीत नेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यावर त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या.

या हल्ल्यात निकिता गंभीर जखमी झाली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महाविद्यालयाबाहेरचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.

या प्रकरणी फरिदाबाद पोलिसांनी तौसिफ आणि रेहान, नावाच्या दोन तरूणांना अटक केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या प्रकरणातला तौसिफ हा आरोपी निकिताच्याच शाळेत शिकायचा.

गेले काही महिने तो निकिताला त्रास देत होता, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आकसातून आपल्या बहिणीची हत्या करण्यात आल्याचं निकिताच्या भावाने पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.

2018 सालीसुद्धा तौसिफविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, नंतर सामोपचाराने प्रकरण मिटवण्यात आलं होतं.

तोमर कुटुंबीयांचा दावा आहे की तौसिफच्या कुटुंबीयांकडे राजकीय पाठबळ आहे त्यामुळे त्यांनी धमकावून आम्हाला हे प्रकरण मिटवायला लावलं होतं.

आरोपी निकिताला गेल्या कित्येक महिन्यांपासून त्रास देत होता असं निकिताच्या वडिलांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

वल्लभगडमध्ये रास्ता रोको

वल्लभगडमध्ये रास्ता रोकोदरम्यान, घटनेनंतर वल्लभगढमध्ये तणावाचं वातावरण आहे. घटनेचा निषेध करणाऱ्या संतप्त जमावाने दुकानाची तोडफोडही केल्याचं समजतं. यानंतर पोलिसांनी जमावाला शांत केल्यानंतर निदर्शकांनी रास्तारोको केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. यात पीडित मुलीचे कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणीही सहभागी झाले होत्या.

राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची दखल घेत या प्रकरणातल्या आणखी एका आरोपीला अटक करण्याची मागणी पत्र हरियाणा पोलिसांना पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

तोमर कुटुंबीयांना न्याय मिळेल असं आश्वासन हरियाणाचे गृह मंत्री अनिल विज यांनी म्हटलं आहे.

महिलांविरोधात वाढते गुन्हे

राजधानी दिल्लीपासून अगदी जवळ हरियाणातील ही घटना धक्कादायक आहेच, पण अलिकडे अशा अनेक घटनांनी देशातील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऑक्टोर महिन्यातच उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका मुलीचा बलात्कार करून तिला मारहाण झाल्याची घटना घडली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्यानंतर उ.प्र. पोलिसांनी मध्यरात्री तिच्यावर अंत्यसंस्कार केल्याने प्रकरणाने वेगळंच वळण घेतलं. तपासादरम्यान उ. प्र. प्रशासनाने त्या मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचं सांगितल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत गेला. अजूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याची घटना घडली होती ज्यानंतर संतापाची लाट उसळली होती. गावकऱ्यांनी आरोपीला आपल्या हवाली करण्याची मागणी करत निदर्शनं केली होती. राज्य सरकारने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या 29 सप्टेंबरला प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटलंय की 2019 साली 2018 सालच्या तुलनेत महिलांविरुद्धचे गुन्हे 7.3 टक्क्यांनी वाढले. महिलांवर बलात्कार करून त्यांना मारून टाकण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वांत जास्त असल्याचा NCRBचा अहवाल आहे. 2019मध्ये महाराष्ट्रामध्ये बलात्कार करून खून करण्याची 47 प्रकरणं घडली.

उत्तर प्रदेशामध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. उत्तर प्रदेशात 59,853 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. नवरा वा नातेवाईकांकडून अत्याचार, महिलेवर विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणं, महिलांचं अपहरण वा जबरदस्तीने नेणं आणि बलात्कारासाठीच्या कलमांखाली बहुतेक गुन्ह्यांची नोंद झाल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या अहवालात म्हटलंय.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top