Saturday, 25 Sep, 10.33 am BBC News मराठी

भारत
ओमप्रकाश मिश्रा कोण आहे, ज्याच्यावर न्यूझीलंडला धमकी दिल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे...

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने आपला पाकिस्तान दौरा एकही न सामना खेळता अचानक रद्द केला होता. या प्रकरणाशी भारताचा संबंध असल्याचा आरोप पाकिस्तानातून होत आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाला धमकीवजा संदेश पाठवण्यासाठीचे डिव्हाईस आणि ई-मेल आयडी भारतातून चालवण्यात येत होते, असा दावा पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी केला आहे.

मुंबईच्या ओमप्रकाश मिश्राने न्यूझीलंड संघाला मेल केला, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.

पण भारतातील सोशल मीडिया युझर्स हे प्रकरण गांभीर्याने घेत नसल्याचं दिसून येतं. ओम प्रकाश मिश्राचं नाव आणि फोटो यांच्याबाबत अनेक मजेशीर मीम्स बनवण्यात येत आहेत.

त्याला कारणही तसंच आहे. भारतात ओम प्रकाश मिश्राची ओळख एक युट्यूबर आणि रिअॅलिटी शो स्पर्धक म्हणून आहे. त्याच्या काही गंमतीशीर गाण्यांमुळे त्याला इंडियन ताहीर शाह म्हणून उपाधी देण्यात आलेली आहे.

फवाद चौधरी काय म्हणाले?

फवाद चौधरी यांनी बुधवारी (22 सप्टेंबर) एक पत्रकार परिषद घेतली होती. न्यूझीलंड संघाला भारतीय ईमेल अकाऊंटवरून धमकी देण्यात आली, असं चौधरी यांनी यावेळी सांगितलं.

बहुतांश ईमेल आयडी आणि ईमेल हिंदी नावांवरून बनवण्यात आले आहेत. उदा. चित्रपट, नाटक आणि संगीताशी संबंधित हिंदी नावे.

ते म्हणाले, "ज्या मोबाईल डिव्हाईलमधून हे आयडी आणि अकाऊंट चालवण्यात आले. ते ऑगस्ट 2019 मध्ये भारतात सुरू झाले होते. त्यातलं सीमकार्ड 2019 मध्ये नोंदणीकृत झालं होतं. याचा वापर केवळ एकाच व्यक्तीकडून झाला आहे, याची आम्हाला खात्री पटली आहे."

चौधरी यांच्या माहितीनुसार, न्यूझीलंड संघाला धमकी देण्यासाठीचा मेल आयडी महाराष्ट्रातून चालवला जात होता. त्या मागे ओम प्रकाश मिश्रा याचा हात आहे.

फवाद चौधरी म्हणाले, "न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलच्या पत्नीला एक मेल आला. त्यामध्ये तुझ्या पतीला पाकिस्तानात ठार केलं जाईल, अशी धमकी देण्यात आली होती. याचा आम्ही तपास केला. तर हा मेल आयडी कोणत्याही सोशल मीडिया नेटवर्कशी संबंधित नसल्याचं आम्हाला आढळून आलं."

या अकाऊंटशी संबंधित अधिक माहिती घेतल्यानंतर तसंच सोशल मीडियावर केलेल्या निरीक्षणातून आम्हाला यामागे मुंबईचे ओम प्रकाश मिश्रा असू शकतात, हे समजलं आहे.

ओमप्रकाश मिश्रा कोण आहे, त्याची प्रतिक्रिया काय?

पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी ओम प्रकाश मिश्राचं नाव आणि फोटो पत्रकार परिषदेत दाखवला.

पण हे नाव समोर आल्यानंतर त्याबाबत भारतातील सोशल मीडिया युझर्स गांभीर्य व्यक्त करण्याऐवजी त्यावर अनेक मजेशीर मीम्स बनवत आहेत.

ओमप्रकाश मिश्रा हा एक युट्यूबर आहे. तो 2016 मध्ये एका विचित्र अशा गाण्यामुळे चर्चेत आला होता. त्या गाण्याला आतापर्यंत 68 लाख व्ह्यू मिळाले आहेत.

हे गाणं मिश्रा याच्या इतर सर्व गाण्यांपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं.

ओमप्रकाश मिश्रा इंडियन आयडॉल आणि एमटीव्ही ऑफ स्पेस या रिअॅलिटी शोंमध्येही दिसला होता.

ओमप्रकाश मिश्रा युट्यूबवर स्वतःला रॅप किंग म्हणवून घेतो. त्याच्या गाण्यांची तुलना ढिनचॅक पूजा आणि पाकिस्तानी गायक ताहीर शाह याच्याशी केली जाते. काहीजण तर त्याला इंडियन ताहीर शाह म्हणतात.

या संपूर्ण प्रकरणामुळे ओम प्रकाश मिश्राचं नाव मात्र सोशल मीडियावर ट्रेंड करू लागलं आहे.

म्हणून पाकिस्तानच्या आरोपांमुळे ओम प्रकाश मिश्रा उलट आनंदातच असल्याचं दिसून येत आहे.

त्याने आपल्या इंस्टाग्रॅम अकाऊंटवर अनेक व्हीडिओ पोस्ट केले. एका व्हीडिओत तो म्हणतो, "एका नावाने संपूर्ण पाकिस्तानला हादरा दिला."

दुसऱ्या एका व्हीडिओत तो म्हणतो, "मला अभिमान आहे. तुमचा भाऊ ट्रेंड होत आहे."

पण, पाकिस्तानच्या मंत्र्यांनी केलेल्या आरोपांवर ओमप्रकाशने कोणतंच स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही.

बोल ना पाकिस्तान, ईमेल भेजूँ क्या?

पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या दस्तऐवजांनुसार, धमकी देण्यासाठी ओमप्रकाश मिश्राचं डिव्हाईस वापरण्यात आलं. त्यानंतर हे नाव चर्चेचा विषय बनलं.

लोक उत्सुकतेने ओमप्रकाश मिश्राचं नाव सोशल मीडियावर वारंवार शोधत आहेत. त्यामुळे हे नाव सध्या ट्रेंडिंगवर आहे.

ट्वीटरवर शुभांगी शर्मा नामक युझरने त्याचा फोटो शेअर करताना लिहिलं, "पाकिस्तानने भारतीय युट्यूबर ओमप्रकाश मिश्रावर पाकिस्तानी क्रिकेटचं नाव खराब केल्याचा आरोप केला आहे."

पाकिस्तानी एजन्सींने न्यूझीलंड संघाला पाठवण्यात आलेल्या धमकीच्या संदर्भात त्याचा फोटो आणि नाव वापरला आहे.

एक युझरने लिहिलं, "तो विचार करत असेल की, कमाल आहे, मी हे कधी लिहिलं?"

रजनीश चौधरी यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "ओम प्रकाशच्या पुढील गाण्याचे बोल असे असावेत, "बोल ना पाकिस्तान, ईमेल भेजूँ क्या?"

सरमद नामक एका युझरने म्हटलं, "ओमप्रकाश मिश्राच्या वाईट गाण्यांची चेष्टा करणारे भारतीय आज त्याचं कौतुक करत आहेत."

ओमप्रकाशचा एडीट करण्यात आलेला एक फोटोही शेअर केला जात आहे. या फोटोत तो जगभरातील नेत्यांना सल्ला देताना दिसतो.

एका फोटोत तो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना सल्ला देत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलताना दिसतो.

त्याशिवाय एका एडिट केलेल्या फोटोत ओमप्रकाश चक्क भारताच्या राष्ट्रपतींकडून पुरस्कार घेत असल्याचं दिसतं.

न्यूझीलंडनंतर इंग्लंडच्या क्रिकेट संघांनेही पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. त्यामुळे पाकिस्तानात सध्या निराशा आणि संतापाचं वातावरण आहे.

न्यूझीलंडच्या क्रिकेट संघटनेचे प्रमुख म्हणाले, "त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला धोक्याबाबत कळवलं होतं. पण या गोष्टी सार्वजनिकरित्या सांगता येणार नाहीत."

इंग्लंड संघाने आपल्या पुरुष आणि महिला संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण बायो बबल आणि खेळाडूंच्या मानसिक आरोग्याशी संबंधित आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top