Friday, 04 Dec, 9.33 pm BBC मराठी

होम
पदवीधर निवडणूक निकाल: अमरावतीतून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.

मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर अमरावतीमधून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले आहेत.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आघाडीच्या उमेदवारांचीच सरशी झाली आहे.

पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड तर पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रा. जयंत आसगांवकर विजयी झाले आहेत.

अमरावमतीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक शिक्षक मतदारसंघातून 3242 मतांनी विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. किरण सरनाईक यांना 12,433 मतं मिळाली तर श्रीकांत देशपांडे यांना 9191 मतं मिळाली. याबाबतची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.

हिंमत असल्याचं एकटं लढा - पाटील

या निवडणुकीतल्या महाविकास आघाडीच्या यशानंतर त्यांनी हिंमत असल्यास एकटं लढावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

तीन डिसेंबर रोजी धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला. भाजपचे अमरिश पटेल यात विजयी झाले आहेत.

तीन डिसेंबरला रात्री उशिरा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल समजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा जिंकले आहेत. त्यांनो मोठ्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप पहिल्यांदाच समोरासमोर लढले आहेत.

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती.

अमरिश पटेल विजयी

धुळे-नंदुरबारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या पोट-निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल जिंकले आहेत.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 115 मत फुटले. भाजपाला 199 तर महाविकास आघाडीचे 113 मतदान झाले.

महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव झाला असल्याचे म्हटले जात आहे.

एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते प्रभाव पाडतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते.

निवडणुकीच्या रिंगणातील भाजपचे उमेदवार-

अमरावती शिक्षक मतदारसंघ - डॉ. नितीन धांडे

पुणे पदवीधर मतदारसंघ - संग्राम देशमुख

पुणे शिक्षक मतदारसंघ - जितेंद्र पवार (भाजप पुरस्कृत अपक्ष)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - शिरीष बोराळकर

नागपूर पदवीधर मतदारसंघ - संदीप जोशी

महाविकास आघाडीचे उमेदवार

अमरावती शिक्षक मतदारसंघ - श्रीकांत देशपांडे (शिवसेना)

पुणे पदवीधर मतदारसंघ - अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस)

पुणे शिक्षक मतदारसंघ - प्रा. जयंत आसगांवकर (काँग्रेस)

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ - सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)

नागपूर पदवीधर मतदारसंघ - अभिजीत वंजारी (काँग्रेस)

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी कोण करतं मतदान?

या निवडणुकीसाठी मतदान करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधी नोंदणी करावी लागते.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नवीन नोंदणी असते आणि बॅलट म्हणजे मतपत्रिकेवर शिक्का मारूनच मतदान होतं. त्यामुळे मतदारसंघात हजर राहून मतदान करणं आवश्यक आहे.

मतदारासाठीचे निकष काय आहेत ते ही पाहूया...

1. मतदार भारतीय नागरिक असावा

2. मतदारसंघाचा रहिवासी असावा

3. निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षं आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

4. विहित फॉर्म 18 भरावा लागेल

आपल्याकडे पदवीधर मतदारसंघाविषयी फारशी जागृती मतदारांमध्ये दिसत नाही. म्हणजे असं की, 2000 पासूनच्या मतदानाचा आकडा बघितला या निवडणुकीत सरासरी 20-25 हजार इतकंच मतदान होतं.

तुम्ही पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएट असाल तर या निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे का? यंदाच्या नोंदणीची मुदत तर संपलीय. पण, इथून पुढे करायची असेल तर या लिंकवर क्लिक करा.

पण जर कमी लोक मतदान करत असतील, तर पदवीधर मतदार संघ निर्माण करण्याचं उद्दिष्ट सफल होतं का?

कमी मतदानाबरोबरच राज्यशास्त्राचे अभ्यासक अॅडव्होकेट सौरभ गणपत्ये यांना काळजी वाटते ती बदललेल्या निवडणूक प्रक्रियेची. "इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीचाही बाजार झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला, मग तो नातेवाईक असो किंवा जवळचा कार्यकर्ता किंवा विधानसभेच्या निवडणुकीत नाराज असलेला नेता अशा लोकांचा पक्षाकडून पदवीधर मतदारसंघासाठी विचार होतो," गणपत्ये यांनी आपलं म्हणणं मांडलं.

वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top