Monday, 13 Jul, 1.45 pm BBC मराठी

होम
पद्मनाभस्वामी मंदिर : व्यवस्थापनाचे अधिकार त्रावणकोरच्या राजघराण्याकडे कायम

केरळमधल्या तिरुअनन्तपुरम इथल्या पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाचे अधिकार हे त्रावणकोरच्या राजघराण्याकडेच कायम राहतील, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे. त्रावणकोरच्या राजघराण्यानं केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे स्पष्ट केलं, की शासकाचा मृत्यू झाला तरीही पद्मनाभस्वामी मंदिराच्या शबैत अर्थात व्यवस्थापनाचा अधिकार हा प्रथेप्रमाणे राजघराण्याकडेच कायम राहील.

मंदिराच्या व्यवस्थापनासाठी तिरुअनन्तपुरमच्या जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षेतेखाली नेमलेल्या अंतरिम समितीला न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मान्यता दिली आहे.

नवीन समिती स्थापन होईपर्यंत मंदिराच्या व्यवस्थापनाचं काम या समितीकडून सांभाळलं जाईल.

त्रावणकोरचे शेवटचे शासक त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजेच 20 जुलै 1991 पर्यंत श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाहत होते.

मंदिराच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता आढळल्याने मंदिराच्या व्यवस्थापनाचा वाद हा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता.

31 जानेवारी 2011ला केरळ उच्च न्यायालयानं मंदिराचा कारभार, मालमत्ता आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना राज्य सरकारला केली होती, जेणेकरून मंदिराचा कारभार हा परंपरेनुसार चालेल. केरळ उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

2 मे 2011 ला सर्वोच्च न्यायालयानं मंदिराची मालमत्ता आणि व्यवस्थापनासंबंधीच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

सर्वोच्च न्यायालयानं केरळ सरकारला A ते F क्रमांकाच्या व्हॉल्टमधील सर्व मौल्यवान वस्तू, दागिने, खडे या सगळ्याची यादी बनविण्याची सूचनाही केली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष आदेशाशिवाय व्हॉल्ट B उघडता येणार नाही, असं केरळ सरकारनं सांगितलं होतं.

2011 साली सर्वोच्च न्यायालयानं पाठवलेल्या टीमच्या देखरेखीखाली अन्य पाच व्हॉल्टही उघडण्यात आले. दागिने, मूर्ती, शस्त्रास्त्रं, भांडी, नाणी या स्वरुपातील मंदिराच्या संपत्तीचं एकूण मूल्य 1 लाख कोटी असल्याचं समोर आलं.

त्रावणकोरचे राजे मार्तंड वर्मा यांचे वंशजच गेली अनेक शतकं या प्राचीन मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

हेही नक्की वाचा

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top