Thursday, 29 Oct, 11.31 am BBC मराठी

होम
पाकिस्तानातल्या दोन बहिणी ज्या लिंग बदलून भाऊ बनल्या...

"मी इस्लामाबादमध्ये मुलगा बनून गावी पोहोचलो आहे. या गोष्टीचा मला किती आनंद वाटतो, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मला लहानपणापासूनच मुलींचे कपडे आवडत नव्हते. माझं राहणं आणि सवयी मुलांसारख्या होत्या. माझ्या सात बहिणींना आता दोन भाऊ मिळाले आहेत. त्यांना आता खूप आनंद होतोय. माझा भाऊ मुराद आबिदसुद्धा प्रचंड खुश आहे."

पाकिस्तानातील पंजाब प्रांतात गुजरात जिल्ह्यातील सोनबडी गावात द्वितीय वर्ष पदवीचं शिक्षण घेणाऱ्या वालिद आबिद याचं हे मनोगत.

लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यापूर्वी वालिदचं नाव बुशरा आबिद होतं.

त्याचा लहान भाऊ मुराद आबिद. नववीत शिकतो. त्याचं नाव शस्त्रक्रियेपूर्वी वफिया आबिद असं होतं.

मुराद आणि आबिद दोघेही पंजाबमधील एका सुखवस्तू कुटुंबातले आहेत.

डॉक्टरांसाठी वेगळं प्रकरण

वालिद आणि मुराद यांच्या आई-वडिलांचं लग्न 1993 साली झालं. लग्नानंतर त्यांच्या घरात एकामागून एक नऊ मुलींचा जन्म झाला. त्यांच्यापैकी दोन मुलींना लिंगबदल शस्त्रक्रिया करून घेतली. आता त्यांना सात मुली आणि दोन मुलं आहेत.

सर्व भावंडांमध्ये वालिद पाचव्या तर सहाव्या क्रमांकाचे अपत्य आहे.

दोन्ही बहिणींची लिंगबदल शस्त्रक्रिया इस्लामाबादच्या पाकिस्तान इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये झाली.

या दरम्यान 12 डॉक्टरांच्या पथकाचं नेतृत्व डॉ. अमजद चौधरी यांनी केलं.

बीबीसीशी बोलताना डॉ. अमजद चौधरी म्हणाले, "मी यापूर्वी अनेक लिंगबदल शस्त्रक्रिया केल्या आहेत. पण हे प्रकरण वेगळं होतं. दोन्ही भाऊ दोन वर्षांपासून यासंबंधित उपचार घेत होते."

दोन सख्ख्या भावंडांचं अशा प्रकारचं ऑपरेशन आपण कधीच केलं नसल्याचं डॉ. चौधरी यांनी सांगितलं.

डॉ. चौधरी सांगतात, "दोन्ही भावंडांची ऑपरेशन वेगवेगळ्या दिवशी झाली. वालिदचं ऑपरेशन 20 सप्टेंबरला झालं. त्यानंतर त्याला काही दिवस ICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावरची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री केल्यानंतर आम्ही 10 ऑक्टोबरला मुराद आबिदवरची शस्त्रक्रिया केली."

डॉ. अमजद यांनी दिलेल्या माहितीनुसार, "हे ऑपरेशन सहा तास चाललं. यामध्ये वेळोवेळी वेगवेगळे डॉक्टर सहभागी होत गेले. दोन्ही भावंडांना 21 ऑक्टोबर रोजी रुग्णालयातून घरी परतण्याची परवानगी देण्यात आली."

लिंगबदल शस्त्रक्रिया कशामुळे?

अबोटाबादमधील अय्युब टीचिंग हॉस्पिटलमधील डॉक्टर जुनैद सांगतात, "काही मुलांचं लिंग जन्मावेळी स्पष्ट होऊ शकत नाही. यामुळे अशा मुलांमध्ये त्यांचं लिंग पूर्ण आकार घेऊ शकत नाही. अशा मुलांमध्ये दोन्ही लिंगांची वैशिष्ट्य असतात. अशा प्रकरणांमध्ये मुलांना एटिपिकल जेनेटेलिया नामक आजार होण्याची शक्यता असते."

"हा आजार जन्मतःच होऊ शकतो. विशिष्ट अवयव किंवा लैंगिक विकासाच्या मार्गात अडचणी येऊ शकतात," असं ते पुढे सांगतात.

डॉ. अमजद चौधरी यांनी सांगितलं, "हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. सुमारे 0.5 ते 0.7 टक्के मुलांमध्येच हा आजार आढळून येतो."

ते सांगतात, "या प्रकरणात दोन्ही मुली होत्या. पण त्यांच्यात मुलींचे कोणतेच गुणधर्म नव्हते. त्या वयात आल्यानंतर मासिक पाळी सुरू झाली नाही. त्यांच्या आईने तपासणी केली. पण त्यांना PIMS चिल्ड्रन हॉस्पिटलला जाण्यास सांगण्यात आलं."

"सुरुवातीच्या चाचणीत दोघेही 'एटिपिकल जेनेटेलिया' आजाराने ग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यांना लिंगबदल शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचं त्यावेळी आढळलं. शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांना पुन्हा सामान्य स्थितीत आणलं गेलं."

डॉ. अमजद चौधरी यांच्या मते, "ऑपरेशनपूर्वी आणि नंतर उपचार घेण्याची आवश्यकता असते. शस्त्रक्रियेपूर्वी मानसिक चाचणी अत्यंत महत्त्वाची असते. त्यानंतर समुपदेशन केलं जातं. ऑपरेशननंतर काही दिवस औषधं घेऊन हार्मोन तयार करून घेतली जातात."

डॉ. अमजद चौधरी यांनी यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत. "अनेकजण ऑपरेशननंतर चांगलं आयुष्य घालवत आहेत. पण शस्त्रक्रिया करावी की नाही, हा निर्णय पूर्णपणे रुग्णाचा असतो," चौधरी सांगतात.

ते पुढे सांगतात, "या प्रकरणात आम्ही दोन्ही रुग्णांना विचार करण्यासाठी पुरेसा वेळ दिला. त्यांच्याशी प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली. आमच्या मानसोपचार तज्ज्ञांनी वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला."

"आई-वडिलांना आपल्या मुलांची शारीरिक रचना, जननेंद्रीय आणि त्यांची वागणूक वेगळी आहे, असं लक्षात आल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे," असं डॉ. डॉ. अमजद चौधरी यांनी सांगितलं.

"मुलं लहान असतानाच या आजारावरचे उपचार केले जाऊ शकतात. यामध्ये उशीर झाल्यास पुढे जाऊन समस्या निर्माण होऊ शकतात."

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top