Thursday, 12 Dec, 10.47 pm BBC मराठी

होम
पंकजा मुंडे यांच्या भाषणातून निघणारे 9 अर्थ

"आपण पक्षातच राहणार. मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पुढील काम करणार आहे," असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते.

या कार्यक्रमाला जमलेले हजारो कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल तसंच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर टीका केली. त्यांचा बराचसा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता.

पंकजा मुंडे यांनी केलेल्या या भाषणाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.

1. दबावतंत्र

पंकजा मुंडेंचं हे मर्यादित बंड आहे का, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का, असे प्रश्न या भाषणाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं, की मी माझी भूमिका जाहीर केलीये. आता बॉल पक्षाच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हणणं म्हणजेच त्यांनी भाजपला पर्यायानं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे. त्यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आता पक्ष यावर काय निर्णय घेतो, ते पाहावं लागेल."

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या मते, "सत्ता नसल्यामुळे भाजपमधील नाराजांचा गट अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे आता ही मंडळी 'हीच ती वेळ' म्हणत आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहेत. पण हेही खरं आहे, की भाजपनं या नेत्यांना विश्वासात घेऊन पावलं टाकायला हवी होती. निर्णयप्रक्रियेत स्थान द्यायला हवं होतं."

2. फडणीसांना आव्हान

"पक्ष हा एका व्यक्तीचा नाही. पक्ष ही प्रक्रिया असते. 30-40 वर्षं काम केलेल्या लोकांना वाऱ्यावर सोडण्याची या पक्षाची परंपरा नाही. मला तो आधीचा पक्ष पुन्हा हवा आहे," असं म्हणून पंकजा मुंडेंनी या भाषणात देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना एकत्रपणे सांभाळून घेणं भाजपसाठी आव्हानात्मक असेल का, यावर राही भिडे सांगतात, "खरं तर देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच पंकजा मुंडेंशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांची भेटही घेतली होती. आता मात्र पंकजा मुंडेंना पक्षातून काहीतरी देता येतं का, त्यातून त्यांना सन्मान देता येतो का, हेही त्यांना पाहावं लागेल."

प्रशांत दीक्षित यांनी या मुद्द्याविषयी बोलताना म्हटलं, "या दोघांना एकत्र ठेवण्यात भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. कारण पंकजा मुंडे ओबीसी नेत्या आहेत. त्यांच्याइतका दुसरा मोठा ओबीसी चेहरा आज भाजपकडे नाहीये. त्यामुळे पंकजा मुंडेंना दुखावून चालणार नाही. लवकरात लवकर पक्षनेतृत्वानं याची दखल घेऊन हा प्रश्न सोडवायला हवा."

3. अडचणीचं संधीत रूपांतर

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता या अडचणीचं संधीत रूपांतर करायचा प्रयत्न पंकजांकडून होत असल्याचं दिसतं.

"27 तारखेला मी उपोषण करणार आणि मग राज्यभर दौरा करणार," हे त्यांचं वक्तव्यं याचाच भाग आहे.

"मी आता मशाल घेऊन महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. मी घरात बसून राहणार नाही. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आहे. 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसाचं उपोषण करणार आहे. ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला असेल त्या ठिकाणी मी जाणार आहे," असं म्हणताना पंकजा यांनी आपण अजूनही माघार घेतली नाही आणि राज्यात नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करू, हे अधोरेखित केलं.

4. पक्षाला स्पष्ट संदेश

मी भाजपच्या कोअर कमिटीची सदस्य नाही. लोकशाही पद्धतीने पक्षात निर्णय होतील, तेव्हा विचार करेन. मी पक्ष सोडणार नाही, पण पक्षाला काय करायचंय ते करावं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी भाजपला स्पष्ट दिला आहे.

5. सर्व नाराजांना एकत्र आव्हान

या कार्यक्रमाला एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल हे नेतेही उपस्थित होते.

"एका पैलवान काजू-बदाम खाऊन मोठं करायचं आणि दुसऱ्याला मात्र त्यापासून लांब ठेवायचं. काजू-बदाम खाल्लेला पैलवानच जिंकणार ना..." असं वक्तव्यं पंकजा यांनी केलं. एकप्रकारे पक्षातूनच आपले विरोधक धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षपणे मदत झाल्याचं दावा त्यांनी या विधानातून केला. पण त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही.

"ज्यांच्यावर अन्याय झालाय, त्यांच्यासाठी मी आहे," असंही त्यांनी म्हटलं. यातून त्या सर्व नाराज नेत्यांना एकत्र येण्याचं आव्हान करत असल्याचं चित्र निर्माण होत होतं.

6. बहुजनांचं नेतृत्व

पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात आपण केवळ वंजारी समाजाच्या नेत्या नाही, हे अधोरेखित केलं. मी आता वंजारी, धनगर, मराठा, सोनार, माळी, अल्पसंख्याक सगळ्यांचीच आहे. आता वज्रमूठ बांधायची आहे," असंही त्यांनी म्हटलं.

"मूठभर लोकांचा पक्ष गोपीनाथ मुंडे साहेबांनी सर्वसामान्यांपर्यंत नेला. आता 'रिव्हर्स गिअर' नको. पक्षाने याबद्दल विचार करावा," असं त्यांनी म्हटलं. यातून त्या पक्षाचा बहुजन नेत्याचा आपला चेहरा प्रस्थापित करत असल्याचं दिसतं.

7. अन्याय आणि संघर्ष

माझ्यावर अन्याय झालाय आणि मला संघर्ष करायचाय, अशी भावना पंकजा मुंडेच्या भाषणातून व्यक्त झाली.

याविषयी राही भिडे सांगतात, "पंकजा मुंडेंना पक्षानं मंत्रिपद दिलं होतं. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीही दिली. असं असताना माझ्यावर अन्याय झाला, अशी त्यांची भावना असेल, तर अन्याय झाला म्हणजे नेमकं काय झालं, हे त्यांनी सांगायला हवं."

"पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांनीही सभा घेतली. तरीसुद्धा त्यांचा पराभव झाला. पंकजा मुंडेंनी याविषयी आत्मपरीक्षण करायला हवं. एकनाथ खडसेंच्या बाबतीत अन्याय झाला, असं म्हणण्यास वाव आहे. कारण खडसेंना विश्वासात घेतलं नाही, त्यांना निर्णयप्रक्रियेतून वगळण्यात आलं," असं प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं.

8. मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा

भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी 'मीच जनतेच्या मनातली मुख्यमंत्री' असं विधान केलं होतं. तेव्हाही पंकजा या भविष्यातील मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार असतील का, अशी चर्चा सुरू झाली होती.

गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात भाषण करतानाही त्यांनी म्हटलं, "एखाद्या मुलीनं जर म्हटलं, की मी 'लोकांच्या मनातली मुख्यमंत्री' तर काय पाप केलं?

याचाच अर्थ भाजपमधील सत्ता स्पर्धेतून त्यांनी आजही माघार घेतली नाही, असाच होतो.

9. विरोधकांवर टीका नाही.

पंकजा मुंडेंनी त्यांच्या भाषणात विरोधकांवर टीका केली नाही. सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी त्यांनी सकारात्मक उद्गारच काढले. उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी ' माझा भाऊ' असा केला. दुसरीकडे सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं, की माझ्या डोळ्यातील अश्रू मी त्यांच्या डोळ्यात पाहिले होते. (त्यांचा संदर्भ अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली, त्या घटनेशी होता.) पण त्यांच्यासोबत वडील होते. माझ्यासोबत माझे वडील नाहीत.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top