Tuesday, 17 Dec, 6.15 pm BBC मराठी

होम
पायल रोहतगी यांना अटक: सोशल मीडियावर फेक न्यूजविरोधात तुम्ही सावध राहायला हवं, नाहीतर...

मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य तसंच सोशल मीडिया पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी यांना अटक करण्यात आली आहे.

राजस्थान पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांना त्यांच्या अहमदाबाद इथल्या घरातून अटक केली. ऑक्टोबर महिन्याच राजस्थान पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

पायल रोहतगी यांना चौकशीसाठी राजस्थानमधल्या बुंदी इथे आणलं जाईल, असं बुंदीच्या पोलीस अधीक्षक ममता गुप्ता यांनी ANIशी बोलताना सांगितलं.

सोमवारी सकाळी त्यांना बुंदी कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला आणि आठ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिली. यावर पुढील सुनावणी 24 डिसेंबरला होईल.

अटकेनंतर पायल रोहतगी यांनी, "मी गुगलवरून माहिती घेऊन मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी तयार केलेल्या व्हीडिओबद्दल मला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक मोठा विनोदच झाला आहे," अशा आशयाचं ट्वीट केलं आहे. त्यांनी या ट्वीटमध्ये पंतप्रधान कार्यालयाला (@PMOIndia) आणि गृह मंत्रालयाला (@HMOIndia) टॅग केलं आहे.

नक्की काय घडलं?

1 सप्टेंबरला पायल रोहतगी यांनी मोतीलाल नेहरू तसंच जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हीडिओ युट्युबवर पोस्ट केला. हा व्हीडिओ आतापर्यंत 92 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

यात इंदिरा गांधी, तसंच जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नींबद्दलही अपमानजनक भाषा वापरली आहे. त्याविरोधात राजस्थान युवक काँग्रेसचे सरचिटणीस चर्मेश शर्मा यांनी तक्रार दाखल केली.

राजस्थान पोलिसांनी IT अॅक्टच्या कलम 66 आणि कलम 67च्या अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली. "या तक्रारीची दखल घेत आम्ही पायल रोहतगी यांनी नोटीस पाठवली, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे त्यांना अटक केली आहे," अशी माहिती तपास अधिकारी लोकेंद्र पालीवाल यांनी दिली.

दुसरीकडे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी पायल रोहतगी यांना सोडून देण्याची मागणी केली आहे. "पायल रोहतगी यांनी आक्षेपार्ह विधान केलं यात शंका नाही, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांना सोडून देणंच योग्य ठरेल," असे ते एका ट्वीटमध्ये म्हणाले.

कोण आहे पायल रोहतगी ?

'सुपरमॉडेल मिस टुरिझम वर्ल्ड' ही स्पर्धा जिंकल्यानंतर पायल यांनी अनेक जाहिराती, टीव्ही सिरीयल्स आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रिअॅलिटी शो बिग बॉसची स्पर्धक राहिलेल्या पायल रोहतगी नेहमीच वादग्रस्त विधान करून चर्चेत राहिल्या आहेत.

या आधीही पायल रोहतगी शिवाजी महाराजांविषयी एक विधान करून वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. राष्ट्रवाजी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्याविरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्यांच्या अटकेची मागणी केली होती.

याप्रकारानंतर पायल यांनी ट्विटर व्हीडिओ पोस्ट करून सगळ्या प्रकरणाबद्दल माफी मागितली होती.

राजा राम मोहन रॉय यांच्याबद्दलही पायल रोहतगी यांनी आक्षेपार्ह विधान करत त्यांना ब्रिटिशांचे चाकर म्हटलं होतं. सतीसारखी 'थोर परंपरा' बंद करण्याचं 'पाप' राजा राममोहन रॉय यांनी केलं होतं, असं वादग्रस्त विधान रोहतगी यांनी केलं होतं.

आताच घडलेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणाला धार्मिक रंग देण्याच्या आरोपामुळे ट्विटरने त्यांचं अकाउंट एका आठवड्यासाठी बॅन केलं होतं.

फेक न्यूज प्रकरणातली अटक

फेक न्यूजचा प्रसार आणि प्रचार या प्रकरणात फार कमी लोकांना अटक होते, त्यातलीच ही एक घटना म्हणता येईल.

अनेकदा आपल्याला व्हॉटसअॅप किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणारे मेसेज, फेकन्यूज मिळत असतात. यात अनेकदा अनेक मोठ्या लोकांबद्दल आक्षेपार्ह विधानं आणि अपमानजनक भाषा असते. अनेकदा यातली माहिती चुकीची तर असतेच पण माथी भडकवणारी पण असते, तरीही अशा फेक न्यूजला आळा बसत नाही, असं का?

सुप्रीम कोर्टातले वकील आणि सायबर लॉ तज्ज्ञ विराग गुप्ता यांच्यामते फेक न्यूज समजण्यासाठी आपल्याला तीन बाबी लक्षात घ्याव्या लागतील - जे फेक न्यूज पसरवणारे, फेक न्यूजला बळी पडणारे किंवा फेक न्यूजमुळे ज्यांचं नुकसान होतं ते, आणि तिसरं म्हणजे सरकार.

ते सांगतात, "बहुतांश वेळा फेक न्यूज पहिल्यांदा कुणी तयार केली आणि पसरवली, हे शोधून काढणं शक्य नसतं. जी काही तुरळक कारवाई होते ती सहसा अशा गोष्टी रिट्वीट किंवा फॉरवर्ड करणाऱ्यावर केली जाते.

"दुसरी गोष्ट अशी की फेक न्यूजचा कारभार आंतर्देशीय आहे. दिशाभूल करणाऱ्या माहितीचे मेसेज बाहेरच्या देशात तयार होतात आणि आपल्या देशात पसरवले जातात. आपल्या देशाचा कायदा आपल्या देशापुरताच मर्यादित असल्याने असे लोक सुटतात. आणि जे लोक या फेक न्यूजला बळी पडलेत ते समोर येईपर्यंत बराच उशीर झालेला असतो."

गुप्ता सांगतात की सध्या अशा प्रकारच्या फेक न्यूजला आळा घालण्यासाठी आयटी अॅक्टमधल्या तरतुदी पुरेशा नाहीत.

"फेक न्यूजविरोधात लढण्यासाठी ना आपल्याकडे कायदेशीर व्यवस्था आहे ना आपल्या कोर्टांना त्याची पूर्ण समज आहे. आहे त्या कायद्यांवर फेक न्यूजशी लढता येणार नाही हे आपल्याला समजायला हवं," असंही ते पुढे म्हणतात.

याघडीला फेक न्यूजचा सामना करणं अवघड आहे असा त्यांचा सूर आहे. याचं कारण विचारलं तर ते म्हणतात, "मुळात फेक न्यूज एकट्या दुकट्याचं काम नाहीये हे समजून घ्या. या मागे राजकीय शक्ती आहेत, आणि सोशल मीडिया कंपन्यांना फेकन्यूजमुळे प्रचंड फायदा होतो. त्यामुळे आपण गोष्टींना रोखण्यासाठी फक्त कायदे करून चालणार नाही, संपूर्ण व्यवस्थेत बदल करावे लागतील."

बीबीसीचा फेक न्यूजविरोधात लढा

फेक न्यूजपायी भारतात अनेकांनी आपला जीव गमावला आहे, आणि याविरोधात सक्षमपणे लढण्यासाठी बीबीसीने मोहीम हाती घेतली आहे.

बीबीसी मराठी सोशल मीडियावर पसरलेल्या मेसेजची सत्यता नेहमीच पडताळून पाहतं आणि आपल्या वाचकापर्यंत खरी माहिती पोहचवतं. तुम्ही त्या सगळ्या बातम्या इथे वाचू शकता.

आपल्यापर्यंत येत असलेल्या बातम्यांचं विश्लेषण कसं करायचं, त्या बातम्या देणाऱ्या प्रसारमाध्यमांची सत्यता आणि विश्वासार्हता कशी पडताळून पाहायची, याबाबत जे लोक शिक्षित असतात, जाणकार असतात, त्यांच्याकडून 'फेक न्यूज' पसरवली जाण्याची शक्यता कमी असते.

म्हणूनच बीबीसीच्या पत्रकारांनी ब्रिटन आणि भारतातील अनेक शाळांमध्ये जाऊन मीडिया साक्षरतेवर कार्यशाळा घेतल्या. यातलीच दोन कार्यशाळा पुण्यातही झाल्या.

बीबीसीच्या #BeyondFakeNews या नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या या उपक्रमाचा उद्देश होता जगभरात चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे तसेच यावर व्यवहार्य तोडगा काढणे. त्याबद्दल तुम्ही इथे वाचू शकता.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top