Thursday, 26 Sep, 12.54 pm BBC मराठी

होम
पुण्यात पावसामुळे अरण्येश्वर इथं भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून 11 जणांचा मृत्यू

प्रचंड पावसामुळे पुण्यातल्या आंबील ओढ्याला आलेल्या पुरामुळे अरण्येश्वर येथील टांगेवाला कॉलनीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफच्या पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे.

टांगेवाला कॉलनी नाल्याच्या अत्यंत जवळ असून बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर पाणी वाढले. हे पाणी कॉलनीतल्या घरांमध्ये घुसले. त्यामुळे भिंत खचून सात जणांचा मृत्यू झाला.

सापडलेल्या पाच मृतदेहांपैकी तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथकं करत होती. मृतदेहांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले आहे.

2. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीवरून पदाधिकाऱ्यांना धमक्या

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारणारे फोन केले जात आहेत. फादर दिब्रिटो यांची निवड रद्द करावी अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीच पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

मंगळवारपासून जाब विचारणारे फोन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना येऊ लागल्याचं साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सांगितलं आहे. काही लोकांनी बघून घेऊ अशी भाषा चढ्य़ा आवाजात वापरल्याचंही त्यांनी सांगितलं. तूर्तास अशा धमक्यांबद्ल तक्रार करणार नसल्याचे पाटील यांनी सांगितलं आहे. लोकसत्तानं हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

3. 'शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही'

"शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मी पवारांवर कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत," असं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं आहे. शिखर बँकेचा घोटाळा, साखर कारखाना विक्री व्यवहार घोटाळा, बेकायदेशीर घोटाळ्याचे कर्ज या सर्व प्रकरणात राजू शेट्टी पहिले तक्रारदार होते.

मुख्यमंत्री जाणीवपूर्वक भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन पावन करत आहेत, असंही ते म्हणाले. यावेळेस राजू शेट्टी यांनी अजित पवार, दिलीप देशमुख, मधुकर चव्हाण ते नितीन गडकरी यांच्यापर्यंत अनेक जणांनी साखर कारखाने विकत घेऊन घोटाळे केले असा आरोपही त्यांनी केला. हे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

4. 'त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले'

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

"संसदेत UAPAकायदा आणला तसंच अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली. मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी बारामतीत बंद पाळला," अशा शब्दांमध्ये सुजात आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

5. डी. के. शिवकुमार तिहारमध्येच

हवालाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेले काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. शिवकुमार सध्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवकुमार यांनी 3 सप्टेंबर रोजी ईडीने अटक केली होती.

शिवकुमार यांना जामीन दिल्यास ते प्रकरणाच्या तपासावर प्रभाव टाकू शकतील असा युक्तिवाद ईडीतर्फे करण्यात आला आहे. शिवकुमार यांची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी ईडीच्या युक्तिवादाला विरोध केला. मात्र न्यायालयाने शिवकुमार यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हे वृत्त पुढारीनं प्रसिद्ध केले आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top