Friday, 07 Aug, 4.21 pm BBC मराठी

होम
राम मंदिर भूमिपूजनावरील पाकिस्तानचे वक्तव्य दुःखद - भारताची प्रतिक्रिया

5 ऑगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन केले. त्यावर पाकिस्तानने वक्तव्य केलं होतं की भारतातील मुस्लिमांचे धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. पाकिस्तानच्या या वक्तव्याचा भारताने विरोध केला आहे.

भारतीय परराष्ट्र खात्याने एक निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानच्या या भूमिकेमुळे भारताला आश्चर्य वाटलेले नाही. सीमे पलीकडील दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या आणि स्वतःच्या देशातील अल्पसंख्यांकाचे अधिकार नाकारणाऱ्या देशाकडून असं विधान येणं दुःखद आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तसेच पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्रीराम प्रतिमेच्या पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण करण्यात आलं.

रामाच्या प्रतिमा असलेली 15 लाख पोस्टाची तिकीटं छापण्यात आली आहेत.

या सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

मुहूर्तानुसार पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 12.45 ला भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. कोरोनामुळे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

पाकिस्तानने केला निषेध

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा पाकिस्तानने निषेध केला आहे.

"सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाने मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. त्या निर्णयाने न्यायापेक्षा श्रद्धा श्रेष्ठ असल्याचं स्पष्ट झालं. सध्याच्या भारतात अल्पसंख्याक आणि विशेषत: मुस्लीम आणि त्यांची प्रार्थनास्थळं धोक्यात आहेत," असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

"ऐतिहासिक मशिदीच्या ठिकाणी बांधण्यात आलेलं मंदिर हा भारताच्या कथित लोकशाहीला लागलेला डाग आहे. भाजप आणि सहकारी संघटनांनी बाबरी मशीद पाडली तेव्हाची वेदनादायी दृश्यं जगभरातल्या मुस्लिमांच्या मनात ताजी आहेत. हिंदू राष्ट्र हा भाजपचा अजेंडा आहे. निवडणुकीतही भाजपने तसाच प्रसार केला होता. गुजरातमधील हिंसाचार असो की दिल्लीत यंदाच्या वर्षी झालेला हिंसाचार असो- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी सुसंघटित पद्धतीने मुस्लिमांच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केलं. कोरोना काळातही हिंदू मूलतत्ववादी संघटनांचे मुस्लीमधर्मीयांच्या प्रार्थनास्थळावंरचे हल्ले सुरूच आहेत. कोरोनाच्या फैलावाकरता मुस्लिमांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांचं धार्मिक स्वातंत्र्य धोक्यात आणण्यात आलं आहे," असं पाकिस्ताननं एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील मुद्दे

सियावर रामचंद्र की जय तसंच जय श्रीरामच्या घोषणेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.

-आजचा जयघोष फक्त श्रीराम नगरी अयोध्येत नव्हे तर संपूर्ण विश्वात.

-समस्त देशवासीय तसंच जगभरातील भारतीयांसाठी, रामभक्तांचं कोटी कोटी अभिनंदन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, देशभरातील तपस्वी, देशातील नागरिकांना वंदन करतो.

-माझं नशीब की मला रामजन्मभूमी ट्रस्टने मला निमंत्रण दिलं. मला या गौरवशाली क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. रामजन्मभूमी ट्रस्टचे आभार व्यक्त करतो.

-'मुझे तो यहाँ आना ही था क्योंकी राम काजु कीन्हें बिनु मोहि कहाँ विश्राम' या सुंदरकांडातील पंक्तींचा उल्लेख केला.

-रामलला गेली काही वर्ष तंबूत होते. उन्मळून पडणं आणि नव्या ताकदीसह उभं राहणं हा सृष्टीचा नियम आहे. अनेक शतकांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अनेकांना विश्वास होत नसेल की ते हा पावन दिन प्रत्यक्ष पाहू शकत आहेत. 130 कोटी देशवासीयांना वंदन करतो.

- भव्य मंदिराची उभारणी होईल. राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी आयुष्य अर्पण केलं.

-संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त

-देशवासीयांसाठी भावनिक असा क्षण. राम आपल्या मनात वसले आहेत. राम आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत. कोणत्याही कामासाठी प्रेरणा हवी असेल तर आपण रामाला वंदन करतो.

-श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. भगवान श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिरासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

-इथे येण्यापूर्वी मी हनुमानगढीला भेट दिली. हनुमानजींच्या आशिर्वादाने या कामाला सुरुवात झाली आहे.

-श्रीरामाचं मंदिर संस्कृतीचं आधुनिक प्रतीक असेल.

-शाश्वत आस्थेचं प्रतीक होईल. हे मंदिर राष्ट्रभावनेचं प्रतीक. सामूहिक संकल्पशक्तीचं प्रतीक असेल.

-हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांसाठी आस्था, श्रद्धा, संकल्पाचं प्रतीक ठरेल.

-मंदिराने या परिसराचं अर्थकारण बदलून जाईल.

-जगभरातील माणसं श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी इथे येतील.

सत्याप्रती एकनिष्ठ राहणं. भारताची अध्यात्मिकता जगासाठी प्रेरणेचा विषय.

-राम नाम असलेल्या शिळा म्हणजे ऊर्जेचा स्रोत.

-छत्रपती शिवाजी महाराजारांना स्वराज्याच्या उभारणीसाठी मावळ्यांनी जशी मदत केली तशी भारतीयांनी मंदिर बांधायला मदत केली.

-राम मंदिर म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती

-राम मंदिर म्हणजे देशाला जोडण्याची प्रक्रिया

-भारताच्या आदर्शांमध्ये, दिव्यतेत राम आहे.

-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या भजनात राम, कबीर यांच्या कवितेत राम आहे. राम हे सर्वांचे प्रतीक आहेत. इंडोनेशिया, कंबोडिया पासून चीन, इराण, इराक, श्रीलंका अशा अनेक देशांमध्ये राम यांचं स्मरण केलं जातं. भगवान बुद्ध हेही रामाशी संलग्न आहेत.

-राम सगळ्यांमध्ये आहेत. अयोध्येत निर्माण होणारं राम मंदिर भारतीय संस्कृतीच्या अद्वैत परंपरचे द्योतक असेल. ते मानवतेला प्रेरणा देत राहील.

-पृथ्वीवर प्रभू श्रीराम यांच्यासारखा नीतीमय शासक झाला नाही. राम मंदिर हे वर्तमान, भावी पिढ्यांची जबाबदारी.

-राम परिवर्तनाचे शिल्पकार आहेत. काळानुरुप जगण्याची शिकवण देतात. रामाच्या शिकवणीसह भारत पुढे वाटचाल करत आहे.

कारसेवकांचा त्याग विसरणारे रामद्रोही-शिवसेना

अयोध्येत सुरू असलेल्या भूमिपूजन सोहळ्यावेळी कारसेवकांच्या त्यागाला विसरणारे रामद्रोही आहेत असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

अडवाणीजी घरून हा कार्यक्रम पाहत असतील- मोहन भागवत

अनेकांनी या दिवसासाठी प्रयत्न केले. आज आडवाणी घरात बसून हा कार्यक्रम बघत असतील. अनेकांना बोलवता आलं नाही. या सोहळ्यामुळे देशभरात आनंदाचं वातावरण असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं.

लोकशाही पद्धतीने संघर्षाची सांगता-योगी आदित्यनाथ

पाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्षाची लोकशाही आणि घटनात्मक पद्धतीने सांगता झाली असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

राम न्यायाचं प्रतीक-राहुल गांधी

राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे.

राम म्हणजे प्रेमाचं प्रतीक. कोणाप्रती तिरस्कार किंवा घृणेतून ते व्यक्त होऊ शकत नाहीत.

मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हे सर्वोत्तम अशा मानवी गुणांचे प्रतीक आहे.

आपल्या मनात वसलेल्या मानवतेची मूळ भावना म्हणजे भगवान राम.

राम प्रेम आहे, ते कधी घृणेद्वारे प्रकट होऊ शकत नाही.

राम करुणेचं प्रतीक आहे, तिरस्काराद्वारे प्रकट होऊ शकत नाही.

राम न्यायाचं मूर्तीमंत रुप आहे, अन्यायाद्वारे ते प्रकट होऊ शकत नाही.

शिवसेनेचं ट्वीट

भूमिपूजन कार्यक्रम सुरू असताना शिवसेनेने पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हीडिओ ट्वीट केला आहे.

या व्हीडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसतात. ते म्हणतात, "बाबरी मशीद पाडल्यानंतर तिथे शिवसेनेचा झेंडा रोवणं ही अतिशय गौरवास्पद गोष्ट होती. यात शरमेची कोणतीही बाब नाही. बाबरी मशिदीच्या खाली जे राम मंदिर होतं ते आम्ही वर आणलं".

या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत.

सर्वांत आधी त्यांनी हनुमानगढी येथे हनुमानाची आरती केली.

या फोटोमध्ये ते भारतीय हवाई दलाच्या विमानात चढताना दिसत आहेत. मोदींनी धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे.

कसा असेल कार्यक्रम?

  • नियोजित कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वाजून 20 मिनिटांनी अयोध्येत पोहोचले आहेत.
  • आता ते हनुमानगढी मंदिरामध्ये जातील. मुख्य मंदिरापासून हे ठिकाण काही मीटर दूर आहे. तिथे ते साधारणतः सात ते आठ मिनिटं थांबतील.
  • मीडियाला हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याची परवानगी नाहीये.
  • हनुमानगढीपासून राम जन्मभूमिपर्यंतचा रस्ता फुलांनी सजविण्यात आला आहे. दुकानांची बाहेरील बाजू पिवळ्या रंगात रंगवली गेली आहे.
  • सर्व निमंत्रित आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही इथे पोहोचले आहेत.

अयोध्येतलं वातावरण कसं आहे?

अयोध्येत सध्या लाउडस्पीकरवरून श्रीरामाच्या भजनांचाच आवाज ऐकू येतोय.

अयोध्येचा रंग आज काहीसा बदललेला आहे. पिवळा रंग हिंदू धर्मात शुभ मानला जातो. त्यामुळे राममंदिर भूमीपूजन सोहळा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यात येणारी दुकानं पिवळ्या रंगाने रंगवण्यात आली आहेत.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट या सोहळ्याचे आयोजक आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यानंतर केंद्र सरकारने या ट्रस्टची स्थापना केली होती. मात्र, या ट्रस्ट शिवाय अयोध्या प्रशासन आणि राज्य सरकारही गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत.

मंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी हनुमान गढीवर पूजा करू या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. अयोध्या म्हणजे मंदिरांचं शहर. अशा या ऐतिहासिक शहरात गेल्या काही दिवसांपासून रामायणाचे अखंड पाठ सुरू आहेत. 4 आणि 5 ऑगस्ट रोजी दीपोत्सवाचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे.

मंदिरांमध्ये आणि शरयू नदीकाठी मातीच्या पणत्या लावण्याचा कार्यक्रम आहे. आयोजक आणि सरकारनेही लोकांनी त्या दिवशी आपापल्या घरांमध्ये दिवे लावण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारने मुख्य मंदिरांमध्येही पणत्या वाटप केल्या आहेत.

मात्र, अयोध्या शहरातला उत्साह काही औरच आहे. शहरातली मंदिरं रात्री रंगेबीरंगी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघतात. प्रसार माध्यमांच्या गाड्या दिवस-रात्र शहरातून फिरताना दिसतात.

नेपाळहूनही येणार पाहुणे

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि ट्रस्टचे मुख्य महंत नृत्य गोपाल दास व्यासपीठावर असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित असतील.

कोरोना संकट बघता कार्यक्रमासाठी केवळ 175 पाहुण्यांनाच आमंत्रण दिल्याचं आयोजकांनी सांगितलं.

ट्रस्टच विश्वस्त चंपत राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, नेपाळहूनही काही संत या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशशी नेपाळचं जवळचं नातं असल्याचं ते म्हणाले.

अयोध्या जमीन वादात पक्षकार असलेले हाशीम अन्सारी यांचे चिरंजीव इकबाल अन्सारी यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांच्या वडिलांचा 2016 साली मृत्यू झाला होता. त्यानंतर ते या खटल्यात पक्षकार होते. इकबाल यांनी बीबीसीला सांगितलं की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून रामचरित मानस देणार आहेत. अयोध्येत हिंदू-मुस्लीम असा वाद नसल्याचं ते म्हणाले.

त्यांच्याव्यतिरिक्त फैजाबादचे रहिवासी पद्मश्री मोहम्मद शरीफ यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. ते बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर अहमद फारूखी यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, ते कार्यक्रमाला येतील का, हे अजून स्पष्ट नाही.

कोरोना आणि अयोध्या

अयोध्येतली सर्व तयारी स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. सोमवारी त्यांनी कार्यक्रमाच्या तयारीचा आढावाही घेतला. सोशल डिस्टंसिंगवर त्यांचा विशेष भर आहे. कोव्हिड-19 प्रोटोकॉलची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे. अयोध्याचे डीएम अनुज कुमार झा यांनी सांगितलं की कार्यक्रमस्थळी सर्व खुर्च्या 8 फूट अंतरावर ठेवण्यात येतील.

मात्र, मुख्य कार्यक्रमाव्यतिरिक्त सोहळ्यात इतर बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे. तयारी आणि सुरक्षेच्या कामी असणारे पोलीस कर्मचारी कोरोनाविषयी फारसे जागरुक वाटत नाहीत. मंगळवारी हनुमान गढीमध्ये पूजा होती. त्यादिवशी अनेक पोलीस कर्मचारी एकत्र उभे होते. अनेक पुजारी मास्क न वापरता मंदिरांमध्ये काम करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मंदिरात तैनात 16 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती. 2 पुजारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रस्त्यावर लोकांची गर्दी आहे. शरयू नदीकाठी आरतीच्यावेळी कोरोनाच्या आधी होती तशीच गर्दी आजही होते.

अयोध्येचा फोकस सध्या 5 ऑगस्टच्या कार्यक्रमावर आहे. कार्यक्रमस्थळाबाहेर सोमवारी निर्जंतुकीकरण करण्यात आलं. हे कामही पोलिसांनीच केलं.

ज्येष्ठ भाजप नेत्यांचं काय?

राम जन्मभूमी वादाच्या केंद्रस्थानी असलेले अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभाागी होणार नाहीत. भाजपचे हे ज्येष्ठ नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशा बातम्या येत होत्या. मात्र, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना आमंत्रण देण्यात आलं आहे की नाही, हे अजूनही कळलेलं नाही.

उमा भारती यांनी स्वतः ट्वीट करत सांगितलं की, कोरोना संकट बघता त्या कार्यक्रमाला येणार नाहीत.

विनय कटियार यांनी आपण जाण्याचा विचार करत असल्याचं बीबीसीला सांगितलं होतं. नंतर मात्र, जाणार नसल्याचं कळवलं. आपण मंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी कल्याण सिंह यांच्याशी चर्चा केली आणि तेसुद्धा प्रकृतीच्या कारणांमुळे कार्यक्रमाला जाणार नसल्याचं त्यांनी कळवल्याचं विनय कटियार यांनी बीबीसीला सांगितलं.

आयोजनावर प्रश्नचिन्ह

पंतप्रधानांनी या कार्यक्रमात सहभागी होणं घटनेला धरून नाही, असं बाबरी मशीद कृती समितीचे संयोजक वकील जफरयाब जिलानी यांनी म्हटलं आहे. ते वैयक्तिकरीत्या कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ शकतात. मात्र, पंतप्रधान म्हणून या कार्यक्रमाला येणं, योग्य नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

मशीद निर्माणवेळी मशीद ट्रस्ट पंतप्रधानांना आमंत्रण देणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "आम्हाला चुकीचं उदाहरण द्यायचं नाही. मंदिर असो किंवा मशीद धर्मनिरपेक्ष देशात अशा सोहळ्यांमध्ये सरकारने उपस्थित राहणं चुकीचं आहे."

सोहळा धार्मिक असल्याने काही प्रश्न धर्माशी संबंधितही आहेत. शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की यावेळी कुठलाच शुभ मुहूर्त नाही. शिवाय हा भाद्रपद महिना आहे. चातुर्मास आहे. यावेळी कुठलंच शुभ कार्य करत नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम एवढ्या घाईने का आयोजित करण्यात येतोय, अशी शंका ते उपस्थित करत आहेत.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top