Saturday, 06 Feb, 7.46 am BBC मराठी

होम
रेस वॉकिंग चॅम्पियन भावना जाटची ऑलिंपिककडे झेप

रेस वॉकिंग चॅम्पियन भावना जाट हिची टोकिया ऑलिंपिकमध्ये निवड झाली आहे. भावनाने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. पण, घरगुती स्पर्धांमधील तिच्या कामगिरीच्या बळावर ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे.

भावना जाट ही राजस्थानच्या एका छोट्याशा खेड्यातील खेळाडू. आपल्यासमोरील आर्थिक अडचणींवर मात करून तिने हा पल्ला गाठला.

कठीण परिस्थितीला तोंड देत तिने आपल्या टीकाकारांची तोंडंही बंद केली. तसंच एक प्रेरणादायक कहाणी लोकांसमोर ठेवली आहे.

2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रेस वॉकिंग खेळप्रकारात ती भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

भावना शाळेत असताना ती एका जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली होती. पण त्या ठिकाणी फक्त रेस वॉकिंग खेळप्रकारात जागा शिल्लक होती. त्यामुळे तिला त्याठिकाणी सहभाग करता येऊ शकेल, असं प्रशिक्षकांनी कळवलं.

भावनाने या संधीचंही सोनं करायचं ठरवलं. तिने खेळात सहभाग नोंदवला आणि नव्या रेस वॉकरचा जन्म झाला.

भावना जाट हिला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. एक मोठी अॅथलिट बनण्याचं तिचं लहानपणाचं स्वप्न होतं. पण हे स्वप्न कसं पूर्ण करावं, याबाबत तिने काहीच विचार केलेला नव्हता.

2009 मध्ये शाळेत शिक्षण घेत असताना तिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.

पण, त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवणं आवश्यक होतं. प्रशिक्षकांनी भावनाची चाचणी घेतली. पण कोणत्याही स्पर्धेत जागा शिल्लक नसल्याने अखेर रेस वॉकिंग खेळप्रकारात सहभाग नोंदवण्याचा सल्ला प्रशिक्षकांनी दिला. काही वेळ विचार केल्यानंतर भावनाने त्यास होकार कळवला.

सुरुवातीचे अडथळे

भावनाचे वडील शंकर लाल जाट हे एक गरीब शेतकरी आहेत. आई नोसर देवी ही गृहिणी. राजस्थानच्या काब्रा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात हे कुटुंब राहतं. दोन एकर शेतीतून उदरनिर्वाहाची रक्कम कशीबशी जमा व्हायची.

अशा परिस्थितीत मुलीच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक पैसा उभा करणं त्यांना शक्य नव्हतं.

शिवाय, योग्य प्रशिक्षण आणि पुरेशा उपकरणांअभावी सराव करणं भावनाला अवघड होऊ लागलं.

पण तिने खचून न जाता सुरुवातीचे काही दिवस गावातच सराव केला. त्यावेळी तिला गावकऱ्यांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला.

सराव करत असताना भावनाला शॉर्ट्स घालावी लागायची. पण मुलीने असे तोकडे कपडे वापरू नये, असं म्हणत गावकऱ्यांनी तिची चेष्टा सुरू केली.

हा दबाव झुगारून भावनाचे कुटुंबीय तिच्या मागे ठामपणे उभे राहिले. तिच्या मोठ्या भावाने शिक्षण सोडून नोकरी सुरू केली. अशा प्रकारे भावनाच्या सरावासाठी पैसे जमवण्यास त्यांनी सुरुवात केली.

महत्त्वाचा टप्पा

कधीच पराभव न पत्करणं हा भावनाचा स्वभावगुण. याच गुणामुळे तिला आपल्या खेळात यश मिळत गेलं. स्थानिक तसंच जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून तिने सर्वांचं लक्ष वेधलं. लवकरच तिला रेल्वेत नोकरीही मिळाली.

2019 च्या भारतीय रेल्वे क्रीडा स्पर्धांमध्ये भावनाने 20 किलोमीटर रेस वॉकिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं.

हे अंतर तिने एक तास 36 मिनिटे आणि 17 सेकंदांत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. या विजयाने आपला आत्मविश्वास वाढल्याचं भावना सांगते. यानंतर भावनाने ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं.

2020 मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भावना जाट हिने उल्लेखनीय यश मिळवलं. तिने 20 किलोमीटर अंतर एक तास 29 मिनिटे आणि 54 सेकंदांत पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला. याच कामगिरीने भावना ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

भावनाने तोंड दिलेल्या समस्या भारतातील महिला खेळाडूंसाठी नव्या नाहीत. पण त्यामुळे खचून न जाता तिने घवघवीत यश प्राप्त केलं.

भारतातील महिला खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळायला हवी, असं भावनाला वाटतं.

महिला खेळाडूंनी जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा. तिथं परदेशी खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करावा. यामुळे आपलं तंत्रज्ञान आणि कामगिरी सुधारण्याची संधी आपल्याला मिळू शकेल, असं भावना सांगते.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top