Saturday, 25 Sep, 10.49 am BBC News मराठी

होम
SEX: सतत सेक्स करण्याची सवय आजार आहे का?

"सिगरेट सोडणं खूपच सोपं आहे, मी असं शंभर वेळा केलं आहे," अमेरिकी लेखक मार्क ट्वेन यांचं हे वाक्य प्रसिद्ध आहे. ट्वेन यांचा मृत्यूसुद्धा फुप्फुसाच्याच कॅन्सरनं झाला होता.

समाज म्हणून आपण निकोटीन, दारू आणि ड्रग्ससारख्या नशा येणाऱ्या पदार्थांच्या व्यसनांना स्वीकारलं आहे. एवढंच नाही, तर आपण यापासून होणारं नुकसानही एक प्रकारे स्वीकारलेलंच आहे.

पण जेव्हा आपण सतत सेक्स करण्याकडे म्हणजेच वारंवार संभोग करण्याच्या विषयाकडे येतो, तेव्हा हे व्यसन आहे किंवा नाही याबाबत तज्ज्ञांमध्ये दुमत आहे. काही तज्ज्ञ याला व्यसन मानतात तर काही मानत नाहीत.

सेक्स करण्याचं व्यसन आजार मानलं जात नाही. तसंच, ज्यांना हे व्यसन आहे त्यांनी वैद्यकीय सल्ला मागितल्याची अधिकृत माहितीही उपलब्ध नाही.

पॉर्न पाहणं किंवा सेक्सच्या व्यसनामुळे त्रासलेल्यांना मदतीसाठी ब्रिटनमध्ये एक वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटनं 21,000 लोकांचा सर्वे केला. 2013 नंतर या लोकांनी या वेबसाईटकडे मदत मागितली होती.

यातले 91 टक्के पुरुष होते आणि फक्त 10 जणांनी डॉक्टरांकडे वैद्यकीय सल्ला मागितला होता.

तज्ज्ञांचं मत

सेक्स करण्याच्या व्यसनाला 2013मध्ये 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स' (DSM) या आजारांच्या प्रकारात सामिल करण्याचा विचार सुरू होता.

पण, पुराव्यांअभावी या व्यसनाला आजार म्हणून सामिल करण्यात नाही आलं. DSM हे अमेरिका आणि ब्रिटनमधलं अशा गोष्टी तपासण्याचं महत्त्वाचं साधन मानलं जातं.

सध्या 'कंपलसिव्ह सेक्शुअल बिहेविअर' म्हणजेच शरीर संबंध बंधनकारक आहेत असं सतत वाटणं. या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेकडून 'मॅन्युअल इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज (ICD)' या आजारात सहभागी करण्याचा विचार केला जात आहे.

पुरावे समोर आल्यानंतर जुगार खेळण्याला आणि जास्त खाण्याच्या व्यसनाला 2013मध्ये आजार म्हणून स्वीकारण्यात आलं होतं. यापूर्वी जुगाराला बंधनकारक आहेत असं वाटण्याच्या यादीत (कंपलसिव्ह डिसॉर्डर्स) गणलं जात होतं.

त्यामुळे सेक्स करण्याच्या व्यसनालाही या यादीत सहभागी केलं जावं असं काही तज्ज्ञांना वाटतं.

...तेव्हा मेंदूत नेमकं काय सुरू असतं?

सेक्स करण्याचं व्यसन असलेली व्यक्ती जेव्हा पॉर्न पाहते तेव्हा त्याच्या मेंदूत विशिष्ट प्रक्रिया सुरू होते. अशीच प्रक्रीया समोर ड्रग्स पाहिल्यावर ड्रग्सचं व्यसन असलेल्या व्यक्तिच्या मेंदूत होते. याबाबतच्या एका शोधामध्ये या प्रक्रीयेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

आपण कोणत्या गोष्टीला व्यसन मानतो यावर सेक्स करणं हे व्यसन आहे की नाही हे ठरतं. कारण, याची कोणतीही व्याख्या ठरलेली नाही.

इथल्या ओपन युनिव्हर्सिटीमधले प्रा. डॉ. फ्रेडरिक टोएट्स सांगतात की, "या प्रकारावर जर कोणी शारीरिकदृष्ट्या अवलंबून असेल आणि हे सोडल्यावर कोणती शारीरिक जखम होणार असेल तर सतत सेक्स करणं हे व्यसन असू शकत नाही." यामुळे याची विस्तृत व्याख्याच अधिक मदत करू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे.

कोणतही व्यसन दोन प्रकारे ओळखलं जातं. आनंद, सुख किंवा कौतुकाची अपेक्षा करणं. कौतुकाची अपेक्षा ही व्यसनाला एखादी गोष्ट बंधनकारक वाटण्याच्या (कंपलसिव्ह डिसॉर्डर्स) प्रकारांतून वेगळं करते. या दोन्ही प्रकारांमध्ये बऱ्याच अंशी समानताही आहे, असं टोएट्स यांचं मत आहे.

टोएट्स पुढे सांगतात, "व्यसनी लोक अल्पकालिन फायद्याच्यामागे असतात. पण, त्यांचं दिर्घकालिन नुकसान होत असतं याचा त्यांना विसर पडतो. याऊलट एखादी गोष्ट बंधनकारक वाटणारे लोक त्यांना त्यातून कोणताही आनंद मिळत नसेल तरी ती गोष्ट करत राहतात."

आनंदाची इच्छा आपल्या सगळ्यांमध्येच असते. मग, कौतुकाची किंवा एखाद्या बक्षिसाची अपेक्षा असणं आणि व्यसन यात अंतर ते नेमकं काय?

एखादा प्रकार जेव्हा उग्र स्वरुप धारण करून व्यक्ती किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्यांना नुकसान पोहोचवत असेल तर त्याला व्यसन समजावं, असं मानसशास्त्रज्ञ डॉ. हॅरिएट गॅरॉर्ड मानतात.

त्या सांगतात, "जुगार खेळण्याला आणि जास्त खाण्याच्या व्यसनाला आजार मानलं गेलं आहे. पण, सेक्स करणं जनमानसांत अनेक वर्षांपासून असल्यानं त्याला व्यसन मानलं जात नाही."

जुगार खेळणं आणि जास्त खाणं या व्यसनानं त्रस्त असलेले मदतीसाठी डॉक्टरांकडे पुढे आले आहेत. त्यामुळे हा आजार आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मिळाले आहेत.

मनोविकारतज्ज्ञ डॉ. अबिगेल सान या सांगतात की, "सेक्स करणं हे सुद्धा व्यसन मानलं जाऊ शकतं. पण, ज्या लोकांचं हे व्यसन त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे, त्यांच्या अशा वागण्यामागे काही वेगळी कारणं असू शकतात. म्हणजे कुठली तरी चिंता, आघात यातून वर येण्यासाठी ते सेक्सकडे वळलेले असू शकतात."

सान पुढे सांगतात, "वेगवेगळ्या हालचाली, क्रिया किंवा मादक पदार्थांचं सेवन हे एखाद्याला सुख देत असतं. सेक्स करण्यातून पण असं होत नसेल हे कशावरून? पण, याचे ठोस पुरावे आमच्याकडे अजूनतरी नाहीत."

पण, सेक्स करण्याला व्यसन मानल्यानं त्यातून लोकांची मदत होईल असं त्यांना वाटत नाही. विशेषकरून दुसऱ्या समस्यांना विसरण्यासाठी जे सेक्स करतात त्यांच्यासाठी मदत होईल असंही त्यांना वाटत नाही.

यावरून ओव्हर डायग्नोसिस म्हणजे जास्त तपासलं जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे चुकीची औषधं देण्याचं प्रमाणही वाढू शकतं.

मग, सेक्सचं व्यसन मिथक आहे का?

सेक्स करण्याचं व्यसन हा वास्तविकतः एक आजार आहे, याचा स्वीकार अनेक जण करत नाहीत. 'द मिथ ऑफ सेक्स अॅडिक्शन' हे पुस्तक लिहीणारे सेक्स थेरपिस्ट डेविड ले यावर सांगतात की, "साधारणतः जेव्हा एखाद्याला सेक्सचं व्यसन आहे हे मानलं जातं, तेव्हा त्याच्या मूड किंवा राग यांच्याशी संबंधीत समस्यांवर उपचार न केल्याचं ते लक्षण असतं."

ते सांगतात, "सेक्सचं व्यसन असल्याची धारणा ही चांगले किंवा आरोग्यदायी शरीर संबंध कसे आहेत, याच्या नैतिक मूल्यांवर आधारित आहे. तुम्ही तुमच्या थेरपिस्टच्या याबाबतच्या धारणेच्या व्यतिरिक्त किंवा भलत्याच पद्धतीनं सेक्स करत असाल तर तुम्हाला सेक्सचं व्यसन आहे असं तो थेरपीस्ट मानू शकतो."

इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजच्या पुढल्या टप्प्यात कंपलसिव्ह सेक्शुअल बिहेविअरला सहभागी केल्यावर काही शोधकर्त्यांनी एक पत्र लिहीलं. या तर्काला टाळता आलं पाहिजे असं या शोधकर्त्यांना वाटतं.

सेक्स करण्याला व्यसन घोषित करण्याची मागणी करणाऱ्यांना असं वाटतं की, व्यसन घोषित केल्यानं लोक यासाठी मदत घेण्यासाठी पुढे येतील. सेक्सचं व्यसन ही मूळ समस्या असो किंवा अन्य कारणामुळे ही समस्या जडली असो, लोक मदतीला पुढे येतील ही बाब महत्त्वाची आहे.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top