Saturday, 16 Nov, 8.41 am BBC मराठी

होम
शरद पवार: महाराष्ट्रात सत्तास्थापन 17 नोव्हेंबरला होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड, पण सत्ता 5 वर्षं टिकेल - शरद पवार

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला नवे सरकार स्थापन होईल अशी चर्चा आहे. मात्र राज्यात 17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे, पण शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं सरकार 5 वर्षं टिकेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या नागपूर येथील घरी सदिच्छा भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. पवारांच्या या वक्तव्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी अजून वेळ लागणार असल्याचं दिसत आहे.

"राज्यात सत्ता स्थापनेसाठी आमची काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे या तीन पक्षांनी स्थापन केलेलं सरकार पूर्ण 5 वर्षं चालेल. तसंच तिन्ही पक्षाचे हे सरकार 5 वर्षं चालावे यावर आमची नजर राहील," असंही पवारांनी म्हटलं आहे.

2. NSOचा अहवाल सरकारनेच घेतला मागे

लोकांची खर्च करण्याची क्षमता दिवसेंदिवस खालावत चालली आहे, असं सांगणारा सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा (NSO) अहवाल केंद्र सरकारनेच मागे घेतला आहे. बिझनेस स्टँडर्डनं ही बातमी दिली आहे.

गेल्या 40 वर्षांत ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता 2017-18मध्ये सर्वांत कमी झाली आहे, असं या अहवालात समोर आलं होतं. मात्र "डाटा क्वालिटी" अर्थात आकडेवारीच्या गुणवत्तेचं कारण देत सरकारनेच हा अहवाल मागे घेतला आणि ही बातमी फेटाळली.

"माहितीच्या गुणवत्तेविषयी साशंकता असल्यामुळे केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं 2017-18मधील ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल प्रसिद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवरील अहवाल 2020-21मध्ये प्रसिद्ध करता येईल का, यासंबंधीची चाचपणी सरकार करत आहे," सरकारनं जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे.

3. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश

पुढच्या 3 दिवसांत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.

राज्य प्रशासनानं पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करावा, असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) कोश्यारी यांची भेट घेतली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत उपलब्ध करण्यात यावी, अशी त्यांनी विनंती केली होती.

4. शिवकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

कर्नाटकचे काँग्रेसचे नेते डी. के शिवकुमार यांच्या जामिनास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली आहे. द न्यूज मिनिटनं ही बातमी दिली आहे.

शिवकुमार यांनी यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला होता, तो रद्द करावा, अशी याचिका सक्तवसुली संचालयानं (ED) सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

ही याचिका दाखल करताना EDनं त्यांच्या पी. चिंदबरम यांच्या विरोधातल्या याचिकेतील मजकूर "कॉपी-पेस्ट" केल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्दशनास आलं. यामध्ये शिवकुमार यांचा उल्लेख "आमदार" असा करण्याऐवजी "माजी केंद्रीय गृह मंत्री" करण्यात आला होता.

5. मुंबई रेल्वे विस्तारासाठी AIIBचा हातभार

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विस्तारासाठी 'एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँके'नं (AIIB) साडेतीन हजार कोटी रुपये कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीय.

बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या वर्षी प्रथमच भारतात झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारनं मुंबईतील उपनगरीय रेल्वे तसंच मेट्रो प्रकल्पांसाठी निधी देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला अनुसरून बँकेच्या संचालक मंडळानं यंदा ऑक्टोबरमधील बैठकीत मुंबई उपनगरीय रेल्वेला अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेतला.

यासंबंधीची घोषणा करताना 'AIIB'चे उपाध्यक्ष डी. जे. पांडियन म्हणाले, "राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर बँकेनं मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांचा अभ्यास केला. सुमारे सव्वा कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरात रेल्वेचं 400 किमी लांबीचं जाळं आहे. याद्वारे दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेद्वारे ये-जा करतात. या सर्व अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर बँकेनं वित्तसाह्य देण्याचा निर्णय घेतला आहे."

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>