Friday, 22 Jan, 9.43 pm BBC मराठी

होम
सीरम इन्स्टिट्यूट आग : 'त्याच्या वडिलांना अजून सांगितलं नाहीय, मुलाचा आगीत मृत्यू झालाय'

''सकाळी मला चहाची टपरी लावून दिली. मला म्हणाला, मी संध्याकाळी येईन तोपर्यंत तू आवरायला घे अन् संध्याकाळी तो गेल्याचंच कळालं... त्याच्या वडिलांना अजून माहितंच नाहीय तो गेला म्हणून... ते हॉस्पिटलमध्ये आहेत...''

प्रतीक पाष्टेची आई डोळ्यांतील अश्रू पुसत सांगत होती.

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत प्रतीक पाष्टे याचा होरपळून मृत्यू झाला. एका कंपनीतर्फे तो सीरममध्ये बॅटरी बसवण्यासाठी गेला होता. अचानक लागलेल्या आगीमुळे त्याला बाहेर पडता आले नाही अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला.

प्रतीकचं कुटुंब पुण्यातील प्रभात रोडवरील एका गल्लीमध्ये छोट्याश्या घरात राहतं. त्याला एक लहान भाऊ आहे. प्रतीकचे आई-वडील घराच्या मागेच असलेल्या कॅनल रोडला चहाचा छोटासा स्टॉल चालवतात.

दोनच दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांना तब्येतीच्या काही समस्या जाणवू लागल्याने एका रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रतीकच्या निधनाची बातमी अद्याप त्यांना सांगितलीच नाहीय.

''त्याने सकाळी मला चहाचा स्टॉल लावून दिला तेव्हा त्याला फोन आला होता. त्याला सीरमला कामासाठी जायचं होतं. मला म्हणाला मी तिकडे जाऊन येतो. तू संध्याकाळी स्टॉल आवरायला सुरुवात कर तोपर्यंत मी येतो. अन तो परत आलाच नाही. त्याचे वडील आजारी होते, त्यामुळे त्यांना दोनच दिवसांपूर्वी दवाखान्यात दाखल केलंय. त्यांना अजून प्रतीक गेल्याचं माहित नाहीय. त्यांना हे सांगण्याच्या परिस्थितीत ते सध्या नाहीत.''

"कॉलेजकरुन तो जॉब करत होता, दीड वर्षांपूर्वीच ताो नोकरीला लागला होता. त्याच्या वडिलांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्याच्यावरच माझं सगळं अवलंबून होतं...," प्रतीकची आई सांगत होती.

गुरुवारी संध्याकाळी पहिल्यांदा प्रतीकचा अपघात झालाय असं त्याच्या कुटुंबाला सांगण्यात आलं. नंतर त्याचा सीरमला लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याचं समोर आलं. रात्री उशीरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आगीत त्याचं शरीर भाजल्याने त्याच्या आईला त्याला शेवटचं पाहता देखील आलं नाही.

"शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्याने दीड वर्षापूर्वी नोकरी धरली होती. त्यामुळे आता वाटत होतं सगळं चांगलं होतंय, त्यातच ही घटना घडली," असं त्याचे मामा गणेश घाणेकर सांगत होते.

"प्रतीक त्याच्या मित्रांमध्ये लाडका होता. सगळ्यांच्या मदतीला तो नेहमीच धावून जायचा. घरची परिस्थिती हलाखिची असताना देखील त्याने शिक्षण पूर्ण केले होते," असं सांगताना त्याचे मामा गहीवरुन जातात.

प्रतीक त्याच्या घरच्यांना मोठा आधार होता. कोव्हिडची लस तयार करणाऱ्या सीरममध्ये काम करायला जायला मिळतंय, त्यांच्या इमारतीच्या उभारणीमध्ये आपला हातभार लागतोय याचा त्याला अभिमान वाटत होता, असं त्याचे मित्र सांगतात.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top