Sunday, 24 Jan, 8.35 am BBC मराठी

होम
सृष्टी गोस्वामी : 19 वर्षांच्या मुलीकडे एका दिवसासाठी मुख्यमंत्रिपद का?

हरिद्वार जिल्ह्यातील दौलतपूर या गावातील सृष्टी गोस्वामी ही मुलगी सध्या चर्चेत आहे. कारण रविवारी (24 जानेवारी) राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने या मुलीकडे चक्क उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. सृष्टी उत्तराखंडची एका दिवसासाठीची मुख्यमंत्री असेल.

ती उत्तराखंडची पहिली महिला मुख्यमंत्री असेल. अर्थात, हे प्रतीकात्मक असेल आणि ती बाल विधानसभा सत्रात मुख्यमंत्री म्हणून सरकारच्या वेगवेगळ्या विभागातील कामांचा आढावा घेईल.

याच दरम्यान विभागीय अधिकारी आपल्या कामाची माहिती सृष्टीला देतील आणि ती त्यासंबंधीच्या तिच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सांगेल.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील. उत्तराखंड विधानसभेच्या एका सभागृहात रविवारी दुपारी 12 ते 3 या वेळात हा कार्यक्रम पार पडेल.

मुख्यमंत्री बनविण्यामागचा उद्देश काय?

सृष्टिला एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनविण्याच्या या उपक्रमाचा उद्देश हा मुलींमध्ये महिला सक्षमीकरणाबद्दल जागरुकता निर्माण करणं हा आहे, असं उत्तराखंडच्या बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी म्हटलं.

मुख्यमंत्री बनण्याच्या या संधीबद्दल सृष्टीनं सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तिनं म्हटलं, "एका दिवससाठी मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. उत्तराखंड सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी आढावा दिल्यानंतर मी त्यांना माझ्या सूचना सांगेन. मुलींच्या सुरक्षिततेसंबंधी मुद्द्यांवर मी विशेष करून माझ्या सूचना मांडेन."

सृष्टी रुरकीमधील बीएसएम पीजी कॉलेजमधून बीएससी अग्रीकल्चरचं शिक्षण घेत आहे. तिच्या वडिलांचं गावात एक दुकान आहे आणि तिची आई अंगणवाडी सेविका आहे. आपल्या मुलीला मिळालेल्या या संधीबद्दल त्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

सृष्टिची आई सुधा गोस्वामी यांनी म्हटलं की, मला माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतोय. मुली सगळं काही करू शकतात, केवळ त्यांना पाठिंबा द्या. त्या कोणापेक्षाही कमी नाहीत. त्या स्वतःचं स्थान निर्माण करू शकतात.

उपक्रमाचं स्वागत, पण...

उत्तराखंडमध्ये महिला सक्षमीकरण आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या संघटना तसंच कार्यकर्त्यांनी सृष्टीला प्रतीकात्मक पद्धतीनं एक दिवस मुख्यमंत्री बनविण्याच्या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. मात्र, त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

कुमाऊँ विद्यापाठीतील डीएसबी कँपसमधील विद्यार्थी संघटनेची पहिली महिला सरचिटणीस बनलेली भारती जोशी म्हणतात, "महिला सक्षमीकरणासाठी असे प्रतीकात्मक प्रयत्न निश्चितच आवश्यक आहेत. पण प्रत्यक्षात महिलांचं सक्षमीकरण हे मोठं आव्हान आहे.

उत्तराखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून गेल्या वीस वर्षांमध्ये इथं 9 मुख्यमंत्री झाले आहेत. पण कोणत्याही महिलेचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं नाही. वास्तविक पाहता, उत्तराखंडमध्ये महिला अधिक जबाबदाऱ्या पार पाडताना दिसतात."

भारती पुढे सांगतात, की आरक्षणामुळे ग्रामपंचायतींपासून विधानसभांपर्यंत ज्या महिला राजकारणात येऊ शकल्या आहेत, त्यांचा अभ्यास केल्यावर वेगळंच चित्र दिसतं. त्या केवळ नामधारी असतात आणि प्रत्यक्षात त्या महिलेचा नवरा, वडील किंवा इतर पुरूष नातेवाईकांच्या हातात सत्ता असते. म्हणूनच प्रतीकात्मक कृतींसोबतच महिलांच्या सक्षमीकरणासाठी वास्तवातही प्रयत्न व्हायला हवेत."

उत्तराखंडमध्ये महिलांच्या आरोग्य आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या अनेक बिगरसरकारी संस्थांसोबत काम केलेल्या मालती हलदार सांगतात, "असा दिखावा करण्याऐवजी अनेक मुलभूत प्रश्न आहेत, ज्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही कुटुंबात मुलाला आणि मुलीला जो दुधाचा ग्लास दिला जातो, त्याच्या आकारात असलेला फरक हा खरा प्रश्न आहे. मुलाला चांगल्या खाजगी शाळेत आणि मुलीला एखाद्या सरकारी शाळेत पाठवण्याची मानसिकता हा खरा प्रश्न आहे. या गोष्टींवर काम केल्याशिवाय महिलांचं सशक्तीकरण होऊ शकत नाही."

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या नायक चित्रपटातील कथेप्रमाणेच आता खऱ्याखुऱ्या आयुष्यात एका दिवसाची मुख्यमंत्री बनणारी 19 वर्षांची सृष्टी गोस्वामी खूप आनंदी आहे.

यापूर्वी मे 2018 मध्ये सृष्टी उत्तराखंडच्या बाल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडली गेली होती. उत्तराखंडमध्ये बाल विधानसभेच्या कार्यक्रमाचं आयोजन बालहक्क संरक्षण आयोगाकडून केलं जातं. यामध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातील अनेक विद्यार्थी भाग घेतात आणि आपल्या विधानसभेचं कामकाज चालवतात.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top