Wednesday, 15 Sep, 12.17 pm BBC News मराठी

होम
तालिबान: सरकार स्थापनेवरून तालिबानच्या दोन गटांत जुंपली

नवं सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावरून तालिबान संघटनेतील तीव्र मतभेद आहेत, अशी माहिती तालिबानच्याच एका ज्येष्ठ नेत्याने बीबीसीला दिली आहे.

अफगाणिस्तानातील नव्या सरकारची रचना नेमकी कशी असावी, याबाबत तालिबानमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. संघटनेचे सह-संस्थापक मौलवी अब्दुल गनी बरादर आणि एका ज्येष्ठ सदस्यात राष्ट्राध्यक्ष भवनातच याविषयी वाद झाल्याची माहिती मिळाली संबंधित नेत्याने दिली.

मौलवी बरादर यांनी काबूल सोडल्याची माहिती देखील समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून तालिबानचे नेते बरादर हे सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. त्यामुळे तालिबानमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याच्या अनेक बातम्या येत होत्या. तालिबानने या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.

तालिबान कट्टरवादी संघटनेने गेल्या महिन्यात 15 तारखेला संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तान हे यापुढे एक इस्लामिक अमिरात म्हणून ओळखलं जाईल, अशी घोषणा तालिबानने केली होती.

तालिबानच्या नव्या मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य पुरुष आहेत. गेली 20 वर्षे अफगाणिस्तानात राहिलेल्या अमेरिकन सैन्यावर हल्ला करण्याचा आरोप असलेल्या नेत्यांचाच या मंत्रिमंडळात प्रामुख्याने करण्यात आला आहे.

बीबीसी पश्तोला एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गनी बरादर आणि खलील उर-रहमान हक्कानी यांच्या समर्थकांमध्ये नुकताच संघर्ष झाला होता. त्यावरून दोघांमध्येही मोठा वाद झाला. हक्कानी यांच्याकडे सध्या निर्वासित नागरिक विषयक विभागाचे मंत्री आहेत.

वाद का वाढला?

कतार येथे वास्तव्यास असलेल्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याने तसंच या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर एका व्यक्तीने या वादाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम सरकारमध्ये गनी बरादर यांना नव्या सरकारमध्ये उप-पंतप्रधान बनवण्यात आलं आहे. पण ते सरकारच्या रचनेवरून समाधानी नाहीत. अफगाणिस्तानात आपल्या विजयाचं श्रेय घेण्यावरूनही तालिबानच्या नेत्यांमध्ये कुरघोडी पाहायला मिळतात.

एकीकडे, आपण केलेल्या चर्चांमुळेच तालिबानला अफगाणिस्तानात सत्ता हस्तगत करता आली, असं गनी बरादर यांना वाटतं. तर हक्कानी नेटवर्कच्या समर्थकांना हा विजय आपल्या लढाईच्या बळावरच मिळाल्याचं वाटतं. हक्कानी नेटवर्कची कमान सध्या तालिबानच्याच एका ज्येष्ठ नेत्याकडे आहे.

अब्दुल गनी बरादर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासोबत 2020 मध्ये फोनवरून संवाद साधला होता.

अशा प्रकारचे चर्चा करणारे ते पहिलेच नेते ठरले. तत्पूर्वी त्यांनी तालिबानच्या वतीने दोहा करारावर हस्ताक्षर केले होते. याच करारानुसार अमेरिकन सैनिकांच्या परतण्याविषयी एकमत झालं होतं.

तर, दुसऱ्या बाजूला शक्तिशाली हक्कानी नेटवर्क आहे. अफगाणिस्तानात पाश्चिमात्य सैनिकांवर करण्यात आलेल्या बहुतांश हिंसक हल्ल्यांमध्ये हा गट प्रामुख्याने सहभागी होता.

अमेरिकेने या गटाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं आहे. याच गटाचे नेते सिराजुद्दीन हक्कानी तालिबानच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री आहेत.

अब्दुल गनी बरादर यांना तालिबानचा सर्वात महत्त्वाचा चेहरा मानलं जात होतं. पण अंतरिम सरकारची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांची सार्वजनिक ठिकाणची उपस्थिती बंद झाली. सोशल मीडियावर त्यांच्या मृत्यूच्या बातम्या येत आहेत.

बरादर कुठे आहेत?

सूत्रांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, बरादर हे काबूल सोडून कंधारला निघून गेले आहेत. सोमवारी बरादर यांच्या नावे एक ऑडिओ टेप जारी करण्यात आलं. त्यामध्ये प्रवासासाठी बाहेर आल्याचं त्यांनी सांगितलं. आपण सुखरूप असल्याचंही बरादर यांनी यावेळी सांगितलं.

तालिबानच्या अनेक अधिकृत वेबसाईटवर ही ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आली आहे. पण यातील आवाज कुणाचा आहे, याविषयी बीबीसीने पुष्टी केलेली नाही.

सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसंच बरादर हेसुद्धा सुरक्षित आहेत, असं तालिबानने म्हटलं आहे. पण बरादर सध्या काय करत आहेत, याविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत.

बरादर हे कंधारला प्रमुख नेत्यांच्या भेटीकरिता गेले आहेत, असं एका प्रवक्त्याने म्हटलं होतं. पण नंतर बरादर हे थकले आहेत, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत, असं बीबीसी पश्तोला सांगण्यात आलं.

तालिबानच्या या वक्तव्यावर संशय येण्याची अनेक कारणे आहेत. तालिबानचे संस्थापक नेते मुल्ला उमर यांचा मृत्यू झाल्यानंतर ही गोष्ट तालिबानने दोन वर्षे लपवून ठेवली होती, असं त्यांनी 2015 मध्ये कबूल केलं होतं. विशेष म्हणजे, या कालावधीत तालिबान संघटना मुल्ला उमर यांच्या नावाने घोषणा अथवा प्रसिद्धीपत्रक जाहीर करायची, हे विसरून चालणार नाही.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top