Saturday, 31 Jul, 7.51 pm BBC News मराठी

होम
Tokyo Olympic 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

पूल-अ गटात ग्रेट ब्रिटेननं आयर्लंडला 2-0नं पराभव केल्यामुळे असं झालं आहे. आयर्लंडच्या पराभवामुळे भारत आपल्या गटामध्ये चौथ्या क्रमांकावर आला आहे. आयर्लंडने सामना जिंकला असता तर भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आलं असतं.

दरम्यान, आज (31 जुलै) महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेवर 4-3 विजय मिळवला. गोलची हॅट्ट्रिक करणारी वंदना कटारिया या विजयाची शिल्पकार ठरली.

कमलप्रीत कौर अंतिम फेरीत दाखल

भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

कमलप्रीत कौरने दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर थाळीफेक केली. तर तिसऱ्या प्रयत्नात तिने 64 मीटरचा पल्ला गाठला. त्यामुळे ती ग्रुप बीमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली.

कमलप्रीत कौरची अंतिम फेरी येत्या सोमवारी म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी होईल.

अंजूम मोडगिल- तेजस्विनी सावंत पात्रता फेरीत गारद

ही ऑलिम्पिकवारी नेमबाजी पथकासाठी निराशाजनक ठरली आहे. 50 मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंजूम मोडगिल आणि तेजस्विनी सावंत या दोघी अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकल्या नाहीत.

मनू भाकेर, राही सरनोबत, अंजूम मोडगिल, एरावली व्हेलावरन, तेजस्विनी सावंत यांच्यापैकी कोणालाच लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

सौरभ चौधरी एका प्रकारात अंतिम फेरीसाठी पात्र ठरला मात्र अंतिम फेरीत त्याची कामगिरी सर्वसाधारण झाली. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने देशाला पहिलंवहिलं वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. लंडन ऑलिम्पिकमध्ये गगन नारंग आणि विजय कुमार यांनीही पदकाची कमाई केली होती. 2004मध्ये राज्यवर्धन सिंग राठोडने पदक मिळवून दिलं होतं.

मात्र रिओ आणि आता टोकियोत नेमबाजांना पदकाने दूरच ठेवलं आहे.

अमित पंघाल पराभूत

भारताचा क्रमांक एकचा बॉक्सर अमित पंघाल याला पराभवाचा सामना करावा लागला. त्याला कोलंबियाच्या हेन्री मार्टिनेजने 4-1 च्या फरकाने पराभूत केले. त्यामुळे या गटातील भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

अतानू दासचं आव्हान संपुष्टात

काही दिवसांपूर्वी कोरियाच्या तिरंदाजाचं आव्हान मोडून काढणाऱ्या अतानू दासला पराभवाला सामोरं जावं लागलं. यजमान जपानच्या ताकाहारू फुरुकावाने अतानूवर 6-4 असा विजय मिळवला.

पहिला सेट फुरुकावाने जिंकला तर दुसऱ्यात बरोबरी झाली. तिसरा सेट अतानूने जिंकला. चौथ्यात पुन्हा बरोबरी झाली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फुरुकावाने बाजी मारली.

टोकियो ऑलिम्पिक : कोणत्या देशांना किती पदकं?

अतानूच्या पराभवासह ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताचं सांघिक तसंच वैयक्तिक फेरीतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

"आपण ऑलिम्पिककडे खूप गांभीर्याने पाहतो. आपण खेळाचा आनंद लूटला पाहिजे. विश्वचषक तसंच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकतो तेव्हा कोणालाही माहिती नसतं. ऑलिम्पिक स्पर्धेकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्यामुळे दडपण वाढतं. ऑलिम्पिकसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयारी व्हायला हवी", असं अतानूने सामना संपल्यानंतर सांगितलं.

सिंधूव्यतिरिक्त बॉक्सिंगपटू अमित पांघाल, पूजा राणी यांच्या लढती होतील. पदक पक्कं करण्याची हुकूमी संधी पूजा राणीकडे आहे.

नेमबाजीत 50मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तेजस्विनी सावंत आणि अंजूम मोडगिल सहभागी होतील.

भारतीय महिला हॉकी संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. सेलिंग आणि अथलेटिक्समध्येही भारताचे विविध खेळाडू सहभागी होतील.

शुक्रवारी काय काय घडलं?

सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा 2-0 नं पराभव करत अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलं होतं.

लव्हलिना बोरगोहाईंनं बॉक्सिंगच्या उपांत्यफेरीत प्रवेश करत पदक निश्चित केलं होतं.

लव्हलिनानं 69 किलो वजन गटात उपांत्यपूर्वी फेरीत चीनच्या तैपेईच्या निएन-चीन-चेन चा पराभव करत ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरं आणि वैयक्तिक किमान कांस्य पदक निश्चित केलं आहे.

भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघांनी विजयी आगेकूच केली. पुरुष संघाने यजमान जपानवर 5-3 असा विजय मिळवला तर महिला संघाने आयर्लंडवर 1-0 अशी मात केली.

नेमबाजीत मनू भाकेर आणि राही सरनोबत तर तिरंदाजीत दीपिका कुमारी यांनी निराशानजक कामगिरी केली.

दीपिकाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण कोरियाच्या अन सॅनने दीपिकाचा 6-0 असा धुव्वा उडवला. दीपिकाची ही तिसरी ऑलिम्पिकवारी होती. मिश्र प्रकारात प्रवीण जाधवबरोबर खेळतानाही दीपिकाचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

स्टीपलचेस प्रकारात अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम मोडला पण अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरू शकला नाही.

नेमबाजीत 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनू भाकेर आणि राही सरनोबत यांना अंतिम फेरी गाठण्यात अपयश आलं.

दरम्यान गोल्डन स्लॅमचे स्वप्न पाहणाऱ्या जागतिक क्रमवारीत अव्वल नोव्हाक जोकोव्हिचचं एकेरी आणि दुहेरीतलं आव्हान संपुष्टात आलं.

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वरेव्हनं जोकोव्हिचवर 1-6, 6-3, 6-1 असा विजय मिळवला.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा..

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top