Saturday, 31 Jul, 8.48 pm BBC News मराठी

होम
Tokyo Olympic डायरी - जपानमधल्या 'कोनबिनी'ची सफर

टोकियोत आल्यापासून चौदा दिवस होऊन गेले आहेत. त्यामुळे आमच्यावरचे निर्बंध आता बरेच शिथिल झाले आहेत. तरीही दिवसभरात एवढा वेळ कामात निघून जातो, की भूक लागल्यावरच जेवणाची आठवण होते.

पण कोव्हिडमुळे आणीबाणी असल्यानं टोकियोतली रेस्टॉरंट्स लवकर बंद होतात. शिवाय आम्ही ऑलिंपिकच्या बबलमध्ये आहोत, म्हणजे असं कुठेही जाऊन जेवू शकत नाही. क्वारंटाईनच्या पहिल्या चौदा दिवसांत फक्त पंधरा मिनिटं बाहेर जाण्याची मुभा होती.

अशा वेळेला 'कोनबिनी'चा आधार महत्त्वाचा ठरतो आहे.

कोनबिनी म्हणजे जपानमधलं कन्व्हिनियन्स स्टोर (convenience store). अर्थात छोटंसं सुपरमार्केट. तुम्ही म्हणाल सुपरमार्केटचं काय एवढं कौतुक? तर ही कोनबिनी खरंच कौतुक करण्यासारखी आहेत.

आपल्याकडे नाक्यावरचं दुकान नसतं का, जिथे किराणा सामानापासून ते स्टेशनरी वगैरे सगळं मिळतं? ही कोनबिनी काहीशी तशीच असतात. पण किराणा मालापेक्षा बरंच काही मिळतं इथे आणि हो, इथे सगळा माल कोंबून ठेवलेला नसतो, तर जपानमधल्या बऱ्याच गोष्टींसारखा नीट आखीव-रेखीव.

अगदी छोट्याशा जागेतही मांडण्यांवर किंवा हुकला अडकवून गोष्टी अगदी छान रचून ठेवलेल्या असतात.

इथे काय मिळत नाही? खाद्यपदार्थांपासून ते कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, कपडे, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, वर्तमानपत्रं, कॉमिक्स, छत्री-रेनकोट, काही औषधं, स्वच्छतेसाठी आवश्यक प्रोडक्टस, अगदी अल्कोहोल आणि साकेसुद्धा... मोठी यादीच होईल.

पण फक्त वस्तूच नाही, तर सोयीसुविधाही ही दुकानं पुरवतात. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोफत आणि स्वच्छ टॉयलेटस.

त्याशिवाय एटीएम, कुरियर सर्व्हिस, बिलं भरणं, पोस्ट, नाटक-सिनेमा-इव्हेंट्सची तिकिटं, प्रिंटर असं आणखीही खूप काही कोनबिनीमध्ये उपलब्ध असतं. काही ठिकाणी तर बसण्याची आणि फ्री वायफायचीही सोय असते.

एकप्रकारे खरोखरच ग्राहकांच्या कन्व्हिनियन्सची म्हणजे सोयीची आहेत ही दुकानं आणि मुख्य म्हणजे ती चोवीस तास सुरू असतात.

जपानमध्ये अशी हजारो कोनबिनी आहेत. विशेषतः टोकियोमध्ये सेव्हन इलेव्हन, फॅमिली मार्ट, लॉसन अशा कोनबिनीची तर मोठी साखळीच आहे शहरभर.

अगदी आम्ही जिथे बऱ्याचदा ये-जा करतो, त्या प्रेस सेंटरच्या इमारतीतही एक कोनबिनी आहे. इथे शॉपिंग करता करताच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकारांशी मजेशीर गप्पाही रंगतात. म्हणजे कोणता पदार्थ विकत घ्या, याविषयी टिप दिल्या जातात एकमेकांना. अर्थात हे सगळं एकमेकांत अंतर राखून करायचं भानही ठेवावं लागतं.

अशा कोनबिनीवर फक्त आम्हीच नाही तर हजारो टोकियोवासी जेवणासाठी अवलंबून असतात.

कोनबिनी मध्ये खाद्यपदार्थांची तर रेलचेलच दिसून येते. ताज्या गरमागरम स्नॅक्सपासून ते इन्स्टंट रामेन आणि फ्रीजमध्ये साठवलेल्या रेडी-टू-इट खाद्यपदार्थांपर्यंत खूप काही पर्याय असतात.

प्लॅस्टिकच्या 'बेंटो बॉक्स' मध्ये शिजवलेलं तयार जेवण ठेवलेलं असतं. हा बेंटो बॉक्स म्हणजे आपल्याकडे खणांचा डबा असतो, तसाच प्रकार आहे. तर भात आणि करीपासून पास्ता, सुशी, नूडल्स आणि सलाड असे वेगवेगळे बेंटो म्हणजे जेवणाची उत्तम सोय.

असं तयार जेवण विकत घेऊन मग मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाल्लं जातं. किंवा काही पदार्थ थंडच खायचे असतात.

फूडी असले, तरी आधी असं फ्रीजमध्ये ठेवलेलं पुन्हा गरम करून जेवायचं की नाही असा मलाही प्रश्न पडला. पण पहिल्या घासातच हे जेवण किती ताजं आणि रुचकर असतं, याची प्रचीती लगेच आली. तक्रार फक्त प्लॅस्टिकविषयी आहे आता. पण सध्यातरी पर्याय नाही दुसरा.

आता चौदा दिवसांचा काळ झाल्यानं काही ठिकाणी जाण्याची परवानगी मिळाली आहे आणि मीही बाहेर जेवायला जाण्याची वाट पाहते आहे. तोवर मात्र कोनबिनीची साथ आहेच.

भारतीय खेळाडूंचे सामने कधी आहेत? पाहण्यासाठी क्लिक करा...

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top