Tuesday, 10 Aug, 10.28 am BBC News मराठी

होम
Tokyo Olympics : खासदार ते शास्त्रज्ञ... ऑलिम्पिकमध्ये 'या' 7 महिलांनी उमटवला ठसा

एक डोळा प्रशिक्षणावर तर दुसरा प्रयोगशाळेवर... टोकियो ऑलिम्पिकच्या व्यायामशाळा, स्टेडियम, आणि ट्रॅकमधून गेलेल्या काही निवडक महिला खेळाडूंचा हा दिनक्रम.

त्यांनी एक अनोखं आव्हान पेललं. विज्ञानात करिअर करताना सोबतच क्रीडा क्षेत्रात रेकॉर्ड आणि पदकांच्या शोधात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणं.

आपण 7 अशा खेळांडूंची ओळख करून घेणार आहोत ज्यांनी क्रीडा आणि शिक्षण दोन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

1. अॅना किसेनहोफर (ऑस्ट्रिया)

30 वर्षीय ऑस्ट्रियन सायकलपटू असणाऱ्या अॅना टोकियोमध्ये महिलांच्या रोड रेसिंग स्पर्धेसाठी पसंतीच्या खेळाडूंच्या यादीजवळही नव्हत्या.

मात्र, ट्रेनिंगसाठी प्रशिक्षक किंवा कुठलीही व्यावसायिक क्रीडा सुविधा उपलब्ध नसूनही त्यांनी सुवर्ण पदक पटकावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ऑस्ट्रियन सायकलपूट अॅना किसेनहोफरने सर्वात जवळच्या प्रतिस्पर्धी, सध्याचा विश्वविजेत्या डच खेळाडू अॅनेमिक व्हॅन व्ह्लुटेनला मात देत सुवर्णपदक पटकावलं.

2021 च्या ऑलिम्पिक चॅम्पियन अॅना किसेनहोफर एक गणितज्ञ आहेत. त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ व्हिएन्ना आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी, यूकेमधून पदवी प्राप्त केली आहे.

त्या सध्या स्वित्झर्लंडमधील लॉसाने टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन आणि अध्यापन करतात.

2. हादिया होस्नी (इजिप्त)

टोकियो ऑलिम्पिक होस्नीची शेवटची स्पर्धा असू शकते.

वुमेन्स डबल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये बाद झाल्यानंतर इजिप्तच्या या खेळाडूने निवृत्तीचे संकेत दिले होते.

इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार होस्नी म्हणाल्या होत्या, "ही माझी शेवटची ऑलिम्पिक असण्याची दाट शक्यता आहे. सर्व स्पर्धांसाठी प्रवास करणे आणि जागतिक क्रमवारीत स्वतःला चांगल्या क्रमवारीत ठेवणं खूप तणावपूर्ण आहे."

मात्र, होस्नी त्यांची शैक्षणिक कारकीर्द सुरू ठेवणार आहेत. त्या ब्रिटिश युनिव्हर्सिटी ऑफ इजिप्तमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

यूकेच्या बाथ विद्यापीठातून बायोमेडिसिनमध्ये पदव्युत्तर पदवी आणि इजिप्तच्या कैरो विद्यापीठातून फार्माकोलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेल्या होस्नी यांनी डेक्सामेथासोन या विविध रोगांवर वापरल्या जाणाऱ्या अँटी-इन्फ्लेमेटरी औषधावर संशोधन आणि लेख प्रकाशित केले आहेत.

होस्नीचे वेळापत्रक राजकारणानेही भरलेले असेल. कारण त्या इजिप्शियन संसदेच्या सदस्यदेखील आहेत.

3. गॅबी थॉमस (युनायटेड स्टेट्स)

24 वर्षांच्या अमेरिकन गॅब्रिएल थॉमस, अॅथलेटिक्समध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. 200 मीटर स्प्रिंटींगमध्ये त्या आतापर्यंतच्या तिसऱ्या सर्वात वेगवान महिला आहेत.

गॅबी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थॉमस यांनी टोकियोमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे.

विशेष म्हणजे स्प्रिंटींगच्या प्रशिक्षण आणि स्पर्धा दरम्यान त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात न्यूरोबायोलॉजी आणि जागतिक आरोग्याचादेखील अभ्यास केला आहे.

थॉमस सध्या ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठात साथरोग विज्ञान आणि आरोग्य व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी घेत आहेत.

अमेरिकेतील आरोग्य सेवां प्राप्त करण्यात वांशिक असमानता, हा त्यांचा संशोधनाचा मुख्य विषय आहे.

4. शार्लोट हायम (फ्रान्स)

12 वर्षांच्या असताना शार्लेट हायम यांना पॅरिसमधील त्यांच्या घराजवळ स्केटिंग करणाऱ्या लोकांचं फार कौतुक वाटायचं.

"ते खूप छान दिसायचं आणि मला तेच करायचं होतं," 28 वर्षांच्या शार्लेट यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

स्केटबोर्डिंगच्या ऑलिम्पिक पदार्पणातच हायमचं आव्हान संपुष्टात आलं. मात्र, टोकियोमध्ये ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी ही स्पर्धक न्यूरोसायन्समध्ये डॉक्टर आहे.

नवजात बालकांच्या मोटर स्किलच्या विकासावर आईच्या आवाजाचा काय परिणाम होतो, यावर त्या संशोधन करत आहेत.

स्ट्रीट स्केटबोर्डिंगच्या पात्रता फेरीतच डॉ. हायम यांना बाहेर पडावं लागलं.

5. लुईस शनाहन (आयर्लंड)

24 वर्षांच्या आयरिश धावपटू लुईस शनाहन यांचं लक्ष्य स्पष्ट होतं : पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र होणं.

मात्र, निकाल अपेक्षेपेक्षा लवकर आला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी त्या पात्र ठरल्या. खेदाची बाब म्हणजे क्वालिफाईंट राउंडमध्येच त्या बाद झाल्या.

यामुळे शनाहन यांनी त्यांचं लक्ष पुन्हा एकदा 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिककडे केंद्रित केलं आहे. मात्र, त्यासोबतच विज्ञानातही त्यांचं काम सुरू आहे. तेही क्वांटम फिजिक्समध्ये.

कॉर्क विद्यापीठातील पदवीधर झालेल्या शनाहन सध्या केंब्रिज विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.

मेडिकल फिजिक्स हा त्यांच्या आवडीचा विषय. त्या कर्करोगाचे निदान आणि उपचार सुधारू शकणाऱ्या साधनांचा अभ्यास करणं आणि ती विकसित करण्याचं काम करतात.

टोकियो ऑलिम्पिकाधी कॅम्ब्रिज इंडिपेंडंट वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शनाहन यांनी सांगितलं होतं, "मला दोन करिअर करायला आवडतात. कारण जेव्हा प्रयोगशाळेत गोष्टी वाईट घडतात तेव्हा मी स्वतःला सांगू शकते की मी धावपटू आहे आणि मग सगळं ठीक होतं."

"आणि आता जर अॅथलेटिक्समध्ये माझी कामगिरी वाईट ठरली तेव्हा मी क्वांटम फिझिसिस्ट आहे, असं स्वतःला सांगू शकते."

6. नाडीन अपेट्झ (जर्मनी)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या रिंगमध्ये प्रवेश करूनच एपेट्झने इतिहास घडवला. ऑलिम्पिक महिला बॉक्सिंगमध्ये सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या जर्मन खेळाडू ठरल्या.

मात्र, 35 वर्षांच्या अपेट्झ पहिल्याच वेल्टरवेट लढतीत भारताच्या लवलीना बोर्गोहेनकडून हरल्या.

युरोपियन स्पर्धा आणि जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावणाऱ्या जर्मनीच्या अपेट्झ यांना आता त्यांच्या इतर कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचं आहे.

त्यांनी जर्मनीतील ब्रेमेन विद्यापीठातून न्यूरोसायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. आता त्यांना जर्मनीतीलच कोलोन युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरेट पूर्ण करायची आहे.

अपेट्झ डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाच्या तंत्राचा अभ्यास करत आहेत. यात मेंदुतील 'ग्रे मॅटर' च्या विशिष्ट भागात इलेक्टिक किंवा विद्युत चुंबकीय प्रवाह लागू करतात.

या उपचारात मोठी क्षमता आहे आणि भविष्यात पार्किन्सन रोग असलेल्या व्यक्तींसाठी ही उपचार पद्धती मोलाची ठरू शकते.

टोकियो ऑलिम्पिकपूर्वी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अपेट्झ म्हणाल्या होत्या, "टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी करणं खूपच तणावपूर्ण होते. जेव्हा मी जपानहून परत येईन, तेव्हा मी माझ्या अभ्यासावर 100% लक्ष केंद्रीत करेन."

7. अँड्रिया मुरेझ (इस्रायल)

कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या 29 वर्षांच्या अँड्रिया मुरेझ यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून जीवशास्त्रातात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

मात्र, पोहण्याच्या आवडीने त्यांना इस्रायलमध्ये दर चार वर्षांनी होणाऱ्या मॅकाबियाड्स या स्विमिंग स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली.

या खेळात चांगली कामगिरी केल्यानंतर, मुरेझने कायमस्वरूपी इस्रायलमध्ये जाण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये अॅथलीट, जीवशास्त्रज्ञ आणि भविष्यातील डॉक्टर यांनी स्विमिंगच्या 50, 100 आणि 200-मीटर फ्रीस्टाइल आणि 4x100 मिश्रित मेडले रिले या चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये भाग घेतला.

त्यांची सर्वोत्तम कामगिरी रिलेमध्ये होती. रिलेत इस्रायली संघ अंतिम फेरीत आठव्या स्थानावर राहिला.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top