Saturday, 07 Aug, 8.44 pm BBC News मराठी

भारत
Tokyo Olympics : नीरज चोप्रानं भालाफेकीत पटकावलं सुवर्णपदक

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सुवर्णपदकाची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

भारताच्या नीरज चोप्राने अत्यंत दिमाखदार कामगिरी करून भारताला पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं.

नीरज चोप्राने भालाफेकीच्या पहिल्या टप्प्यातील तीन फेकींमध्ये अनुक्रमे 87.03, 87.58 आणि 76.82 मीटर अंतरावर भाला फेकला.

त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दोन फेकीमध्ये नीरज अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्याचा भाला 80 मीटरपेक्षाही कमी अंतरावर राहिला. शिवाय, नीरजने समोरील लाईन पार केल्याने त्या फेकी फाऊलही ठरल्या.

पण, याचा नीरजच्या पदकावर काहीही परिणाम झाला नाही.

त्याने आपलं सुवर्णपदक दुसऱ्याच फेकीत निश्चित करून ठेवलं होतं. ते अंतर इतर कोणताच खेळाडू पार करू शकला नाही.

अखेर, नीरज चोप्राच्या 87.58 मीटर फेकीसाठी त्याला सुवर्णपदकाने गौरवण्यात आलं.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेलं हे पहिलंच सुवर्णपदक आहे.

दरम्यान, नीरज चोप्राच्या सुवर्णपदकामुळे भारताची पदकसंख्या आज (8 ऑगस्ट) सातवर पोहोचली.

शिवाय आजच्या दिवशी भारताला मिळालेलं हे दुसरं पदक आहे. दुपारी झालेल्या कुस्तीच्या सामन्यात भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कांस्य पदकाची कमाई केली होती.

आणि माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले- जान्हवी मुळे, टोकियाहून

मला अजूनही विश्वास बसत नाहीये. नीरजने अंतिम फेरीत फेकलेला पहिला भाला मला अनेक वर्ष लक्षातराहील. एखाद्या मिसाईलसारखा तो भाला रोरावत सुटला. तीक्ष्ण, खणखणीत आणि हवेतून वेगवान असा तो भाला 87 मीटर अंतरावर जाऊन विसावला.एखाद्या भालाफेकपटूला अतीव आनंद देईल अशा ठिकाणी तो भाला पोहोचला होता.

महिलांची 10,000 मीटरची अंतिम स्पर्धासुरू असतानाच भालाफेकीची स्पर्धा सुरू होती. अथलेटिक्स मैदानात गोंधळ होता. पण नीरजला कशानेही फरक पडला नाही. तो निवांत आणि शांत होता. पहिला भाला फेकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. दुसरा भाला फेकल्यानंतर त्याचा आत्मविश्वास दुणावला. तिथेच त्याचं सुवर्णपदक पक्कं झालं.

भारतीय अॅथलेटिक्ससाठी अविश्सनीय असाहा क्षण होता. या क्षणाची देश आतूरतने अनेक वर्ष प्रतीक्षा करत होता. इतिहासात ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये भारत पदकाच्या समीप होता. मात्र अनेकदा रसभंग झाला होता. काही दिवसांपूर्वीच ज्यांचं निधन झालं ते ज्येष्ठ धावपटू मिल्खा सिंग, पी.टी. उषा आणिअंजू जॉर्ज हे सगळे पदकाच्या समीप आले पण तो अडथळा ओलांडू शकले नाहीत.

शनिवारी नीरजने सिद्ध केलं की भारतीय सुवर्णपदक पटकावू शकतात. नीरज पोडियमवर आला तेव्हा त्याने खांद्याभोवती तिरंगा लपेटला होता. मैदानात उपस्थित भारतीय चाहते त्याच्या नावाचा जयघोष करत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. क्रीडा पत्रकार म्हणून अशा ऐतिहासिक घटनांचं स्वप्न तुम्ही पाहिलेलं असतं. पत्रकाराने तटस्थ असावं, चाहत्यांच्या भूमिकेत जाऊ नये अशी शिकवण दिलेली असते. पण असे काही क्षण असतात जेव्हा पत्रकारामधला चाहता वरचढ ठरतो. आज माझं असंच काहीसं झालं.

बजरंग पुनियाला कांस्यपदक

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताचा पैलवान बजरंग पुनिया याने कुस्ती खेळप्रकारात 65 किलो वजनी गटात ब्रांझ पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे.

ब्रांझ पदकासाठी झालेल्या सामन्यात बजरंग पुनियाने कझाकस्तानच्या डोअलेट कोलकेस्तेवचा 8-0 अशा फरकाने पराभव केला.

सुरुवातीपासूनच बजरंग पुनियाने आक्रमक खेळ दाखवून एकामागून एक गुण मिळवले. आपल्या खेळात कोणतीही चूक होऊ न देता पुनियाने एकतर्फी विजयश्री प्राप्त केली.

प्राथमिक फेरीत दमदार कामगिरी केलेल्या बजरंगला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

भारताच्या खात्यात आतापर्यंत पाच पदकं असून, पुनियामार्फत भारताला मिळालेलं हे सहावं पदक आहे.

आता भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्रवर सर्वांची नजर असेल.

भालाफेकीच्या पात्रता फेरीत नीरज चोप्राने अतिशय सुरेख कामगिरी केली होती. यामुळे नीरजकडून अंतिम फेरीत अपेक्षा वाढल्या आहेत.

दरम्यान अमेरिकेने गुणतालिकेत शंभरी ओलांडली आहे.

गोल्फपटू अदिती अशोकला चौथं स्थान

गोल्फमध्ये अखेर आदिती अशोकला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. अत्यंत दर्जेदार खेळ करत आदितीनं पदकासाठी दावा ठोकला होता. पण केवळ एका शॉटच्या फरकानं तिचं पदक हुकलं.

आदितीनं आजच्या 18 होलच्या चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला अगदी पहिल्या स्थानापर्यंतही मजल मारली होती. पण काही होलसाठी पट करताना शॉटची संख्या वाढल्यानं तिचं पदक हुकलं.

मात्र आदितीची ही कामगिरी भारतीय गोल्फसाठी ऐतिहासिक अशी ठरली आहे. आदितीनं चौथ्या स्थानावर ही स्पर्धा संपवली.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकी, कुस्ती आणि इतर खेळांच्या गर्दीमध्ये कुणाचंही लक्ष नसलेल्या गोल्फमध्ये भारतासाठी आशा पल्लवित केल्या होत्या. आदिती अशोक पदकाच्या अगदी जवळ पोहोचली होती. मात्र, तिला चौथ्या स्थानावरच समाधान मानावं लागलं.

आदितीचं करिअर

आदिती अशोकचा जन्म 29 मार्च 1998 मध्ये बेंगळुरूमध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून गोल्फ खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी बेंगळुरूमध्ये केवळ तीच गोल्फ कोर्स होते.

आदितीच्या वडिलांनी तिला गोल्फसाठी पाठिंबा दिला आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

आदिती 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती.

पण रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

त्याशिवाय आदिती ही भारताची पहिली महिला गोल्फर आहे. तिनं एशियन यूथ गेम्स (2013), यूथ ऑलिम्पिक गेम्स (2014), एशियन गेम्स (2014) मध्ये सहभाग घेतला होता.

लल्ला आइचा टूर स्कूलला किताब मिळवून देणारी सर्वात कमी वयाची ती भारतीय आहे. या विजयामुळंच तिला 2016 मध्ये लेडिज युरोपियन टूर कार्डसाठी एंट्री मिळाली होती.

2017 मध्ये ती पहिली भारतीय महिली प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन (LPGA) ची खेळाडू बनली.

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top