Friday, 13 Dec, 1.14 pm BBC मराठी

होम
UK Election : युकेच्या निवडणुकीत इंग्लंडची राणी का नाही करत मतदान ?

युकेच्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाने बहुमत मिळवलं आहे. बोरिस जॉन्सन यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा आपण ब्रेक्झिट घडवून आणू असा विश्वास व्यक्त केला.

गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. शुक्रवारी रात्रीतून निकाल यायला सुरुवात झाली.

युकेची निवडणूक अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. निवडणुकीचे मुद्दे आणि प्रचाराते गुद्दे यांच्या पलीकडे जाऊन युकेच्या निवडणुकीसंबंधीच्या 9 रंजक गोष्टी मांडण्याचा हा प्रयत्न.

1. राणीने तटस्थ राहण्याचा संकेत

ब्रिटनच्या राणीला मतदान करता येत नाही. राणीला 'राजकीय बाबतीत तटस्थ राहावं लागतं' आणि 'मतदान करणं तसंच निवडणुकीत उभं राहणं शक्य नसतं,' असं बकिंगहॅम पॅलेसचं म्हणणं आहे. पण म्हणजे ब्रिटनच्या राज्यकर्त्यांना मतदानाचा अधिकारच नाही असं आहे का?

राणी संकेताला धरून मतदान करत नाहीत, कायदेशीररीत्या त्यांना मतदानाचा अधिकार आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कायद्यानंच ब्रिटीश राज्यकर्त्याला दिला आहे.

2. 90 सदस्यांची निवड अनुवंशिक

भारताच्या संसदेप्रमाणेच ब्रिटीश संसदेची दोन सभागृहं आहेत. आपल्याकडे जशी राज्यसभा आहे तसंच तिथे 'हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'च्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ते निवडून येत नाहीत. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राणी या सदनाच्या सदस्यांची नियुक्ती करत असतात. यातले 26 सदस्य हे 'चर्च ऑफ इंग्लंड'चे बिशप्स असतात.

90 सदस्य हे अनुवंशिकतेने निवडून येतात. या कुटुंबामधील पुढची पिढी आपल्या आधीच्या पिढीकडून ही जबाबदारी स्वीकारत असते. नियुक्त केलेले अनेक लॉर्ड्स हे विविध क्षेत्रांमधले तज्ज्ञ असतात.

3. युकेत राहणाऱ्या कॉमनवेल्थ देशांतील नागरिकांना मतदानाचा अधिकार

युकेमध्ये राहणारे भारतीय नागरिकसुद्धा ब्रिटनच्या निवडणुकीत मतदान करू शकतात. राष्ट्रकुल देशांचे म्हणजे कॉमनवेल्थचे जे नागरिक युकेमध्ये राहतात ते सुद्धा मतदान करू शकतात. ते युकेच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मतदान करतात.

भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिकही इथे मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळेच दोन्ही प्रमुख पक्षांचे नेते इथली मंदिरं आणि गुरुद्वारांना भेटी देत या मतदारांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत होते.

4. भारतीय वंशाच्या खासदारांची संख्या उल्लेखनीय

2017 च्या निवडणुकीत संसदेच्या 650 जागांपैकी 12 जागांवर भारतीय वंशाचे खासदार निवडून आले होते. भारतीयांचा ब्रिटनच्या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा आहे. लेबर पक्षाकडून भारतीय वंशाचे 7 खासदार निवडून आले आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून भारतीय वंशाचे 5 खासदार निवडून आले.

प्रीती पटेल या बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री आहेत. 1892 साली दादाभाई नौरोजी हे ब्रिटीश संसदेतले पहिले भारतीय वंशाचे खासदार ठरले.

5. मतदानासाठी प्रतिनिधी नेमण्याची सोय

मतदानाच्या दिवशी जे लोक आपल्या मतदारसंघात नाहीत किंवा सुटीवर आहेत ते अप्रत्यक्षरीत्या मतदान करू शकतात. म्हणजे मतदानासाठी ते आपला प्रतिनिधी नेमू शकतात. जर अचानक काही कारणाने तुम्ही मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नसाल तर तुम्ही तातडीने आपला प्रतिनिधी नेमू शकता.

6. अजूनही मतपत्रिकांचाच वापर

भारतात गेली काही वर्षं EVM वरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. पण ज्या ब्रिटनकडून भारताने आपली राज्यपद्धती आणि निवडणूक पद्धती स्वीकारली त्या युकेमध्ये निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर होतो आणि मतदानासाठी मतदार पेन्सिल वापरतात.

याबद्दल युकेच्या निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे, की पेनाची शाई सांडू शकते, ती मतपत्रिकेवर डाग पाडू शकते.

7. स्माईली काढून करा मतदान

युकेतील निवडणूक आयोगाच्या मते तुमचं मत नीट दिलं गेलंय याची खातरजमा करण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे उमेदवाराच्या नावासमोरच्या खात्यात 'X' ची खूण करणं. पण मतदाराने अगदी हसणारी स्माईली जरी काढली असली किंवा 'अशी कुठलीही खूण केली असेल जिच्यातून त्याने एखाद्या उमेदवाराला दिलेलं प्राधान्य स्पष्ट होत असेल तर ते ग्राह्य धरावं' अशा निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना आहे.

8. प्रादेशिक पक्षांची चलती

युकेमध्येही प्रादेशिक पक्ष आहेत. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष आणि लेबर पक्षाव्यतिरिक्त अनेक लहान पक्ष आहेत. उदाहरणार्थ-स्कॉटिश नॅशनल पार्टी (SNP) हा 'हाऊस ऑफ कॉमन्स'मधील तिसरा मोठा पक्ष आहे.

या निवडणुकीत SNP ने 13 जागांची घसघशीत कमाई करत आपली संख्या 48 खासदारांवर नेली आहे. 2017 साली निवडून आलेल्या संसदेत 650 पैकी 35 खासदार SNP चे होते. स्कॉटलंडचं स्वातंत्र्य हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. SNP फक्त स्कॉटलंडच्या 59 जागा लढवते आणि त्यामुळे संपूर्ण युकेच्या निवडणुका जिंकण्याची क्षमता त्यांच्यात नाही. पण ते इतर पक्षांबरोबर आघाडी करू शकतात.

9. मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणी

युकेमध्ये मतदान संपलं, की लगेचच मतमोजणी सुरू होते. गंमतीची गोष्ट म्हणजे मतदारसंघांमध्ये निकाल जाहीर होण्यावरूनही चुरस असते.

आपल्या मतदारसंघाने ही चुरस जिंकावी यासाठी अनेकदा मतदार मानवी साखळी तयार करून मतपेट्या मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचवत असतात. होटन अँड संदरलंड साऊथ या मतदारसंघाच्या नावे सर्वात जलद निकाल जाहीर करण्याचा विक्रम होता, पण 2017 साली ते न्यू कासल सेंट्रल मतदारसंघाने त्यांना हरवलं.

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top