Tuesday, 28 Jan, 3.49 pm BBC मराठी

आंतरराष्ट्रीय
Wuhan Corona Virus: चीन असं बांधतोय 6 दिवसांत 1,000 खाटांचं रुग्णालय

कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या चीनमधील वुहान शहरामध्ये सहा दिवसांमध्ये एक हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे.

चीनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेले 830 रुग्ण नोंदले गेले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत 50हून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत.

एक कोटी दहा लाख लोकसंख्या असलेल्या वुहान शहरातूनच या विषाणूच्या प्रसाराला सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतं.

वुहानच्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तिथं रुग्णांची गर्दी झाली आहे. औषधांच्या दुकानातील औषधं संपली असून मागणी मात्र वाढत चालली आहे.

त्यामुळे चीन आता एक नवीन रुग्णालय बांधण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. चीनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हे नवं रुग्णालय 1000 खाटांचं असेल.

या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्हीडिओत 25 हजार वर्ग मीटर क्षेत्र असलेलं हॉस्पिटल तयार करण्यासाठी खोदकाम सुरू झालं आहे.

2003 मध्ये बीजिंगमध्ये सार्स विषाणूशी लढण्यासाठी असंच एक हॉस्पिटल बनवण्यात आलं होतं.

हॉवर्ड मेडिकल स्कूलमध्ये ग्लोबल हेल्थ अँड सोशल मेडिसीन शिकवणाऱ्या जोआन कॉफमन यांच्या म्हणण्यानुसार, "हे हॉस्पिटल या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराशी लढण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यामध्ये कोरोना विषाणूबाधित लोकच येतील. त्यामुळे इथं सर्व सुरक्षेसाठी उपाय केले जातील."

सहा दिवसांमध्ये हॉस्पिटल तयार होईल?

काउंसिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या ग्लोबल हेल्थचे सीनियर फेलो यानजोंग हुआंग म्हणतात, "मोठ्यात मोठं संकट कमीत कमी वेळात संपवण्याचं चीनचा इतिहासच आहे."

ते म्हणतात, 2003मध्ये सात दिवसांमध्ये बीजिंगमध्ये रुग्णालय बांधून झालं होतं आण कदाचित तेच रेकॉर्ड मोडण्याची तयारी होत असावी. बीजिंगच्या हॉस्पिटलप्रमाणे वुहानचं हॉस्पिटलसुद्धा आधीच तयार केलेल्या सामग्रीपासून म्हणजेच प्री-फॅब्रिकेटेड मटेरियलनं बनवण्यात येईल.

ते म्हणतात, "अशा कामांमध्ये लाल फितशाही आणि आर्थिक अडथळ्यांना पार करून सामग्री गोळा करण्यात देश सक्षम आहे."

हुआंग सांगतात की हे काम वेळेत संपवण्यासाठी देशभरातून तज्ज्ञ अभियंत्यांना बोलावण्यात आलं आहे.

हुआंग सांगतात, "इंजिनिअरिंगमध्ये चीन निष्णात आहे. गगनचुंबी इमारती बांधण्यात चीनची स्पर्धा कोणीच करू शकणार नाही. पाश्चिमात्य देशांना हे समजणं कठीण आहे, मात्र हे शक्य आहे."

औषधांच्या पुरवठा व्हावा यासाठी वुहान इतर हॉस्पिटलांकडून किंवा थेट कारखान्यांतून औषधसाठा मागवू शकतं.

पीपल्स रिपब्लिकन आर्मीचे 150 आरोग्य कर्मचारी वुहान पोहोचल्याचे ग्लोबल टाइम्सने प्रसिद्ध केले आहे. हे कर्मचारी नवं हॉस्पिटल तयार झाल्यावर तिथं काम करतील की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

सार्सच्या उद्रेकाच्या वेळेस काय झालं होतं?

2003मध्ये सार्स या आजाराची लक्षणं असलेल्या लोकांसाठी बीजिंगमध्ये जियोतांगशान हॉस्पिटल बनवण्यात आलं होतं. ते सात दिवसांमध्ये तयार करण्यात आलं होतं. सर्वात वेगाने बांधण्यात आलेलं हॉस्पिटल, असा विश्वविक्रम त्याच्या नावावर असल्याचं सांगण्यात येतं.

'चायना.कॉम'च्या माहितीनुसार हे रुग्णालय सुमारे 4 हजार लोकांनी दिवसरात्र काम करून तयार केलं होतं.

या रुग्णालयामध्ये एक एक्स-रे विभाग, सीटी स्कॅन रूम, अतिदक्षता विभाग आणि एक प्रयोगशाळा होती. हॉस्पिटलच्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक बाथरूम होतं.

दोन महिन्यातच देशातल्या सार्सच्या एकूण रुग्णांपैकी एक सप्तमांश रुग्ण या हॉस्पिटलमध्ये होते. याला वैद्यक उपचारांच्या इतिहासातील एक चमत्कार असं मीडियानं संबोधलं होतं.

जोआन कॉफमन म्हणतात, "आरोग्य मंत्रालयानं हे रुग्णालय बांधण्याचा आदेश दिला होता. दुसऱ्या रुग्णालयातील परिचारिका आणि स्वास्थ्य सुविधांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांना इथं कामासाठी बोलावलं होतं. त्यांना रुग्णांची पडताळणी करणे, विशेषतः सार्स संक्रमित आणि रुग्णांवर उपचार करण्यासाठीचे योग्य ते निर्देश दिले होते."

त्या सांगतात, सार्सच्या वेळेस स्थानिक सरकारनं त्याचा खर्च उचलला मात्र सरकारनं खास सबसिडी देऊन कर्मचाऱ्यांचा पगार आणि बांधकामाच्या खर्चाची व्यवस्था केली होती.

आता नवीन रुग्णालयाचा खर्च वुहान सरकारवर पडेल, मात्र ते बांधणं याला प्रथम प्राधान्य आहे.

हुआंग म्हणतात, "सार्सचा उद्रेकाचा काळ संपल्यावर बीजिंग रुग्णालय गुपचूप मोकळं करण्यात आलं होतं."

source: bbc.com/marathi

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: BBC Marathi
Top