Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
८२ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून; दागिने, रोख रक्कम पळवली

८२ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून; दागिने, रोख रक्कम पळवली

डक-अर्जुनी,दि.०२ -तालुक्यातील पळसगाव-राका येथे घरात एकट्या राहणाऱ्या ८२ वर्षीय वृद्ध महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार २ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.

कुसुम चैतराम कापगते (८२) रा. पळसगाव-राका ता. सडक अर्जुनी असे मृत महिलेचे नाव आहे.

खुनानंतर घरातील आलमारी फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. कुसुम कापगते या पळसगाव-राका येथे आपल्या घरात एकट्याच राहत होत्या. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश करून त्यांचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे तसेच आलमारी फोडण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यातून सोन्याचे दागिने, दोन सोन्याच्या पाटल्या आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे समोर आले आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचे नेमके मूल्य मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी डुग्गीपार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जावेद खान यांना प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखा, डुग्गीपार पोलीस तसेच श्वान पथकाने घटनास्थळी तपासणी करून संभाव्य पुरावे गोळा केले.कुसुम कापगते यांना तीन अपत्ये आहेत. त्यांचा मुलगा छत्रपती संभाजीनगर येथे अभियंता म्हणून कार्यरत असून, दोन मुली विवाहित आहेत. त्या अनुक्रमे नवेगावबांध आणि साकोली येथे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यामुळे घरात एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या हेतूने केली, हा प्रश्न परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES