
देवरी: आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांच्या वतीने आयोजित विशेष उन्हाळी शिबिर सध्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून, या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना नवे व्यासपीठ मिळत आहे.
२४ एप्रिल २०२६ पासून सुरू झालेल्या या शिबिरात गोंदिया जिल्ह्यातील विविध शासकीय आश्रमशाळांमधील निवडक २२५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि आदिवासी परंपरा यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासासह सर्जनशीलतेलाही नवी दिशा मिळत आहे.
या शिबिरासाठी विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांच्या आधारे करण्यात आली. प्राथमिक चाचणीनंतर गुणवंत विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली असून, त्यांना विविध विषयांमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि खगोलशास्त्र यांसारख्या आधुनिक विषयांचे प्रशिक्षण दिले जात असताना, दुसरीकडे बांबू हस्तकला, गोंडी आर्ट, रांगोळी, क्ले-आर्ट, मेहंदी आणि पोट्रेट पेंटिंगद्वारे आदिवासी संस्कृतीचा वारसाही जपला जात आहे.
शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. धनुर्विद्या, मल्लखांब यांसारख्या पारंपरिक खेळांसोबत कथा लेखन, संगीत, नाटक आणि नृत्य यांचेही प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि शारीरिक विकासासाठी प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या प्रशिक्षणातून भविष्यात विद्यार्थ्यांना रोजगार आणि अर्थार्जनाच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांकडून तयार केला जाणारा माहितीपट. रोबोटिक्स आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमच स्वतःचा माहितीपट साकारत असून, त्यांच्या कल्पकतेचे दर्शन या माध्यमातून घडणार आहे. तसेच महिनाभर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध कलाकृतींचे भव्य प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.
लवकरच तालुका क्रीडा संकुल, देवरी येथे 'कलेचा संगम' या विशेष सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नाशिक ढोल, संगीत, नृत्य, नाट्य सादरीकरण तसेच आदिवासी चालीरीती आणि परंपरांचे दर्शन घडवले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या महिनाभराच्या मेहनतीतून साकारलेला हा सांस्कृतिक सोहळा देवरीकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना बाह्य जगाचा अनुभव मिळावा यासाठी विशेष शैक्षणिक सहलीचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी Nagpur Metro सफरीचा अनुभव घेणार असून, वनामती, Raman Science Centre तसेच Indian Institute of Management Nagpur यांसारख्या संस्थांना भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची माहिती घेणार आहेत.
या शिबिरासाठी कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि बांबू संशोधन केंद्र, चंद्रपूर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. तसेच प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, आश्रमशाळांचे मुख्याध्यापक, गृहपाल, शिक्षक आणि कर्मचारी वर्ग या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. उन्हाळी सुटीचा विधायक उपयोग करत विद्यार्थ्यांना नवे कौशल्य देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे पालक आणि शिक्षणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

