Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालणार

बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालणार

चामोर्शी : शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.11) चामोर्शी शहरात अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. मोठ्या संख्येने महिलांसह विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन चामोर्शीत बंद पाळण्यात आला.

याशिवाय लक्ष्मी गेटपासून पोलीस ठाण्यावर विराट मोर्चा काढत पीडितेला न्याय देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. त्यावर स्वत: पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात या प्रकरणाचा तपास एसडीपीओ अनिकेत हिरडे (आयपीएस) हे करतील आणि 30 दिवसात आरोपपत्र न्यायालयात दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात (जलदगती न्यायालयात) सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे करणार असल्याचे सांगितले. एवढेच नाही, तर या प्रकरणात आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होण्यासाठी कायद्यातील कलमांचा योग्य वापर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

8 जून रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास शहरातील एका सात वर्षीय मुलीवर घर बांधकामावरील प्रज्वल उर्फ नारू भांडेकर (27 वर्ष) या कामगाराने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी चामोर्शी शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या मोर्चामध्ये "पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे", "नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे", "महिलांवरील अत्याचार बंद करा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि तपासात कोणतीही हयगय होऊ नये, अशा मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

अन् पोलीस अधीक्षकांना चामोर्शीत यावे लागले

मोर्चा पोलीस ठाण्यावर पोहोचल्यानंतर महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांनी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी ठाम भूमिका घेतली. महिलांच्या आग्रहामुळे अखेर पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी चामोर्शी येथे दाखल होत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षकांनी महिला प्रतिनिधी मंडळ, पीडित कुटुंबीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी तपासाची संपूर्ण माहिती देत दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

आरोपीला जामिन मिळणार नाही

तपासामध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून, संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला या प्रकणाचा निकाल लागेपर्यंत जामिन मिळू नये यासाठीही न्यायालयात योग्य बाजू मांडली जाईल असे एम.रमेश यांनी सांगितले.

हलगर्जीपणाच्या आरोपांवर डॉक्टरांविरोधात चौकशी

पीडितेच्या वैद्यकीय तपासणी प्रक्रियेदरम्यान काही डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याच्या तक्रारी महिला संघटनांनी मांडल्या. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

महिला शिष्टमंडळाने दिले निवेदन

नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, नगरसेविका ॲड.प्रेमा आईंचवार, वंदना चौथाले, वंदना म्हस्के, नगरसेवक राहुल नैताम, अमोल आईंचवार, ॲडडिम्पल उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते माणिक तुरे, पीडितेचे वडील तसेच मानव अधिकार संघटना आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षकांना व तहसीलदार, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनाही निवेदन सादर केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES