
गोंदिया,दि.०७ : जिल्ह्यात मंगळवारी (दि.५) गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १३८९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान है गोरेगात तालुक्यात झाले आहे. तर बुधवारी (दि.६) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे.सर्वाधिक फटका गोरेगाव तिरोडा विधानसभा मतदारसंघात पडला असून आमदार विजय रहागंडाले,माजी जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले,जि.प.सदस्य जितेंद्र कटरे,जिल्हा बँकेचे संंचालक दुर्गाप्रसाद ठाकरे,उपसरपंच कमलेस रहागंडाले, यांच्यासह कृषी व महसुल विभागाचे अधिकारी यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धानाची पाहणी केली.
गेल्या खरीप हंगामात कीडरोग आणि परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू, या आशेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लातगड़ केली. त्यामुळेच यंदा रब्बीचे लागवड क्षेत्र ७६ हजार हेक्टरवर पोहोचले. तर काही शेतकऱ्यांनी धानाला पर्याय म्हणून ७०० हेक्टरवर मका पिकाची लागवड केली होती. रब्बीतील धान आणि मका पिकाला अनुकूल वातावरण मिळाल्याने दोन्ही पिके चांगली आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे
भाव होते. मका पिकाची कापणी आणि मळणी सुरू आहे, तर रब्बीतील धानपीक निघण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ४ ते ९ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता, तो अंदाज खरा ठरला. मंगळवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली, तर गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यात गारपीट झाली. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभा धान आडवा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बुधवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास वादळी वान्यासह पावसाने हजेरी लावल्याने रब्बीतील पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

