Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त मुंडीपार येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त मुंडीपार येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात

गोंदिया : १२ जून 'जागतिक बालकामगार विरोधी दिन' निमित्त ग्राम पंचायत मुंडीपार (MIDC) येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया, 'जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन (JRC)' अंतर्गत इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय तसेच सहायक कामगार आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. एन. के. वालके यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय मेंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, बालकल्याण समिती सदस्य मनोज कुमार रहांगडाले, सरकारी कामगार अधिकारी विद्या पेंडोर, संरक्षण अधिकारी रवींद्र टेंभुर्णे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बालमजुरी ही मुलांच्या हक्कांवर गदा आणणारी गंभीर समस्या असल्याचे अधोरेखित करण्यात आले. "मुलांचे स्थान कामाच्या ठिकाणी नसून शाळेत आहे," हा संदेश देत, बालमजुरी व मानवी तस्करी यांचा परस्पर संबंध स्पष्ट करण्यात आला. यासाठी प्रशासन, पोलीस आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
जून महिना 'बालमजुरी विरोधी कृती महिना' म्हणून साजरा केला जात असून, या काळात बाल तस्करी आणि बालमजुरी रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाते. मुलांचे पुनर्वसन, शिक्षण व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी बालकामगार विरोधात जनजागृती करण्याचा संकल्प केला. तसेच, बालकामगार आढळल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098, पोलीस हेल्पलाईन 112 किंवा संबंधित शासकीय कार्यालयांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES