
• पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण• पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन
बुलढाणा, दि. १ : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना" जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.

