Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचे जल्लोषात पदग्रहण

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वजित कोवासे यांचे जल्लोषात पदग्रहण

गडचिरोली : काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित मारोतराव कोवासे यांचा स्वागत आणि पदग्रहण सोहळा मंगळवारी (दि.26) गडचिरोलीत अतिशय उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात झाला. काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

पदापेक्षा पक्षनिष्ठा ठेवून काम केल्यास पक्षाकडून तुमची योग्य दखल घेतली जाते, असा सल्ला यावेळी आ.वडेट्टीवार यांनी नाराज पदाधिकाऱ्यांना उद्देशून दिला.

संध्याकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित कोवासे यांचे गडचिरोलीत आगमन होताच इंदिरा गांधी चौकात आतिषबाजी आणि भल्यामोठ्या हाराने जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर खुल्या जीपमधून त्यांची सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात उभारलेल्या मंडपापर्यंत ढोलताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पदग्रहण आणि शेतकरी मेळाव्याला माजी शिक्षणमंत्री आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंत पुरके, माजी खासदार मारोतराव कोवासे, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी कुणाल चौधरी, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, युवक काँग्रेसचे महासचिव अजय चिकारा, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्धू, आ.अभिजित वंजारी, आ.रामदास मसराम, माजी आ.भांडेकर, प्रदेश काँग्रेसचे महासचिव रविंद्र दरेकर, सचिव पंकज गुड्डेवार, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी जि.प.सदस्य राम मेश्राम यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना विश्वजित कोवासे यांनी पक्षाने विश्वास व्यक्त करत जी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्व ज्येष्ठांचे आभार व्यक्त केले. गडचिरोली जिल्ह्याला नक्षलमुक्त करत असताना आता शेतकरीमुक्त करणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मजूर म्हणून काम करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे, असे सांगत त्यांनी शासनाच्या या धोरणाविरूद्ध आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, रजनिकांत मोटघरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विशेष म्हणजे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खासदार मारोतराव कोवासे अनेक वर्षानंतर एकत्र पहायला मिळाले. कार्यक्रमानंतर वडेट्टीवार यांच्यासह इतर नेते व पदाधिकाऱ्यांनी कोवासे यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. त्यांच्यातील ही दिलजमाई काँग्रेसच्या जिल्ह्यातील राजकारणासाठी महत्वपूर्ण मानली जाते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES