Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निवृत्ती नव्हे, नव्या इनिंगची सुरुवात! डॉ. धुमनखेडे यांच्या प्रदीर्घ सेवेला मित्र परिवाराची मानाची सलामी

निवृत्ती नव्हे, नव्या इनिंगची सुरुवात! डॉ. धुमनखेडे यांच्या प्रदीर्घ सेवेला मित्र परिवाराची मानाची सलामी

डॉ. दीपक धुमनखेडे यांचा मित्र परिवारातर्फे भावपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार

देवरी,दि.०१:प्रदीर्घ, निष्कलंक आणि आदर्श सेवेच्या बळावर समाजातील प्रत्येक घटकाचा आदर मिळवणारे आदरणीय डॉ. दीपक धुमनखेडे यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार सोहळा आज सोमवारी (दि.०१) त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

त्यांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव करण्यासाठी आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. दीपक धुमनखेडे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये ३५ वर्षे सेवा देत डॉ. धुमनखेडे हे काल ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा बराच सेवाकाल हा देवरी तालुक्यात गेला. याप्रसंगी बोलताना मित्र परिवारातील स्नेहींनी डॉ. धुमनखेडे यांच्या सेवेतील कटिबद्धता, त्यांचा मनमिळावू स्वभाव आणि संकटकाळात मित्रांना व समाजाला नेहमी मदत करण्याची त्यांची वृत्ती याबद्दलच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. "डॉ. धुमनखेडे हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले असले, तरी सामाजिक कार्यातून ते कधीही निवृत्त होऊ शकत नाहीत; त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना यापुढेही कायम ऊर्जा देत राहील," अशा भावना उपस्थित मित्रांनी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ. दीपक धुमनखेडे भावुक झाले होते. ते म्हणाले, "आजवरच्या सेवाकाळात कर्तव्य बजावताना मिळालेली आपुलकी आणि आज मित्र परिवाराने दिलेला हा सन्मान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. या प्रेमाच्या बळावरच पुढील आयुष्यातील सामाजिक व कौटुंबिक जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पाडेन."

या सोहळ्याला डॉ. धुमनखेडे सरांचे सर्व स्नेही, मित्र परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन रवी बंसोड यांनी केले. उपस्थितांचे आभार मनोहर बडोले यांनी मानले. यावेळी मुख्य उपस्थितीमध्ये साप्ताहिक बेरारटाईम्सचे सहसंपादक सुरेश भदाडे, विजय टेंभूर्णीकर, देवराम शहारे, डॉ. बिसेन, जितेंद्र वासनिक आदी मान्यवरांचा समावेश होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES