Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पळसगाव राका येथील नवजीवन विद्यालयातील 17 मुलींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे यशस्वी एचपीव्ही लसीकरण

पळसगाव राका येथील नवजीवन विद्यालयातील 17 मुलींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे यशस्वी एचपीव्ही लसीकरण

गोंदिया, दि.1 : 8 मार्च जागतिक महिला दिनापासुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेतुन व सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रेरणेतुन जिल्ह्यात सर्वत्र वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींसाठी मोफत लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रत्यक्ष कार्यवाहीत गावपातळीवरील शासकीय आरोग्य संस्थेत लसीकरण केले जात आहे.

सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रणित पाटील व प्राथमिक आरोग्य केंद्र चिखलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वंदना घरोटे यांच्या संकल्पनेतुन प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत पळसगाव राका येथील 'नवजीवन विद्यालया'तील 17 मुलींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे दि.31 ऑगस्ट रोजी यशस्वी एचपीव्ही लसीकरण करण्यात आले.

गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) मुलींचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मोहिमेला या भागात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक पातळीवर मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली अंतर्गत येणाऱ्या पळसगाव राका येथील 'नवजीवन विद्यालय' या शाळेतील 17 पात्र विद्यार्थिनींचे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे सुरक्षितपणे एचपीव्ही (HPV) लसीकरण पूर्ण करण्यात आले.

14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींना या जीवघेण्या आजारापासून सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागातर्फे ही मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वंदना घरोटे, नवजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापिका पद्मा चुटे व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिपक आगलावे यांचे योग्य नियोजनामुळे शाळा प्रशासनाने मुलींना विश्वासात घेऊन या लसीकरणासाठी प्रवृत्त केले.

ग्रामीण रुग्णालय सौंदड येथील वैद्यकीय पथकाने सर्व मुलींची प्राथमिक तपासणी करून त्यांना एचपीव्ही लसीकरणचा डोस दिला. लसीकरणानंतर सर्व विद्यार्थिनींची प्रकृती उत्तम असून, त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही वेळ ठेवण्यात आले होते. आरोग्य प्रशासनाने इतरही पालकांना आपल्या 14 ते 15 वर्षे वयाच्या मुलींचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

सदर एचपीव्ही लसीकरण प्रसंगी आरोग्य सेविका सपना नागदेवे, आरोग्य सेवक अतुल टेंभुर्णे, आरोग्य सहायिका कल्पना ढोमणे, शिक्षकवर्ग माधुरी पातोडे, हेमणे, सुरेश मेंढे, मेश्राम यांचे समुपदेशन व मार्गदर्शन यशस्वी ठरले. स्टाफ नर्स अश्विनी गहाणे यांनी सर्व मुलींना एचपीव्ही लसीकरण केले.

एचपीव्ही लस काय आहे?

ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) हा एक सामान्य विषाणू आहे. या संसर्गामुळे स्त्रियांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. ही लस या धोकादायक विषाणूपासून 93 ते 100 टक्के संरक्षण देते.

वयाची कोणती वेळ योग्य आहे?

ही लस 14 ते 15 वर्षे वयोगटातील मुलींसाठी आरोग्य विभागामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मोफत देण्यात येत आहे. या वयात रोगप्रतिकारशक्ती उत्तम असते. लैंगिक संबंध सुरू होण्यापूर्वी लस घेणे अधिक फायदेशीर ठरते.

सुरक्षा आणि गैरसमज

ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जागतिक आरोग्य संघटनेने याचा निवाळा दिला आहे. या लसीमुळे वंध्यत्व येत नाही, हा एक केवळ गैरसमज आहे. लसीमुळे हातावर हलकी सूज किंवा दुखणे यांसारखे अगदी सौम्य दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु ते घाबरण्यासारखे नाही आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES