
; नियमबाह्य विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
गोंदिया, दि. 07 : उन्हाळ्याची चाहूल लागताच शहरासह ग्रामीण भागात थंडावा मिळवण्यासाठी नागरिकांचा बर्फ गोळा, कुल्फी, सरबत व शीतपेयांकडे ओढा वाढतो.
मात्र या गोड थंडाव्यामागे आरोग्याचा धोका दडलेला असू शकतो. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, गोंदिया विभागाने सर्व बर्फ गोळा व शीतपेय विक्रेत्यांना कडक इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, काही विक्रेते अधिक नफ्याच्या उद्देशाने निकृष्ट दर्जाचा बर्फ तसेच बंदी घातलेले कृत्रिम रंग वापरत आहेत. अशुद्ध पाण्यापासून तयार केलेल्या बर्फामुळे कॉलरा, टायफॉइडसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. तसेच रासायनिक रंगांमुळे पोटाचे विकार, आतड्यांमध्ये संसर्ग, घशाचे इन्फेक्शन, सर्दी, खोकला, ताप आणि त्वचेचे विकार उद्भवू शकतात.
अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार, बर्फ गोळा, फळांचे रस, लस्सी व शीतपेये तयार करताना केवळ स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक विक्रेत्याने अन्न सुरक्षा विभागाकडून परवाना (लायसन्स) किंवा नोंदणी घेणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, शाळा परिसरात बर्फ गोळा व कुल्फी विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असल्याने, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
सहायक आयुक्त (अन्न) श्रीमती अमृता ला. शिर्के यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "बर्फ गोळा किंवा कोणताही खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी संबंधित विक्रेत्याकडे वैध परवाना आहे का, याची खात्री करावी. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांवर प्रशासन कठोर कारवाई करेल."

