Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तुकाराम मुंढेंचा धडाका! पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा 73.25 लाखांचा औषधसाठा जप्त

तुकाराम मुंढेंचा धडाका! पतंजलीच्या दिव्य फार्मसीचा 73.25 लाखांचा औषधसाठा जप्त

मुंबई - महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कारवाईची मालिका सुरू केली आहे. जनतेच्या आरोग्याशी संबंधित फसवणूक आणि भेसळीविरोधात कठोर भूमिका घेत त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी मोहीम राबवली आहे.या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई म्हणजे Patanjali Ayurved समूहाशी संबंधित दिव्य फार्मसीच्या औषधांवर करण्यात आलेली कारवाई. FDA ने तब्बल 73 लाख 25 हजार रुपयांचा औषधसाठा जप्त केला आहे.

संबंधित औषधांची विक्री फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या आधारे होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गंभीर आजारांवर 'हमखास उपचार' दाव्यांवर आक्षेप

FDA च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दिव्य फार्मसीच्या काही आयुर्वेदिक उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये कॅन्सर, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांवर शंभर टक्के उपचार होण्याचा दावा करण्यात आला होता. तसेच "चमत्कारीक उपचार", "हमीशीर परिणाम" यांसारखे वैज्ञानिक आधार नसलेले दावे जाहिरातींमध्ये आढळून आले.
अधिकाऱ्यांच्या मते, अशा प्रकारच्या जाहिराती ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या असून औषध व सौंदर्यप्रसाधन कायदा 1940 मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

"जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही"

आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता की, जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
FDA नेही स्पष्ट केले आहे की, भविष्यात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या, उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात थेट न्यायालयीन प्रक्रिया राबवून कठोर पावले उचलली जातील.

तीन दिवसांत 53 ठिकाणी धाडी, 33 जण अटकेत

पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर विभागात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली.भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि औषधांवर कारवाई,लाखो रुपयांचा संशयित माल जप्त अशा व्यापक कारवायांमुळे अन्न व औषध क्षेत्रात खळबळ उडाली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: BERAR TIMES