
सडक अर्जुनी -येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाला नियमित निरीक्षणासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी २९ मे रोजी भेट दिली. या प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.या प्रणित पाटील यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भेटीदरम्यान डॉ. गोल्हार यांनी तालुक्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला आणि आरोग्य यंत्रणेला अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.निरीक्षणादरम्यान जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव' या महत्त्वाकांक्षी मोहिमेच्या प्रगतीची माहिती घेतली. तालुक्यातील 'एचपीव्ही' लसीकरण मोहीम शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, 'यू-विन' पोर्टलवरील निश्चित केलेले उद्दिष्ट वेळेत साध्य करण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी डॉ. गोल्हार यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन त्यांच्या कामाची सद्यःस्थिती जाणून घेतली. क्षयरोग, कुष्ठरोग आणि गैर-संसर्गजन्य आजारांवर विशेष भर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला.
इमारत बांधकामाची पाहणी
आरोग्य सेवांच्या पायाभूत सुविधांचा आढावा घेताना डॉ. गोल्हार यांनी ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि बीटीटी इमारतीच्या बांधकामाच्या सद्य:स्थितीची सविस्तर माहिती घेतली. हे बांधकाम विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात उपस्थित राहून जबाबदारीने काम करावे, असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले.
जोखीमग्रस्त गावांमध्ये या उपाययोजना करा
तालुक्यातील सर्व जोखीमग्रस्त गावांमध्ये तातडीने 'आयुष्मान आरोग्य शिबिरांचे' आयोजन करण्यात यावे. या जोखीमग्रस्त गावांमध्ये १४ वर्षांवरील सर्व नागरिकांची क्षयरोग, कुष्ठरोग आणि गैर-संसर्गजन्य आजार यासाठी सखोल तपासणी करण्यात यावी. तपासणी दरम्यान किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दैनंदिन ओ.पी.डी.मधून कोणताही संशयित रुग्ण आढळल्यास, त्याला पुढील निदानासाठी तातडीने एक्स-रे करिता संदर्भित करण्यात यावे.

