Saturday, 18 Jan, 1.58 pm बोभाटा

होम
या गावात पडणाऱ्या माशांच्या पावसाचं रहस्य काय ?

आकाशातून माशांचा पाऊस पडू शकतो ही फक्त कल्पनाच वाटू शकते, पण एका गावात हे खरंच घडतं. मेक्सिको देशाच्या दक्षिणेस असलेल्या होन्डुरास या देशातील योरो येथे वर्षातून २ वेळा असा पाऊस पडतो. याहीपेक्षा मोठं आश्चर्य याचं की हे गाव समुद्रापासून लांब आहे.

असं म्हणतात की १८०० पासून माशांच्या पावसाला सुरुवात झाली. मे आणि जून महिन्यात हा पाऊस पडतो. या दोन महिन्यांच्या काळात मोठ्याप्रमाणात पाऊस आणि वादळ येतं. पाऊस ओसरला की रस्त्यांवर मासेच मासे विखुरलेले दिसतात. यातले काही जिवंत असतात तर काही मेलेले.

हा प्रकार खरंच घडतो की ही फक्त अफवा आहे हे तपासण्यासाठी १९७० च्या काळात नॅशनल जिओग्राफिकच्या टीमने योरोला भेट दिली होती. या टीमने 'याचि देही याचि डोळा' हा प्रकार पाहिला. मासे थेट आकाशातून पडत असल्याचं त्यांनी बघितलं.

हा प्रकार फक्त या एकाच देशात घडतो का ? तर नाही. याला 'animal rain' म्हणतात. बऱ्याच देशांमध्ये मासे, बेडूक, साप, विंचू, पक्षी, यांचा पाऊस पडतो. हे प्राणी जमिनीवर कोसळण्यापूर्वीच मेलेले असतात. हे का घडतं हे मात्र अजून विज्ञानाला समजलेलं नाही.

पण काही सोप्पी उत्तरे उपलब्ध आहेत ती जाणून घेऊया.

मोठ्याप्रमाणात पाऊस पडला की प्राणी आपल्या बिळातून, किंवा घरट्यातून बाहेर पडतात आणि इतस्त विखुरतात. या गोष्टीला प्राण्यांचा पाऊस म्हणून बघितलं जातं. माशांच्या बाबती अचानक आलेला पूर कारणीभूत असावा असं म्हटलं जातं. अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्याप्रमाणात मासे बाहेर फेकले जातात. हे बघताना असं वाटतं की आकाशातून मासे पडत आहेत.

धार्मिक कारण :

असे चमत्कार झाले की त्यांना धार्मिक करणं मिळतातच. स्थानिक लोकांच म्हणणं आहे की 'जोस मॅन्युएल सुबिराना' या कॅथलिक धर्मोपदेशकाने हा चमत्कार केला. तो १८५६ ते १८६४ काळात योरोमध्ये राहायचा. त्याने बघितलं की लोक भुकेने तडफडतायत. हे पाहून त्याने आकाशातून माशांचा पाऊस पाडला. अर्थात ही फक्त एक दंतकथा आहे.

तर,विज्ञानालाही या गोष्टीचा पुरता छडा लागलेला नाही. हे खरंच घडत असेल का यावरही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं?

आणखी वाचा:

भारतात आहेत अशी १० जगावेगळी गावं ! कारणं तर जाणून घ्या !!

बोभाटा.कॉम
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Bobhata
Top