नवी दिल्ली : इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) ने शनिवारी जाहीर केले की, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने 4,106 कोटी रुपयांचा करपूर्व विक्रमी नफा मिळवला आहे.
IFFCO चे अध्यक्ष दिलीप संघाणी यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2025-26 हे भारतीय सहकारी चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरले आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, IFFCO ने उत्पादन आणि विक्रीमध्येही नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. 118.75 लाख मेट्रिक टन खतांची विक्रमी विक्री आणि देशभरात 119.68 लाख मेट्रिक टन खतांचा पुरवठा हा शेतकऱ्यांच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा पुरावा आहे. युरिया आणि DAP खतांच्या वाढत्या विक्रीमुळे कृषी क्षेत्रातील IFFCO ची महत्त्वपूर्ण भूमिका अधिक बळकट झाली आहे.
"आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नॅनो खतांची लोकप्रियता झपाट्याने वाढली असून 30.1 लाख बाटल्यांपेक्षा जास्त विक्री झाली आहे. नॅनो युरिया प्लस, नॅनो डीएपी, नॅनो झिंक, नॅनो कॉपर आणि 'धारामृत' ही उत्पादने शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रभावी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय म्हणून समोर आली आहेत," असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
याशिवाय, नॅनो एनपीके लिक्विड (८-८-१०) आणि नॅनो एनपीके ग्रॅन्युलर (२०-१०-१०) यांना खत नियंत्रण आदेशांतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे-ही उत्पादने जगातील आपल्या प्रकारातील पहिली आहेत. ही उत्पादने पानांवर फवारणी (foliar spray) आणि मातीद्वारे वापरता येतात, ज्यामुळे पोषकद्रव्यांचा वापर अधिक कार्यक्षम होतो आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.
नॅनो तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी, IFFCO ने बेंगळुरूतील देवनहल्ली येथे आपला चौथा नॅनो खत प्रकल्प सुरू केला असून, त्यामुळे एकूण उत्पादन क्षमता दररोज सुमारे 9.5 लाख बाटल्यांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, कोयंबतूरमधील नॅनो इनोव्हेशन सेंटर संशोधन आणि तंत्रज्ञान विकासासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे, जिथे भविष्यातील शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानावर काम सुरू आहे, असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

