बीड : चालू ऊस गाळप हंगाम २०२५-२०२६ मध्ये जवळपास २०० ऊस वाहतुकदारांनी साईप्रसाद नॅचरल शुगरला ऊस पुरवठा केला. मात्र, कारखान्याने वाहतूकदारांची कोणतीही संमती न घेता त्यांच्या बिलांमधून कारखान्याने साईबाबा मंदिर उभारणीच्या नावाखाली प्रत्येकी पाच हजार रुपये परस्पर कपात केले आहेत.
गळीत हंगाम संपल्यानंतर अंतिम बिल घेताना ही बेकायदेशीर वसुली उघडकीस आली. त्यामुळे ऊस वाहतुकदारांनी रोष व्यक्त केला आहे. ही रक्कम परत करावी अन्यथा कायदेशीर लढाईसह ठिय्या आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
साईप्रसाद नॅचरल शुगर्स कारखान्याच्या या मनमानीमुळे ऊस वाहतूकदार आणि ठेकेदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमची सहमती नसताना आमच्या हक्काच्या पैशांवर दरोडा टाकण्याचा अधिकार कारखान्याला कोणी दिला? हा आमचा विश्वासघात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडित ऊस वाहतूकदार व ठेकेदार सुभाष कोरडे यांनी दिली. परस्पर रक्कम कपात करून कारखान्याने ऊस वाहतूकदार आणि ठेकेदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. ही वसुली तत्काळ थांबवून कपात केलेली रक्कम सन्मानाने परत करावी, अन्यथा कायदेशीर लढाईसह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे.

