बीड : जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम संपुष्टात आला आहे. यंदा ऊस गाळपाचे प्रमाण समाधानकारक राहिले. तर साखर उताऱ्यात घट झाली आहे. हंगामात हवामानातील बदल, ऊसाची गुणवत्ता तसेच इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वळविणे या कारणांमुळे उताऱ्यावर परिणाम झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
एकूणच, गाळपाचे प्रमाण चांगले राहिले असले तरी साखर उताऱ्यात अपेक्षित वाढ झालीच नाही. तरीही जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांनी एकूण ४७ लाख ६१ हजार ३७८ मे. टन ऊस गाळप केले. त्यापासून ३५ लाख २५ हजार ५८९ क्विंटल साखर उत्पादन घेतले. तर सरासरी ७८१ टक्के उतारा नोंदविण्यात आला. माजलगावच्या एनएसएल शुगर या खाजगी कारखान्याने सर्वाधिक १०. ३८ लाख मे. टन गाळप करून आघाडी घेतली.
यंदाच्या गळीत हंगामात केज येथील येडेश्वरी ॲग्रोने ९.२२ लाख मे. टन गाळप करत दुसरे स्थान पटकावले. माजलगावच्याच सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने ६.७१ लाख मे.टन ऊस गाळप केले. तर केजच्या गंगा माऊली कारखान्याने ५.४९ लाख मे. टन गाळप केले आहे. गेवराईच्या जयभवानी कारखान्यानेही ५.२४ लाख मे. टन ऊस गाळप केले. माजलगावच्याच छत्रपती कारखान्याने ३.८७ लाख मे.टन, परळीच्या वैद्यनाथ कारखान्याने ३.३२ लाख मे. टन ऊस गाळप केले. बीडच्या डीव्हीपी कमोडिटीने १.६६ लाख मे.टन ऊस गाळप केले. उताऱ्याबाबत मिश्र चित्र दिसून आले आहे. आता साखर कारखान्यांनी आगामी हंगामाची लगेच तयारी सुरू केली आहे. ऊस तोडणी मजुरांची नोंदणी केली जात असून मुकादमांसोबत करार केले जात आहेत.

