छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला होता. यामुळे पैठण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन खरीप पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.
अनेक शेतकरी पाणी टंचाईमुळे ऊस पिकाकडे पाठ फिरविण्याच्या आणि नवीन लागवड टाळण्याच्या तयारीत होते. मात्र, जायकवाडी धरणातील वाढलेल्या जलसाठ्यामुळे गोदाकाठ तसेच कालव्यालगतच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. धरणातून गोदापात्रात पाणी सोडण्यात आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी हंगामात ऊस लागवड क्षेत्रात मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पैठण तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. स्थानिक दोन साखर कारखान्यांसह परिसरातील २० कारखाने या भागातून ऊस नेतात. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतीच नव्हे, तर साखर उद्योगालाही मोठे बळ मिळाले आहे. पुरेशा पाण्यामुळे यंदा पैठण परिसरातील ऊस लागवड क्षेत्र वाढणार असून, आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत नाशिक भागात झालेल्या दमदार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक झाली आहे. धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांहून अधिक झाला असल्याने धरण शंभर टक्के भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोलनापूरचे शेतकरी अजबराव खराद याांच्या मते जायकवाडीत पाणी वाढल्याने सिंचनाखालील शेतीला याचा फार मोठा फायदा होईल, परिणामी उत्पादनातही वाढ होईल.

